मुंबई, 1 ऑक्टोबर 2024: वृद्ध व्यक्तींच्या आंतरराष्ट्रीय दिवसाच्या (IDOP) निमित्ताने, वरिष्ठ नागरिकांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी आणि दोन पिढ्यांमधील संबंध सुदृढ करण्यासाठी आज हेल्पएज इंडियाने मुंबईत #जनरेशन्सटुगेदर अभियान सुरू केले. या अभियानाचा उद्देश जुन्या आणि नव्या पिढीतील संबंध मजबूत करण्याचा आहे. या समारंभाची सुरुवात एका वॉकेथॉनने झाली, ज्यामध्ये विद्यार्थी, जेष्ठ नागरिक आणि मान्यवरांसहित 150 पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आणि भाषणे झाली, ज्यात वयोवृद्धांच्या देखभालीचे आणि समाजाच्या हातभाराचे महत्व अधोरेखित करण्यात आले.
या समारंभात महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे (MSJE) माजी संयुक्त सचिव श्री. दिनेश डिंगळे, FESCOM चे अध्यक्ष श्री. अण्णा साहेब टेकाळे, कूपर हॉस्पिटल येथे कम्युनिटी मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. रविंद्र किंभावी, एम. एम. पी. शाह महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आर्चना पाटकी; मुंबईच्या टिळक इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्कच्या वरिष्ठ प्राध्यापिका सुश्री. आशा बानू सोलिटे; हेल्पएज इंडियाचे संयुक्त संचालक श्री. वेलेरियन पाइस; आणि हेल्पएज इंडियाच्या संचालिका श्रीमती. राजेश्वरी चौधरी यांसारखे मान्यवर उपस्थित होते. त्यांनी वयोवृद्धांचे कल्याण आणि समाजाचा पाठिंबा याबाबत आपले विचार मांडले.
सांस्कृतिक कार्यक्रमात रायन ग्रुप ऑफ स्कूल्स, MMP शाह कॉलेजचे विद्यार्थी आणि काही वृद्ध मंडळींचा सहभाग होता. उपस्थित प्रेक्षकांनी रोचक अंताक्षरी स्पर्धेचा आस्वाद घेतला, ज्यामध्ये विद्यार्थी आणि वरिष्ठ नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला होता.
देशाच्या राजधानीत हेल्पएज इंडियाची ऑनररी ब्रँड अम्बॅसडर म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री, पद्मभूषण शर्मिला टागोर यांना घेतल्याचे हेल्पएजने जाहीर केले. श्रीमती शर्मिला टागोर यांनी दिल्लीत या अभियानाचा शुभारंभ केला.
दिल्ली येथील समारंभात आपला उत्साह व्यक्त करताना श्रीमती शर्मिला टागोर म्हणाल्या, “मी आता आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे की मी आता मला हवे असलेले, मला झेपेल असे काम निवडते. हेल्पएज इंडियाची ब्रॅंड अम्बॅसडर म्हणून माझ्या भूमिकेशी मी वचनबद्ध आहे. मला आशा आहे की, माझ्या असण्याने नक्कीच काही तरी फरक पडेल आणि मी वयोवृद्धांच्या समस्यांना वाचा फोडणारा आवाज बनू शकेन, जागरूकता आणू शकेन आणि या कामात हातभार लावण्यासाठी अधिक जोमाने पुढे येण्यास लोकांना विनवू शकेन. ‘सर्व वयाच्या लोकांसाठी असलेल्या समाजाकडे’ हे आजचे थीम आहे, जे अत्यंत आवश्यक असेच आहे, पण एक पद्धतशीर बदल घडवून आणला पाहिजे. याचा अर्थ प्रत्येकाने आपापली भूमिका प्रामाणिकपणे निभावली पाहिजे, मग तो नागरिक समाज असो, शैक्षणिक संस्था असो, कॉर्पोरेट्स, परोपकारी संस्था, पब्लिक सेक्टर, धोरण निर्माते असोत किंवा तरुण आणि आपण स्वतः असोत.”
हेल्पएज इंडियाचे CEO श्री. रोहित प्रसाद म्हणाले, “#जनरेशन्सटुगेदर अभियानाचा उद्देश दोन पिढ्यांमधील संवादाला प्रोत्साहन देणे, त्यांच्यात संभाषण, संबंध आणि सहयोग वाढविणे हा आहे, जेणेकरून आपण वृद्धांप्रति अधिक संवेदनशील असलेला समाज निर्माण करू शकू. आज आपण वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करत आहोत, तेव्हा एका एकसंध समाजाच्या उभारणीसाठी दोन पिढ्यांमधील संबंध अधिक सुदृढ असण्याची गरज आपण लक्षात घेतली पाहिजे. एक असा समाज ज्यात तरुण लोक वयोवृद्धांकडून जीवनाचे काही मौल्यवान धडे शिकू शकतील आणि वृद्ध लोक देखील तरुणांकडून सतत बदलणाऱ्या डिजिटल जगाशी कसे जुळवून घ्यायचे यांसारखे काही धडे घेऊ शकतील. त्यामुळे ‘सर्व वयाच्या लोकांसाठी असलेल्या समाजाकडे’ हे थीम आजच्या काळात फारच संबद्ध आहे. आम्ही नवीन संधी खुल्या होण्याची प्रतीक्षा करत आहोत आणि विविध हितधारकांसोबत काम करण्यास उत्सुक आहोत. या सहयोगातून वयोवृद्धांसाठी एक अधिक सक्षम वातावरण आणि अधिक कनवाळू आणि समावेशक समाज उभा होऊ शकेल.”
वेलेरियन पाइस, संयुक्त संचालक, हेल्पएज इंडिया म्हणाले, ““#जनरेशन्सटुगेदर अभियानाबाबत आम्ही फार रोमांचित आहोत, कारण लहान थोर सर्वांना एकत्र आणण्याची मोठी क्षमता या अभियानात आहे. आमच्या ‘स्टुडंट अॅक्शन फॉर व्हॅल्यू एड्युकेशन’ प्रोग्रामच्या माध्यमातून या अभियानाचा आम्ही प्रसार करू शकू आणि अधिकाधिक शाळा आणि विद्यार्थ्यांपर्यंत ही मोहीम पोहोचू शकेल अशी आम्हाला आशा आहे. या विद्यार्थ्यांच्या मोहिमेत आमच्या सीनियर सिटीझन्स असोसिएशन नेटवर्कमधील ज्येष्ठ नागरिक सामील होतील. मुंबईमध्ये आम्ही आमच्या डिजिटल लिटरसी प्रोग्राम, मजेदार सांस्कृतिक क्रियाकलाप आणि प्रोजेक्ट भेटींसहित इतर कार्यक्रमांच्या माध्यमातून खास करून दोन पिढ्यांमध्ये संधी उत्पन्न करण्यावर भर देत आहोत.”
या समारंभात वृद्धांच्या देखभालीत मदत करण्याच्या समर्पित कार्याबद्दल प्रयत्न कम्युनिटी सेंटर (मालाड) आणि रोशनी गृह सेंटर (पोइसर) या दोन भागीदारी संस्थांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. सर्व मान्यवर, सहभागी आणि भागीदार यांचे हा समारंभ यशस्वी करण्यासाठी त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानून या समारंभाची सांगता झाली.
No comments:
Post a Comment