Wednesday, 6 November 2019

दिग्दर्शक आणि माणूस म्हणूनही संजय जाधव अगदीच कूल आहे - दीप्ती सती

दक्षिणेकडील सिनेमांमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीप्ती सती हिने लकी या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. येत्या रविवारी १० नोव्हेंबरला हा चित्रपट 'झी टॉकीज'वर पाहाण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या या अभिनेत्रीशी, 'वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर'च्या निमित्ताने मारलेल्या गप्पा;
१. चित्रपटातील भूमिकेचे तुझ्याशी काही साधर्म्य आहे का?
चित्रपटात मी 'जिया'ची भूमिका करते आहे. जिया ही एक सालस, निरागस आणि गुणी मुलगी आहे. तिचा सहृदयी स्वभाव आणि कुठल्याही गोष्टीविषयी ठाम मत असण्याची वृत्ती हे गुण उत्तम आहेत. स्त्री-पुरुष समानतेविषयी तिचे मत सकारात्मक आहे. शिवाय सोशल मीडिया हा तिच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. थोडक्यात सांगायचं झालं, तरं आजच्या काळातील कुठल्याही मुलीची प्रतिमा आपल्याला जियामध्ये पाहायला मिळते. त्यामुळे जिया आणि माझ्यात साम्य आहे, असं मी नक्कीच म्हणेन. 
२. मराठी सिनेसृष्टीतील एक उत्कृष्ट दिग्दर्शक संजय जाधव यांच्यासोबत, लकीच्या निमित्ताने तू पहिल्यांदाच काम केलेस. हा अनुभव कसा होता?
मराठीत पदार्पण करत असतानाच संजय जाधवसारख्या दिग्दर्शकासोबत काम करायला मिळालं याचा मला खूप आनंद आहे. दिग्दर्शक आणि माणूस म्हणूनही तो अगदीच कूल आहे. त्याच्यासोबत काम करत असताना मनात कुठलीही धाकधूक नसते. मनात असेल ते स्पष्टपणे बोलता येत असल्याने काम उतरित्या होतं. चित्रपटात त्याला कुठल्याही कलाकाराकडून काय अपेक्षित आहे, कुठलाही प्रसंग प्रेक्षकांपर्यंत कसा योग्यप्रकारे पोचवता येईल हे त्याला नेमकं ठरू असतं. ते समजावण्याची त्याची हातोटी सुद्धा उत्तम आहे. त्याच्यासोबत नेहमी काम करायला मिळावं अशी अशा मी नक्कीच ठेवली आहे.
३. सहकलाकारांसोबत काम करण्याचा तुझा अनुभव नेमका कसा होता?
मी मगाशी म्हणाले त्याप्रमाणे, संजय जाधव सारखा दिगर्शक मिळण्यासाठी भाग्य लागतं. सेटवरील वातावरण खेळीमेळीचं असल्याने सगळ्याच कलाकारांशी माझी उत्तम गट्टी जमली. कलाकारांशी मैत्री झाल्यावर काम करायची मजा वेगळी असते. केवळ कलाकारच नाही, तर टीममधील इतर सगळ्यांशी सुद्धा छान नातं निर्माण झालं होतं. चित्रपटाची संपूर्ण टीम, एखाद्या कुटुंबाप्रमाणे एकत्र काम करत होती. ज्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करायची असते, त्यांच्यासोबतच इतरांशी सुद्धा समन्वय असणं गरजेचं ठरतं. हा अनुभव या चित्रपटाच्या निमित्ताने घेता आला.  
४. चित्रीकरणादरम्यानची एखादी आठवण आम्हाला सांगशील का?
अभयला या चित्रपटात एक विवस्त्र प्रसंग चित्रित करायचा होता. मलादेखील बिकिनी सीन करावा लागणार होता. त्यामुळे 'फिगर' नीट ठेवणं फार गरजेचं होतं. मी आणि अभय पहिल्या दिवसापासूनच, याविषयी एकेमकांना प्रोत्साहन देत होतो. फावल्या वेळात चहा-नाश्ता केला जात असताना, मला अनेकदा चमचमीत खाण्याची हुक्की येत असे. मनावर फार ताबा ठेवला असला, तरी काहीवेळा थोडंफार खाणं होत असे. एकदा अभयने मला काहीतरी खाताना बघितलं त्यावेळी तो पोट धरून हसत सुटला होता. माझ्या मराठी उच्चारावरून अनेकवेळा अभय माझी मस्करी करायचा. मी चांगल्याप्रकारे मराठी बोलत असले, तरीही हा आमच्या चेष्टेचा विषय ठरलेला असायचा. चित्रपटाचं बरंचसं चित्रीकरण गोव्यात झालेलं असल्याने, शूट संपवून बीचवर फिरायला जाण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करत असू. त्यामुळे गोव्यात सुद्धा खूप धमाल केली आहे. 
५. हा सिनेमा एका वेगळ्या धाटणीचा आहे. प्रेक्षकांनी तो का पाहावा असं तुला वाटतं?
तरुणवर्ग या चित्रपटाशी खूप छान कनेक्ट होऊ शकतो. एक वेगळ्या प्रकारचा चित्रपट असूनदेखील आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांशी त्याचा संबंध सहज जोडला जाऊ शकतो. हा एक अतिशय मजेदार सिनेमा आहे. आजच्या काळातील तरुणाईला नक्की आपलासा वाटेल असा हा चित्रपट आहे. चित्रपट पाहताना त्या कथानकाशी तरुणाई निश्चितपणे जोडली जाईल. म्हणूनच हा चित्रपट सर्वांनी नक्की पाहावा. रविवारी १० नोव्हेंबरला, झी टॉकीजवर दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता हा चित्रपट पाहायला मिळणार आहे.

No comments:

Post a Comment