जुन्या आठवणींना उजाळा देतेय - गौतमी देशपांडे
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला गेला आहे आणि जवळपास दीड महिन्यापासून सर्वजण आपल्या घरी आहेत. घरी बसून अनेकांना नैराश्य येणं साहजिक आहे पण या वाईटातून देखील काहीतरी चांगलं शोधणं आपल्या हातात आहे असं अभिनेत्री गौतमी देशपांडे म्हणतेय. झी मराठीवरील माझा होशील ना ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आणि त्यातील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. पण लॉकडाऊनमुळे सध्या मालिकांचं चित्रीकरण देखील बंद आहे त्यामुळे प्रेक्षकांची लाडकी सई म्हणजेच अभिनेत्री गौतमी देशपांडे ही तिच्या घरी तिच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवतेय.
या लॉकडाऊनमध्ये ती काय करतेय यावर गौतमी म्हणाली, "आपण सगळे आता घरी कुटुंबियांसोबत एकत्र आहोत. आपल्याला इतकी मोठी सुट्टी याआधी कधीच नाही मिळाली त्यामुळे मी घरच्यांसोबत वेळ घालवतेय. कामाच्या गडबडीत अनेक गोष्टी करायच्या राहून जातात त्यामुळे मी वाचन, कविता लिहिणं, गाण्याचा रियाझ हे सगळं नित्यनियमाने करतेय. घरकामात मी हातभार लावतेय, अल्बममधील जुने फोटो बघून जुन्या आठवणींना उजाळा देतेय. हा मिळालेला वेळ सगळ्यांनी सत्कारणी लावला पाहिजे. या सुट्टीत आपण आपले छंद जोपासू शकतो. मुंबई पुणे सारख्या शहरात मी आजपर्यंत इतकी शांतता कधीच अनुभवली नाही आहे, ती शांतता मी आता अनुभवतेय."
No comments:
Post a Comment