अंबर भरारी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आयोजित ५ व्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाची नामांकने आज जाहीर करण्यात आली. महोत्सवामध्ये दाखल झालेले बहुतेक सर्वच चित्रपट आशय, विषय हाताळणी, तांत्रिक बाबी, दिग्दर्शन, निर्मिती मूल्य इ. निकषांमध्ये सरस असल्याने नामांकनामध्ये मोठी चुरस बघावयास मिळत आहे.
महोत्सवात दाखल एकूण ४७ पैकी २८ चित्रपट नामांकनाच्या यादी मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यामध्ये ‘माई घाट क्राईम न. १०३/२००५’, ‘ट्रिपल सीट’, ‘एक निर्णय’,’फत्ते शिकस्त’, ‘गर्लफ्रेंड’, ‘कोती’, ‘व्हॉट्सअप लव’, ‘बोला अलख निरंजन’ या चित्रपटांनी विविध विभागांमध्ये नामांकने मिळवत बाजी मारली आहे.
घोषित पुरस्कारांमध्ये ‘बोला अलख निरंजन’ साठी डॉ.अमोल कोल्हे यांना तर ‘माई घाट क्राईम न. १०३/२००५’साठी उषा जाधव यांना ‘विशेष परीक्षक पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.
ज्येष्ठ कला दिग्दर्शक मनोहर आचरेकर यांना ‘ तंत्रज्ञ गौरव पुरस्कार’ तर समीक्षक,संपादक संतोष भिंगार्डे यांना ‘ सिने पत्रकारिता गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.
आपल्या अवीट गोडीच्या गाण्यांनी विविध माध्यमांतून रसिकांना आनंद देणाऱ्या ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांना ‘कारकीर्द सन्मान पुरस्कार’ घोषित करण्यात आला आहे.
गेली पन्नास हून अधिक वर्षे विविध भूमिकांच्या माध्यमातून आपल्या दर्जेदार अभिनयाचा ठसा उमटवणारे बुजुर्ग कलाकार किशोर नांदलस्कर यांना यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
दि.१२ जानेवारी अंबरनाथ मध्ये मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतल्या नामवंत मान्यवरांच्या रंगणाऱ्या दिमाखदार पुरस्कार सोहळ्यामध्ये या पुरस्काराचे वितरण केले जाईल असे महोत्सव आयोजक अंबर भरारी संस्थापक सुनील चौधरी, अखिल भारतीय मराठीचित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, महोत्सव व्यवस्थापक निखील चौधरी आणि महोत्सव दिग्दर्शक महेंद्र पाटील यांनी जाहीर केले आहे.
No comments:
Post a Comment