सिद्धार्थ जाधव याचे अनेक एनर्जेटिक डान्स परफॉर्मन्स सगळ्यांनीच अनुभवले आहेत. याच जबरदस्त डान्सरने, 'डान्स महाराष्ट्र डान्स' या स्पर्धेत परीक्षक म्हणून सुद्धा आपली छाप पाडली होती. आज लॉकडाऊनच्या निमित्ताने हा कार्यक्रम पुन्हा पाहण्याची संधी मिळणार आहे. 'झी युवा' वाहिनी ही सुवर्णसंधी प्रेक्षकांसाठी घेऊन आलेली आहे. सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजता या वाहिनीवर हा अप्रतिम कार्यक्रम पाहता येईल. त्याविषयी सिद्धार्थशी बातचीत केली असता, त्याने मनमोकळ्या गप्पा मारल्या.
१. 'झी युवा'वर 'डान्स महाराष्ट्र डान्स'चे फेरप्रक्षेपण होणार आहे. कुटुंबासोबत हा कार्यक्रम पाहण्याची संधी आता तुला मिळणार आहे. याविषयी काय सांगशील?
'झी युवा'वर फेरप्रक्षेपण होणार असल्याचा आनंद आहे. 'डान्स महाराष्ट्र डान्स'मधून अनेक गुणी डान्सर होते. ही उत्तम स्पर्धा पुन्हा अनुभवण्याची संधी, 'झी युवा' वाहिनी लॉकडाऊनच्या निमित्ताने घेऊन आलेली आहे. मी सुद्धा कुटुंबासोबत सोमवार ते शुक्रवार हा कार्यक्रम पाहणार आहे. रोज संध्याकाळी ८ वाजता, 'डान्स महाराष्ट्र डान्स' बघत, मी कुटुंबासोबत छान एन्जॉय करणार आहे.
२. 'डान्स महाराष्ट्र डान्स'च्या निमित्ताने पहिल्यांदाच तू नृत्यस्पर्धेचे परीक्षण केलंस. त्यावेळच्या भावना काय होत्या?
कुठल्याही स्पर्धेचे परीक्षण करावे, इतका मोठा मी अद्याप झालेलो नाही. त्यामुळे मी परीक्षण करण्यासाठी आधी नकार दिला होता. स्पर्धकांना कुणीतरी आपलं वाटावं, त्यांच्याशी मित्रत्वाच्या नात्याने गप्पा माराव्यात असं वाटलं, म्हणूनच या कार्यक्रमाचे परीक्षण करण्यास मी तयार झालो. परीक्षण करण्याच्या निमित्ताने त्यांच्याशी कनेक्ट होता यावं, ही भावना मनात होती. अनेक कलाकार या निमित्ताने भेटले, त्यांच्याकडून सुद्धा अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. परीक्षक म्हणून माझा अनुभव खूपच छान होता.
३. नृत्यकलेविषयी तुला काय वाटतं?
नृत्य, हे आपल्या भावना व्यक्त करण्याचं सर्वोत्तम साधन आहे. मी डान्सचा मनापासून खूप आनंद घेतो. अनेक स्पर्धांमध्ये मी, स्वतः सुद्धा स्पर्धक म्हणून भाग घेतला आहे. नृत्यामधून भावना व्यक्त करणं मला खूप आवडतं.
४. फुलवा खामकर आणि आदित्य सरपोतदार हेदेखील या कार्यक्रमाचे परीक्षण करत होते. तुमच्यातील मैत्रीबद्दल आम्हाला सांग. लॉकडाऊन संपल्यानंतर तुमचा भेटण्याचा काही प्लॅन होईल का?
फुलवा ताई आणि आदित्य यांना मी खूप मिस करतो. फुलवा ताईने अनेक सिनेमांमध्ये माझी कोरिओग्राफर म्हणून काम केले आहे. त्या दोघांसोबत एकत्र काम करायला खूप मजा आली. लॉकडाऊन संपल्यावर आम्ही नक्कीच भेटू. 'डान्स महाराष्ट्र डान्स' पुन्हा दाखवलं जाणार आहे, त्यामुळे अनेक आठवणींना उजाळा मिळेल आणि भेटण्यासाठी हे एक उत्तम कारणठरेल , याचा विश्वास आहे.
५. 'डान्स महाराष्ट्र डान्स'च्या सेटवरील काही खास आठवणी आहेत का?
खूप. या सेटवरून मी खूप आठवणी घेऊन बाहेर पडलोय. सद्दामने माझ्यावर आधारित असलेला परफॉर्मन्स करणं असो, किंवा झिंगाट गाण्यावर वेगळ्या पद्धतीने केला गेलेला डान्स; प्रत्येक नृत्य बहारदार आणि दर्जेदार होतं. पालिकेच्या एका शाळेतील मुलांचा ग्रुप अनेकदा अप्रतिम डान्स करून प्रेक्षकांना आणि आम्हालाही खुश करायचा. वेगवेगळ्या प्रकारची अनेक नृत्य पाहण्याची संधी मला त्यावेळी मिळाली होती.
मला सरप्राईझ देण्यासाठी, एकदा माझ्या आईला सेटवर बोलावलं गेलं होतं. तो माझ्याकरिता खूप भावनिक करणारा अनुभव होता. मी परीक्षक असलेल्या स्पर्धेच्या सेटवर माझ्या आईने माझ्याविषयी अभिमानाने बोलणं, ही आठवण माझ्यासाठी अविस्मरणीय ठरणार आहे.
६. मनावरील ताणतणाव दूर करण्यासाठी, नृत्यकला बऱ्याचदा उपयोगी ठरते. हा कार्यक्रम पुन्हा पाहताना, प्रेक्षकांच्या मनावरील ताण हलका होण्यास मदत होईल, असं तुला वाटतं का?
नृत्य म्हटलं, की भावना, एनर्जी, आनंद या सगळ्याच गोष्टी ओघाने येतातच. 'डान्स महाराष्ट्र डान्स'च्या मंचावर अनेक सकारात्मक अनुभव आम्ही घेतले आहेत. सध्याच्या परिस्थितीत मनावरील ताण हलका करण्यासाठी, हा कार्यक्रम पाहणे नक्कीच उपयोगी ठरेल. मी आधी म्हणालो त्याप्रमाणे, नृत्य हे भावना व्यक्त करण्याचं उत्तम साधन आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी अगदी आवर्जून हा कार्यक्रम पाहायला हवा.
No comments:
Post a Comment