Friday, 30 September 2022

पेट्रोलिअम, रसायने आणि पेट्रोकेमिकल्स गुंतवणूक क्षेत्रासाठी नव्याने मार्गदर्शक सूचना आखण्याचा सरकारचा विचार



मुंबई, 30 सप्‍टेंबर 2022

भारत सरकारच्या रसायन आणि खते मंत्रालयाअंतर्गत येणारा  रसायन आणि पेट्रोकेमिकल्स विभाग, फिक्कीसह (FICCI-भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ) संयुक्तपणे, नवी दिल्लीच्या प्रगती मैदानावर 2 - 3 नोव्हेंबर 2022 दरम्यान 12 व्या “इंडिया केम”चे आयोजन करणार आहे. इंडिया केम, हा विभागाचा प्रमुख कार्यक्रम आहे आणि आशिया प्रशांत क्षेत्रातील  रसायने आणि पेट्रोकेमिकल्स उद्योगातील सर्वात मोठ्या संयुक्त  कार्यक्रमांपैकी एक आहे. यात आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाचा समावेश आहे.

इंडिया केम 2022 बाबत माहिती देण्यासाठी  आज मुंबईत एक उद्योग मेळावा आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय रसायने व खते आणि नवीन व  नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उद्योग आणि इतर संबंधितांना त्यांनी  संबोधित केले.   रसायने आणि पेट्रोकेमिकल्स क्षेत्र स्थिर गतीने प्रगती करत आहे आणि भारताला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात या क्षेत्राचे मोठे योगदान असेल, असे खुबा यांनी यावेळी सांगितले.

 

उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी, रसायने आणि पेट्रोकेमिकल्स क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी विभाग अथक प्रयत्न करत असल्याची ग्वाही खुबा यांनी  दिली. “उद्योगाच्या प्रमुख समस्यांचे निराकरण करण्यासाठी  सर्व हितधारकांना सहभागी  करून नियमित बैठका आयोजित करण्याची प्रक्रिया संस्थात्मक करण्याचॆ विभागाची इच्छा  आहे. सहाय्यभूत आराखडे, योग्य पायाभूत सुविधा प्रदान करणे आणि व्यापाराशी संबंधित समस्या हे विभागाचे प्रमुख लक्ष्यीत मुद्दे  आहेत,'' असे ते म्हणाले.

भारत, रसायने आणि पेट्रोकेमिकल्ससाठी जागतिक उत्पादन केंद्र होण्याची  आकांक्षा बाळगत असल्याने या क्षेत्रासाठी पीएलआय अर्थात उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना आणण्याचा रसायने आणि पेट्रोकेमिकल्स विभागाचा   मानस खुबा यांनी व्यक्त केला. पेट्रोलिअम, रसायने  आणि पेट्रोकेमिकल्स गुंतवणूक क्षेत्रसाठी   (पीसीपीआयआर ) धोरणात्मक  मार्गदर्शक तत्त्वे पुन्हा तयार करण्याचा सरकारचा  विचार आहे,असे त्यांनी सांगितले. “आम्ही उद्योगांना त्यांच्य सूचना आणि मते सामायिक करण्याची विनंती केली आहे जेणेकरून  ते अधिक चांगले करता येईल”, असे खुबा यांनी सांगितले.

रसायन आणि पेट्रोकेमिकल्स विभागाचे सहसचिव सुसंता कुमार पुरोहित यांनी इंडिया केम 2022 आणि भारताच्या रसायने आणि पेट्रोकेमिकल्स उद्योगाच्या वाढीच्या संभाव्यतेबाबत सादरीकरण केले.

No comments:

Post a Comment