'
फ्रेंडशिप डे' म्हटलं, की जवळचे मित्र, त्यांच्यासोबतच्या आठवणी या गोष्टी ओघानेच येतात. आम्ही कॉलेजमध्ये असताना, एकदा 'फ्रेंडशिप डे' थोडा वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा असं ठरवलं होतं. आम्ही सगळ्यांनी बाईक्स काढल्या आणि थेट लोणावळा गाठलं. छान पावसाळी वातावरण, आजूबाजूला धबधबे, अशा वातावरणात लोणावळ्यानजीकच्या विसापूर गडावर आम्ही ट्रेक केला होता. आम्हाला सगळ्यांनाच ट्रेकिंगची आवड असल्यामुळे, तो दिवस छान मजेत घालवला होता. ही आठवण आजही ताजी आहे. खरंतर, मित्र याचकरिता असतात; असंख्य आठवणी, सुखदुःखात मिळणारी साथ आणि कुठल्याही परिस्थतीत मित्राची सोबत याच गुणांमुळे मैत्री घट्ट होते. असे जवळचे अनेक मित्र मला लाभले आहेत. मीसुद्धा, त्यांच्या सुखदुःखाच्या प्रत्येक प्रसंगी त्यांच्या सोबत असू शकेन, यासाठी प्रयत्न करत असतो. माझ्या जवळच्या प्रत्येक मित्राला, प्रत्येक 'फ्रेंडशिप डे'ला मी भेटतो. मात्र, यंदा ते शक्य होईलच असं नाही. असं असलं, तरीही प्रत्येकाला मी फोन नक्कीच करणार आहे.
मला कुत्र्यांविषयी खूप प्रेम आहे. त्यामुळे, एखादा 'फ्रेंडशिप डे' माझ्या या खास मित्रांसोबत सुद्धा घालवायला मला नक्कीच आवडेल. भटक्या कुत्र्यांना वेळोवेळी अन्नपाणी देता येणे शक्य असल्यास, मी ते करत असतो. त्यामुळे त्यांच्यासोबत 'फ्रेंडशिप डे' साजरा करणं, हा एक वेगळा अनुभव असेल.
करण बेंद्रे, (अभिनेता, प्रेम पॉयजन पंगा)
माझी बहीण खरंतर माझ्यापेक्षा वयाने लहान आहे. मात्र, मोठ्या बहिणीप्रमाणे ती माझी काळजी घेते. विशेषतः मी कुठेही ऑडिशनसाठी जाणार असलो, तर माझा मेकअप, कपडे याकडे तिचं बारीक लक्ष असतं. मी चांगला दिसलो पाहिजे याची ती काळजी घेते. ऑडिशनला मला सोडायला येण्याची जबाबदारी पण ती नेहमी घेते. अर्थात, आमच्यात भांडणंही खूप होतात. भावंडांच्यात भांडणं झाली नाहीत, तर नात्यातील गंमत कमी होते. पण, आमच्यात छान मैत्री सुद्धा आहे. आम्ही सगळ्या गोष्टी एकमेकांना आवर्जून सांगतो. कधी तिला एखादी अडचण असली, तर मोठा भाऊ म्हणून तिला मार्गदर्शन करणं, तिच्यासोबत असणं या गोष्टी मी नेहमीच करतो.
मागच्या वर्षीचं रक्षाबंधन माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. त्यादिवशी माझा नाटकाचा प्रयोग होता. ती सुद्धा तिच्या कामांमध्ये व्यस्त होती. रक्षाबंधन साजरं करायला मिळणार की नाही, अशी शंका सुद्धा मनात होती. मात्र, रात्री उशिराने का होईना, पण वेळात वेळ काढून आम्ही सण साजरा केला. यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे नेहमीसारखं रक्षाबंधन साजरं करणं कठीण आहे. पण, आम्ही दोघेही मुंबईतच आहोत, त्यामुळे 'व्हर्चुअल रक्षाबंधन' हा प्रश्नच उद्भवत नाही. कोविडसाठी आखून देण्यात आलेल्या सगळ्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून, आम्ही दोघेही नाक्कीच भेटणार आणि प्रत्यक्ष भेटूनच रक्षाबंधन साजरं करणार.
-करण बेंद्रे, (अभिनेता, प्रेम पॉयजन पंगा)
No comments:
Post a Comment