Showing posts with label 'साजणा'. Show all posts
Showing posts with label 'साजणा'. Show all posts

Wednesday, 28 August 2019

'साजणा' मालिकेच्या सेटवर, वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन!!

'झी युवा' वाहिनीवरील 'साजणा' ही मालिका अल्पावधीतच फार लोकप्रिय झाली. प्रताप आणि रमा यांची ही प्रेमकहाणी हिट झाली आहे. यात संपूर्ण टीमची मेहनत महत्त्वाची होतीच, पण कलाकारांचं एकमेकांप्रती असलेलं प्रेम, हेदेखील याचे एक महत्त्वाचे कारण आहे. नुकतेच या मालिकेचे १०० भाग पूर्ण झाले आहेत. हा आनंदाचा दिवस मालिकेच्या सेटवर साजरा करण्यात आला. याच दिवशी, 'साजणा'मधील रमा, अर्थात पूजा बिरारी हिचा वाढदिवस होता. सेटवर तिचा वाढदिवस सुद्धा दणक्यात साजरा करत, कलाकारांनी त्यांच्यातील मैत्री आणि प्रेमाचे बंध उत्तम असल्याचं दाखवून दिलं. 
'साजणा' या मालिकेतून पूजाने छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. चित्रीकरणासाठी घरापासून व कुटुंबापासून तिला लांब राहावे लागते. पण, तिच्या वाढदिवसाचे निमित्त साधून, तिच्या आईवडिलांना सेटवर बोलावून घेण्यात आलं होतं. पूजासाठी, हे यंदाच्या वाढदिवसाला मिळालेलं सर्वात मोठं गिफ्ट ठरलं. तिचे आईवडील पहिल्यांदाच मालिकेच्या सेटवर आले आणि तेदेखील तिच्या आयुष्यातील खास दिवशी! सहकलाकारांचे हे प्रेम बघून ती फारच खुश झाली. तिच्यासाठी हा वाढदिवस खूपच खास ठरला आहे. वाढदिवसाचे औचित्य असल्याने, केक सुद्धा कापण्यात आला. कुटुंबापासून लांब राहत असूनही, कुटुंबासोबतच राहत असल्याचा अनुभव पूजाला यानिमित्ताने आला. 
मालिकेच्या सेटवर मिळालेल्या या सरप्राईजबद्दल भावना व्यक्त करत असतांना पूजा म्हणाली;
"वाढदिवसाच्या दिवशी आई-बाबा इथे आहेत ही माझ्यासाठी फार आनंदाची बाब आहे. संपूर्ण टीमचे आभार नक्की कसे मानावेत, हेच मला यावेळी सुचत नाही आहे. अर्थात, हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय वाढदिवस ठरणार आहे. याचं संपूर्ण श्रेय 'साजणा' मालिकेच्या संपूर्ण टीमला जातं."

Monday, 19 August 2019

'साजणा' झाला शंभरीचा...

एखादी मालिका लोकप्रिय होऊ लागली, की मालिकेचे १०० भाग पूर्ण होणे, हा यशाचा पहिला मोठा टप्पा असतो. यशाकडे सुरू झालेली ही वाटचाल नेहमी साजरी केली जाते. 'झी युवा' वाहिनीवरील 'साजणा' या मालिकेने यशाचा हा पहिला टप्पा नुकताच गाठला आहे. निर्मळ प्रेमकहाणी असलेली ही रमा आणि प्रताप यांची कथा, लोकप्रियतेच्या एका वेगळ्या उंचीवर पोचली आहे. अभिजित श्वेतचंद्र आणि पूजा बिरारी यांचा सहजसुंदर अभिनय, खेडेगावातील संस्कृती आणि तिथली आधुनिकता यांचा सुंदर मिलाफ; याच्या जोरावर मालिकेने हा टप्पा गाठला आहे. प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करण्यात मालिका यशस्वी ठरली आहे. 
हे यश मालिकेच्या सेटवर साजरं करणं, हे ओघाने आलंच. संपूर्ण टीमच्या उपस्थितीत केक कापून हा दिवस साजरा करण्यात आला. प्रत्येक सदस्याने एकमेकांचे अभिनंदन केले. या यशात सर्वांचाच मोठा वाटा आहे. या मालिकेने आपल्या आजवरच्या प्रवासात प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. प्रेक्षकांकडून कौतुक होत असल्याचं आणि अमाप प्रेम मिळत असल्याचं, कलाकार अगदी आवर्जून सांगतात. मालिकेच्या सेटवर या यशाचा आनंद द्विगुणित झाला, तो अभिनेत्री पूजा बिरारी हिच्या वाढदिवसामुळे! तिच्यासाठी एक अनोखी भेट, म्हणून तिच्या आई-वडिलांना सुद्धा सेटवर बोलावण्यात आलं होतं. मालिकेतील कलाकारांकडून सुद्धा पूजाला मिळत असलेलं कुटुंबाचं प्रेम बघून, तिचे वडीलदेखील भारावून गेले. 
मालिकेच्या या यशाबद्दल बोलताना पूजा म्हणाली;
"साजणा मालिकेने शंभर भागांचा टप्पा गाठला यात प्रेक्षकांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे. सुरुवातीपासूनच त्यांचं प्रेम आम्हाला लाभलं, हे आमचं भाग्य आहे. पडद्यामागचे कलाकार हे नेहमीच अशा यशात फार मोठा वाटा उचलत असतात. त्यामुळे आनंद साजरा करत असतांना, त्यांना यात सहभागी करून घेणं, ही त्यांच्या कामाला मिळणारी खरी पोचपावती असते. मालिकेच्या यशाचा पहिला टप्पा साजरा केला जात असतांना, माझा वाढदिवस सुद्धा सेटवर साजरा झाला असल्याने, हा दिवस आणखी आनंदाचा आणि अविस्मरणीय ठरणार आहे."