'झी युवा' वाहिनीवर लवकरच, 'प्रेम, पॉयजन, पंगा' ही नवी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील मुख्य पात्र आलाप, म्हणजेच अभिनेता करण बेंद्रे याच्याशी, या आगळ्यावेगळ्या धाटणीच्या मालिकेच्या निमित्ताने गप्पा मारल्या. त्यानेही मनमुरादपणे आपला अनुभव आम्हाला सांगितला.
१. 'प्रेम, पॉयजन, पंगा' या मालिकेसाठी तुझी निवड कशी झाली?
या मालिकेत मुख्य भूमिका करायला मिळत आहे, याचा खूप आनंद आहे. सुरुवातीला मी निवडप्रक्रियेचाच भाग होतो. माझी रीतसर ऑडिशन घेण्यात आली. त्यानंतर लुकटेस्ट सुद्धा घेण्यात आली होतीच. माझी निवड झाल्यांनतर मला सांगण्यात आलं, की माझ्या चेहऱ्यावर असलेली निरागसता, हे माझी निवड होण्यामागचं महत्त्वाचं कारण आहे.
२. आलापची व्यक्तिरेखा साकारताना काय तयारी करावी लागली?
न्यूज रिपोर्टरची बोलण्याची, उभं राहण्याची एक खास शैली असते. बातम्या देत असतानाची त्यांची देहबोली सुद्धा वेगळी असते. या सगळ्या गोष्टींचा नीट अभ्यास करावा लागला. मुंबईतील वेगवेगळ्या रिपोर्टर ना बघून हे सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न केला. लोकांशी संवाद साधत असताना ते नेमकं कसं बोलतात, त्यांचं वागणं कसं असतं, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याशिवाय आलापशी माझ्या आयुष्यातील अनेक गोष्टी जुळतात. त्यामुळे माझ्या आयुष्यातील अनेक अनुभवांचा सुद्धा हे पात्र साकारत असताना फायदा झाला आहे.
३. तुझी आणि शरयूची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री कशी आहे?
शरयू आणि माझी खूप छान मैत्री झालेली आहे. एकमेकांच्या संवादाला नेमकी कशी प्रतिक्रिया दिली जाईल हे आम्हाला दोघांनाही माहित आहे. त्यामुळे ऑनस्क्रीन काम करणं सोपं जातं. आमच्यात छान मैत्री झालेली असल्याने, ऑफस्क्रीन सुद्धा मजामस्ती, एकमेकांच्या खोड्या काढणं, अगदी एकमेकांना त्रास देणं या गोष्टी सुद्धा सेटवर सुरूच असतात.
४. मालिकेचे प्रोमोज बघितल्यानंतर, चाहत्यांच्या प्रतिक्रिया नेमक्या कशा आहेत?
प्रोमो बघितल्यानंतर सगळेचजण खूप खुश आहेत. सगळ्यांकडून कौतुक होत आहे. मालिकेचे प्रोमो सुद्धा विनोदी आणि आवडीचे वाटत असल्याने, ते प्रेक्षक अनेकदा बघत आहेत. पहिला प्रोमो पहिल्यानंतर, 'ती नेमकी फ्रिजमध्ये का आहे?' हा प्रश्न अनेकांना सतावत होता. तिसऱ्या प्रोमोमध्ये याचा उलगडा झाल्यावर, हे वेगळेपण प्रेक्षकांना खूप आवडलं आहे. ही मालिका निराळी असल्याने, प्रेक्षकांची आतुरता वाढली आहे.
५. कोठारे प्रोडक्शन सोबत ही तुझी पहिलीच मालिका आहे. ही संधी मिळाली याबद्दल काय भावना व्यक्त करशील?
'कोठारे व्हिजन'मध्ये काम करायला मिळणार हे कळल्यावर मला खूप आनंद झाला. महेश कोठारे सरांना इतकी वर्षे सिनेसृष्टीत बघत आलो आहे. त्यांच्यासोबत काम करायला मिळणार याचा आनंद होणं साहजिक होतं. त्यांना नुसतंच भेटायला मिळणार नाही, तर त्यांच्यासोबत आपला करण काम करणार आहे, हे समजल्यावर माझं कुटुंब खूपच खुश होतं.
No comments:
Post a Comment