Tuesday, 24 May 2022

भक्त उद्धाराचा बाणा, घेऊनि अवतरला कैलासराणा – “योगयोगेश्वर जय शंकर” कलर्स मराठीवर! नवी गोष्ट ३० मेपासून संध्या. ७.०० वा.

मुंबई २४ मे, २०२२ : असं म्हणतात देवाजवळ पोहचण्याचा सुलभ मार्ग म्हणजे सदगुरु ! हिंदू धर्मात देवाला अतिशय महत्व. देव प्रत्येक ठिकाणी पोहचू शकत नाही म्हणून त्याने या जगात आईला आपल्या लेकराच्या रक्षणासाठी पाठवले. पण, संकटकाळी जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात, माणसाला दिशाहीन व्हायला होतं तेव्हा मात्र आपण परमेश्वराचे नामस्मरण करतो. की तो कोणत्या ना कोणत्या रुपात येऊन आपला तारणहार होईल. प्रत्येकच वेळी परमेश्वर स्वतः या पृथ्वीतलावर येऊ शकत नाही. त्यामुळेचे या वाट चुकलेल्या भक्तांना मार्ग दाखविण्यासाठी त्यांने अनेक रूपं धारण केली. आपल्या भारताचे भाग्य थोर ज्यामुळे या भुमीत आजवर अनेक ईश्वरतुल्य संत सत्पुरुषांनी जन्म घेतला. महाराष्ट्राला तर संतांची भूमी असे संबोधले जाते. या पवित्र भूमीवर आधुनिक काळात असा एक अवलिया घेऊन गेला ज्यांनी वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या प्रांतात भक्तोदधार केला आणि जनकल्याणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांचे भक्तगण त्यांना साक्षात शंकराचाच अवतार मानतात. मैं कैलाश का रहने वाला हू, मेरा नाम है शंकर असं बोलत ज्यांनी अनेक पीडितांच्या दु:खांचे निवारण केले, ज्यांचा भक्तसमुदाय संपूर्ण जगात विखुरलेला आहे, महादेवाचा अंश जे आहेत, असे असंख्य भक्तांचे कैवारी, त्रिलोकी आहे ज्यांची कीर्ती संतवर्य योगीराज, सद्गुरू राजाधिराज "शंकर महाराज". एक सिद्ध आणि अवलिया सत्पुरुष शंकर महाराज यांच्या जीवनकार्यावर कलर्स मराठी घेऊन येत आहे शिरीष लाटकर लिखित योगयोगेश्वर जय शंकर" ही नवी मालिका. तेव्हा नक्की बघा सत्पुरुषाच्या मंगल चरित्राचा आरंभ - ३० मेपासून संध्या ७.०० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.

“अवतरे मी युगी युगी” या वाक्याच्या आधारे शंकर महाराज आयुष्यभर कार्यरत राहिले. त्यांचे व्यक्तिमत्वही गूढ, अनाकलनीय होते. त्यामुळे त्यांच्यासंबंधी अनेक आख्यायिका ऐकायला मिळतात. कोणत्याही संताला इतक्या विविध नावांनी ओळखले जात नसे जितक्या नावांनी महाराजांना ओळखले जाते. शंकर महाराज यांच्या जन्माबद्दल कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नाही. भगवान शंकरांचे भक्त चिमणाजी आणि पार्वती यांना दाट अरण्यात एक बालक सापडला. त्यांनी त्याचे नाव शंकर ठेवले. अगदी मायेने संगोपन केले, कोडकौतुक केले. शंकर लहानपणापासूनच ध्यानात मग्न राहणारा, नामस्मरणात दंग होणारा, कीर्तनात रमणारा शिवभक्त. कालांतराने त्यांनी जनकल्याणासाठी, आपले कार्य पूर्ण करण्याकरता गाव सोडले. त्यांच्या भक्तांनी महाराजांच्या लीला अनुभवल्या आणि कृतार्थ झाले. देवाचा शोध घेण्यापेक्षा आपल्यातील देववत्व समोर आणा, तुमच्या चुका सुधारा आणि दोषांचे निरसन करा असे सांगणारे शंकर महाराज भक्तांच्या मदतीला कायम धावून जात. कशी लोकांना त्यांच्या महानतेची प्रचिती येत गेली, मालिकेमध्ये प्रेक्षकांना शंकर महाराज आणि आई - वडिलांचे नाते, लहानपणीच्या लीला, त्यांचे बालपण कसे होते, आणखी कोणकोणती माणसं महाराजांच्या मार्गात आली हे सगळं प्रेक्षकांना या मालिकेमध्ये बघयाला मिळणार आहे.

कलर्स मराठीचे व्यवसाय प्रमुख अनिकेत जोशी म्हणाले, “कलर्स मराठीवर आम्ही अनेक वेगवेगळे, कधी न हाताळलेले विषय प्रेक्षकांसमोर आजवर घेऊन आलो आहोत. आणि आता पुन्हाएकदा असाच एक प्रयत्न करतो आहोत. महाराष्ट्रात अनेक गोष्टी दडलेल्या आहेत आणि त्या सामान्य माणसापर्यंत अजूनही पोहचलेल्या नाहीत त्यातलाच एक भाग म्हणजे “श्री शंकर महाराज”. अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेले सत्पुरुष ज्यांनी खूप साधी शिकवण लोकांना दिली आणि वेगवेगळ्या भागांमध्ये फिरून सगळ्या स्थरांमधील लोकांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला... समाजामध्ये जनजागृतीचे कार्य केले. या मालिकेद्वारे प्रेक्षकांना श्री शंकर महाराज यांचा जीवनप्रवास आणि महात्म्य बघायला मिळणार आहे. तसेच त्यांचे कार्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याचा आमचा हेतू आहे”.   

कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड विराज राजे म्हणाले, “जगाच्या पाठीवर मनुष्य कुठेही असला, कुठेही गेला तरी त्याला भक्ती वाचून पर्याय नाही. तुम्हांला ईश्वर चरणी नतमस्तक व्हावंच लागतं आणि हे वैश्विक सत्य आहे. जो गुरुलाच ईश्वर मानतो, त्याच्यावर गुरुकृपा होते आणि त्याचा उद्धार होतो अशी शिकवण देऊन गेलेले महाराष्ट्रातील थोर सत्पुरुष म्हणजे “शंकर महाराज". “योगयोगेश्वर जय शंकर” ही आमची नवी मालिका त्यांच्या जीवन चरित्रावर आधारित आहे. शंकर महाराजांची शिकवण ही शक्य तितक्या सामान्य वर्गापर्यंत किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहचवावी हाच आमचा प्रयत्न असणार आहे. या धकाधकीच्या काळात समाधानी आयुष्य हवं असेल तर भक्तीमार्गासारखा सुवर्ण मार्ग नाही. म्हणूनच 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' आणि 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकांच्या घवघवीत यशानंतर भक्तीरसाने परिपूर्ण आणि प्रत्येक क्षण सुखकर करणारी अशी मालिका सादर करत आहोत. शिरीष लाटकर यांच्या लेखणी मधून साचेबध्द झालेली ही मालिका प्रेक्षकांच्या मनामध्ये नक्की घर करेल अशी आम्ही आशा करतो.”

मालिकेबद्दल बोलताना शिरीष लाटकर म्हणाले, “गेली काही वर्षं सातत्याने हे नाव कानी पडत होतं... ते दत्त संप्रदायाशी निगडित आहेत हे माहित होतं म्हणून कुतूहलाने त्यांचं चरित्र वाचायला घेतलं आणि भारावून गेलो. अतर्क्य वाटाव्यात अशा असंख्य लीलांनी त्यांचं चरित्र भरलेलं आहे. विलक्षण रोमांचक अशा घटना शंकर महाराजांच्या आयुष्यात आहेतच, बरोबरीने  मनुष्य जीवन सोपं आणि समृद्ध करण्याचा गुरुमंत्र त्यांनी आपल्या उक्ती आणि कृतीतून दिला आहे. शंकर महाराजांच्या आयुष्यावर मालिका करता यावी असं खूप मनात होतं आणि त्यांच्याच कृपेने ही सेवा करण्याची संधी मला कलर्स मराठीने उपलब्ध करून दिली. महाराजांची कृपा आणि कार्य अफाट आहे, ते मालिकेच्या माध्यमातून मांडणं खरोखरच कठीण आहे. पण तरीही आम्ही हा प्रयत्न करणार आहोत. कारण शंकर महाराजांचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज आहे. त्यांच्या बालपणापासून ते त्यांच्या महानिर्वाणापर्यंतचा मोठा काळ या मालिकेत असणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने महाराजांच्या आयुष्यातल्या माहित नसलेल्या अनेक घटना लोकांना माहित होतील. शिवाय गेल्या दोनशे वर्षातली सामाजिक आणि अध्यात्मिक स्थित्यंतरं सुद्धा प्रेक्षकांना अनुभवता येतील. शंकर महाराजांची मालिका ही एक जबाबदारी आहे आणि मी ती सर्वतोपरीने पेलण्याचा प्रयत्न करेन, इतकं मी सांगू इच्छितो.”

मालिकेचा सह निर्माता चिन्मय उदगीरकर म्हणाला, मला कधीचं वाटलं नव्हतं शंकर महाराजांवर मालिका बनविण्याची सुवर्णसंधी मला मिळेल. असा विचार देखील डोक्यात कधी आला नाही. पण लहानपणापासून शंकर महाराज कोण हे माहिती होतं. कारण माझ्या घरामध्ये आजोबांच्या काळापासून स्वामी सेवा आहे. मला इतकं नक्कीच माहिती होतं की, स्वामी त्यांना हवं तेच आणि तसंच घडवून आणतात. मला ही संधी मिळणं त्यांचीच कृपा आहे. आणि याचा अनुभव आम्ही सगळेच काम सुरू झाल्यापासून घेत आहोत. खूप आनंद वाटतो आहे माझी पहिली मालिका निर्माता म्हणून शंकर महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित आहे. पहिल्या दिवशी कथा ऐकल्यापासून ते आज शूट सुरू झालं आहे हा प्रवास म्हणजे सगळी स्वामींचीचं लीला आहे. कलर्स मराठीचे खूप आभार

वेश घेतला बावळा, अंतरी शुद्ध ज्ञानकळा ऐसा सदगुरू लाघवी, नाना रंगी जन खेळवी...शंकर महाराज यांचे बालपणापासून ते महानिर्वाणापर्यंतचा प्रवास भक्त उद्धाराचा बाणा, घेऊनि अवतरला कैलासराणा – “योगयोगेश्वर जय शंकर” या मालिकेत बघायला मिळणार आहे. तेव्हा नक्की बघा सत्पुरुषाच्या मंगल चरित्राचा आरंभ - ३० मेपासून संध्या ७.०० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.

No comments:

Post a Comment