Monday, 30 September 2024

११ क्षेत्रांतील मान्यवरांचा सुवर्णरत्न सन्मान पुरस्काराने गौरव!चतुरंग प्रतिष्ठानच्या सुवर्ण महोत्सव सांगता सोहळा संपन्न!


मुंबई, (सांस्कृतिक प्रतिनिधी) : माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरामध्ये चतुरंग प्रतिष्ठानचा दिमाखदार सुवर्ण महोत्सव सांगता सोहळा रंगला. अतिशय देखणा असा हा सोहळा पाहण्यासाठी रसिकांनी प्रचंड गर्दी केली होती. पुरस्कार सोहळ्याला मनोरंजनपर कार्यक्रमाची जोड दिल्याने हा सोहळा अधिकच रंगतदार ठरला. प्रेक्षकांनी या सोहळ्याला भरभरून दाद दिली.

सोहळ्याच्या पहिल्या दिवशी चतुरंगचे दिवंगत पायाभरणीकर असलेले स्व. गणेश सोळंकी, स्व. प्रफुल्ला डहाणूकर, स्व. विनोदभाई दोशी, स्व. एस. वाय. गोडबोले गुरुजी, स्व. विद्याधर गोखले(अण्णा), श्री. रमेशभाऊ महाजन यांच्या कार्याला कृतज्ञ वंदन करण्यात आले. दुसऱ्या दिवशी 'चतुरंग सुवर्णरत्न सन्मान' समारंभ पार पडला. यामध्ये पं. उल्हास कशाळकर (गायन), पं. हरिप्रसाद चौरसिया (वादन), अशोक पत्की (संगीत दिग्दर्शन), महेश एलकुंचवार (साहित्य), दिलीप प्रभावळकर (नाटक), रोहिणी हट्टंगडी (चित्रपट), वासुदेव कामत (चित्रकला), चंदू बोर्डे (क्रीडा), डॉ. अनिल काकोडकर (संशोधन) बाबासाहेब कल्याणी (उद्योजकता), मेजर महेश कुमार भुरे (राष्ट्रीय सुरक्षा) या ११ क्षेत्रांतील नामवंत गुणवंतांच्या कारकिर्दीला 'चतुरंग सुवर्णरत्न सन्मान' प्रदान करून सलाम करण्यात आला. या सोहळ्याला अॅड. उज्वल निकम, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. यावेळी जेष्ठ अभिनेते राजदत्त, मोहन जोशी, मनोज जोशी, अशोक समेळ, दीपक करंजीकर, सुहास बहुळकर, जे बी जोशी, एअरमार्शल हेमन भागवत, विजय केंकरे, मृदुला दाढे जोशी, मिलिंद जोशी, देवकी पंडित, श्रुती भावे चितळे, डॉ सागर देशपांडे, विठ्ठल कामात, उदय देशपांडे आदी मंडळी उपस्थित होती. डॉ. मोनिका गजेंद्रगडकर यांनी महेश एलकुंचवार यांच्या वतीने, तर गणेश चंदन यांनी बाबासाहेब कल्याणी यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारला. मेजर महेश कुमार भुरे यांना पुरस्कार प्रदान करताना त्यांना रसिकांनी उभे राहून मानवंदना दिली.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना  प्रभावळकर म्हणाले की, वसंत कानेटकर यांच्या नावाचा पुरस्कार हा त्यांचा आशीर्वाद समजतो. आजवरच्या कारकिर्दीतील सर्व सह कलाकारांच्या वतीने पुरस्कार स्वीकारतो. तसेच सर्व नाटककाराना कृतज्ञातपूर्वक अर्पण करतो. लेखक असल्याने नि:शब्दतेतील बोलकेपणा समजतो असे म्हणत कधीच दिग्दर्शकाच्या कामात व्यत्यय आणत नसल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, मी लेखक आणि अभिनेता असल्याने लेखकाला काय म्हणायचे ते समजून घेता येते. व्यक्तिरेखेची तयारी करण्याबाबत सांगायचे तर वाचिक अभिनयातून गंगाधर टिपरे सापडले. अलबत्या गलबत्या मधील चेटकीण रंगभूषेतून समजत गेली. तयारीने रोल करायला आवडतात. झपाटलेलामधील तात्या विंचू सहजपणे करता आला, तर चौकट राजाधील रोल दबावाखाली केल्याचेही त्यांनी सांगितले. दिग्दर्शक विजय केंकरे यांनी दिलीप प्रभावळकर यांना प्रश्न विचारून दिलखुलास संवाद साधला.

माझा पुढचा जन्म महाराष्ट्रात व्हावा अशी इच्छा व्यक्त करत पंडित हरिप्रसाद चौरसिया म्हणाले की, इतकी वर्षे महाराष्ट्रात राहात असल्याने अलाहाबादमध्ये जन्मल्याचे विसरून गेलो. मी इथे का नाही जन्मलो असा प्रश्न नेहमी पडतो. माझा पुढचा जन्म महाराष्ट्रमध्ये व्हावा, असा रसिकांनी आशीर्वाद द्यावा असेही ते म्हणाले. प्रसिद्ध शास्त्रज्ञ ज्येष्ठराज जोशी काकोडकर यांना उद्देशून म्हणाले की, डॉ. काकोडकर आपल्या देशाचे 'ओपनहायमर' आहेत. काकोडकर म्हणाले की, चतुरंगसारखी संस्था सर्वांगीण कामे करत आहे. प्रत्येकाला आपली जागा दाखवण्याचे काम ही संस्था करत असल्याचेही ते गंमतीने म्हणाले.

देवकी पंडित यांनी ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्याबद्दल गौरवोद्गार काढत म्हणाल्या की, अशोक पत्की यांच्या संगीतात अभिजात संगीताचे बीज असल्याचे जाणवते. त्यामुळेच त्यांच्या संगीतरचना अजरामर होतात. राग संगीताचे भावविश्व त्यांच्या छोट्याशा रचनेतही पाहायला मिळते असेही त्या म्हणाल्या. यासोबतच देवकी यांनी आभाळमाया या गाजलेल्या मालिकेच्या शीर्षकगीताचे सुरेल सूर छेडले. चतुरंग च्या चतुर रसिकांनी त्यांना उत्स्फूर्तपणे दाद दिली.

ऍड. उज्ज्वल निकम यांनी आपल्या अनोख्या वकिली शैलीत संवाद साधत रसिकांची मने जिंकली. ते म्हणाले की, वकिलाला भाषणाची आणि फुकट बोलायची सवय नसते, पण महनीय व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी इथे आल्याचे उज्ज्वल निकम म्हणाले. इथे आल्याने आपणही चतुरंग बनल्याचेही ते म्हणाले.

विनोद तावडे यांनी पुरस्कार विजेते सर्व देव माझ्या पाठीशी होते अशी भावना व्यक्त केली. इथले चांगले ते घेऊन जाणार आहे. चतुरंगपासून कधीच दूर जाणार नाही. तरुण प्रेक्षकांची गती वाढविण्याकडे लक्ष द्यायला हवे असेही त्यांनी सूचित केले. डिजिटलचा अवलंब करायला हवा आणि चतुरंग आता दिल्लीत व्हायला हवा असेही ते म्हणाले.

चित्रपटांची निवड करताना आपण फारशी चुझी बनत नसल्याचे रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या. छोटे पण चांगले रोल्स केले. नाटकांमध्ये माझ्यासाठी असलेलेच रोल ऑफर करण्यात आले. आपण दिग्दर्शकाची अभिनेत्री असल्याचे मान्य करते असे त्या म्हणाल्या. जयदेव यांनी कधीच मला दिग्दर्शक म्हणून काही सूचना दिल्या नाहीत असेही रोहिणी म्हणाल्या.

या सोहळ्याच्या पहिल्या दिवशी अभिनेत्री-नृत्यांगना शर्वरी जमेनीसने नृत्यवंदना देत अर्ध्य सादर केले. सौमित्र पोटेने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकारांची मुलाखत घेतली. यात सचिन गोस्वामी, सचिन मोटे, पृथ्विक प्रताप, रोहित माने, शिवाली परब यांनी सहभाग घेतला. दुसऱ्या दिवशी कविवर्य कुसुमाग्रज आणि नाटककार वि. वा.  शिरवाडकर समोरासमोर आले तर त्यांच्यामध्ये कशा प्रकारच्या गप्पा रंगू शकतात याची झलक दाखवणारा 'हा सूर्य... हाच चंद्र!' नाट्य प्रयोग सादर करण्यात आला. सौ. धनश्री लेले यांनी लिहिलेल्या आणि दिग्पाल लांजेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या प्रयोगात अजय पूरकर आणि दीपक करंजीकर यांनी काम केले. प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, शमिका भिडे यांच्या आवाजात रसिकश्रोत्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या सर्व प्रकारच्या गाण्यांची 'ओठांवरची आवडती गाणी' ही संगीत मैफल रंगली

No comments:

Post a Comment