Saturday 29 April 2023

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी 'इंडिया कॉलिंग कॉन्फरन्स 2023' मध्ये जागतिक पुरवठा साखळीतील छोट्या देशांचे महत्त्व अधोरेखित केले


भारताने 2047 पर्यंत 47 लाख कोटी अर्थव्यवस्थेचे लक्ष्य ठेवले पाहिजे: पीयूष गोयल

मुंबई, 29 एप्रिल 2023 

आयएमसी अर्थात भारतीय मर्चंट्स चेंबर यांच्यातर्फे आयोजित 'इंडिया कॉलिंग कॉन्फरन्स 2023' मध्ये केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल, यांनी उदघाटनपर भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी जागतिक स्तरावर मोठ्या कंपन्यांच्या पुरवठा साखळीत झेक प्रजासत्ताक व पोलंड सारख्या छोट्या देशातील कंपन्यांनी दिलेल्या योगदानाचा आवर्जून उल्लेख केला.

भारताने 2047 पर्यंत 47 लाख कोटी (ट्रिलियन डॉलर) अर्थव्यवस्थेचे लक्ष्य ठेवले पाहिजे, असे आवाहन गोयल यांनी केले. भारताने आपली अर्थव्यवस्था अधिक औपचारिक करण्याचा प्रयत्न केला असून त्यात मोठे यश मिळवले आहे. यश प्राप्त करण्यासाठी संघभावना, स्पर्धात्मकता तसेच सकारात्मकता या गोष्टी आवश्यक आहेत; अशा प्रकारचे चैतन्य मुंबईमध्ये पाहायला मिळते, जी देशाची केवळ आर्थिक राजधानी नव्हे तर भारताची मनोरंजक राजधानी देखील आहे, असेही ते म्हणाले.

जगातील  प्रत्येक भौगोलिक प्रांताला भारताकडून मोठ्या आशा-अपेक्षा आहेत व ते कधीकधी त्रासदायक वाटत असले तरी त्यातून जगाला भारताच्या भविष्याबद्दल असलेला विश्वास प्रतीत होतो, असे ते म्हणाले. "संपूर्ण जगाची एक अर्थव्यवस्था ही भावना भारत प्रतिबिंबित करतो, वाणिज्य उद्योग संघ भारताच्या हिताचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने संपूर्ण लक्ष केंद्रित करून मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींना प्राधान्य देत असला तरी संपूर्ण जगाची भरभराट झाली तरच खरी समृद्धी येईल, अशी भारताची धारणा आहे, असे त्यांनी सांगितले.

भारताने 'लसीकरण मैत्री' अभियानाअंतर्गत जगातील गरीब राष्ट्रांना 278 दशलक्ष इतक्या कोविड प्रतिबंधक लसींचे वितरण केले, कारण जग सुरक्षित असेल तर आपण सुरक्षित असल्याची भारताची विचारसरणी आहे, असे गोयल म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली 'पंचप्राण' ही संकल्पना सत्यात येण्यासाठी संपूर्ण राष्ट्राची वचनबद्धता आवश्यक आहे. भारताच्या स्त्रीशक्ती शिवाय व भ्रष्ट्राचारमुक्ती शिवाय एक विकसित राष्ट्र म्हणून भारताची ओळख होऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. सामाजिक उत्तरदायित्वासाठी उद्योगजगत देत असलेल्या योगदानाबद्दल कौतुक करून आपण सर्व भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी दृढ निश्चय करूया, असे आवाहन त्यांनी केले.

भारत हा उत्पादन क्षेत्रातील जगातील सर्वाधिक पसंतीचे केंद्र म्हणून उदयाला आला आहे, असे सांगून भारतीय मर्चंट्स चेंबरच्या आंतरराष्ट्रीय व्यापार समितीचे अध्यक्ष दिनेश जोशी यांनी 'मेक इन इंडिया' उपक्रमाची यशोगाथा या संमेलनात सांगितली. भारताची स्मार्ट फोनची निर्यात शून्यावरून ९० हजार कोटींपर्यंत वाढल्याचे त्यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स, फार्मा, कापड व सौर उत्पादनांच्या निर्मितीसाठी उत्कृष्टता केंद्रे स्थापन केली जात आहेत, असे ते म्हणाले. भारताने संरक्षण, अंतराळ, जलविद्युत तसेच फिनटेक या क्षेत्रात देखील लक्षणीय प्रगती केल्याचे जोशी यांनी सांगितले.

जीडीपी अर्थात सकल देशांतर्गत उत्पादनानुसार, भारताने 2014 मधील दहाव्या स्थानावरून आता पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे, असे 'आयएमसी'चे अध्यक्ष, अनंत सिंघानिया, यांनी आपल्या स्वागतपर भाषणात सांगितले. सामान्य भारतीय माणसांना त्यांची इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील ओळख मिळवून देण्यासाठी विविध डिजिटल सेवांच्या माध्यमातून केंद्र सरकारने अनेक उपाययोजना केल्याचे व त्यामुळे तंत्रज्ञानाची किंमत कमी झाल्याचे सिंघानिया यांनी सांगितले. भारत सरकारने तयार केलेल्या या व अशा इतर अनुकूल परिसंस्थेमुळे भारतातील स्टार्टअपचे दृष्य बदलले असून भारत आता जगातील स्टार्टअपचे तिसरे मोठे केंद्र बनला आहे, असे ते म्हणाले. भारताने प्रतिवर्ष 1 युनिकॉर्न पासून सुरुवात करून 2021मध्ये 42 युनिकॉर्नपर्यंतचा टप्पा कसा गाठला व दहा वर्षांच्या कालावधीत मोबाईल डेटा वापरणारा पहिल्या क्रमांकाचा देश म्हणून भारत उदयास आला आहे, हे देखील त्यांनी नमूद केले.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी 30 एप्रिल रोजी 'मन की बातचा' 100 वा भाग ऐकण्यासाठी उपस्थितांना त्यांच्यासोबत सामील होण्याचे आमंत्रण देखील दिले.

No comments:

Post a Comment