राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला 'कालजयी सावरकर' लघुपटाचा विशेष शो.
"स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातील सर्व पैलूंचे उत्तम दर्शन घडवणारा 'कालजयी सावरकर' हा लघुपट आहे. सावरकरांच्या वैचारिक ऊर्जेतून घडणाऱ्या नव्या भारताचे प्रभावी चित्रण या लघुपटातून अतिशय बिनचूकपणे केलेले आहे. एकाचवेळी हृदयाला स्पर्श करणारा आणि विचारांना चालना देणारा हा लघुपट आहे."
- श्री. भगत सिंह कोश्यारी, माननीय राज्यपाल, महाराष्ट्र राज्य.
मान्यवर निमंत्रितांच्या गर्दीने फुलून गेलेले राजभवनातील 'जल विहार' सभागृह... प्रत्येकाच्या चेहऱ्यावर लघुपट सुरु होण्याआधी असलेले उत्सुकतेचे भाव आणि लघुपट संपल्यानंतर एकंदरीतच सभागृहात तयार झालेले भारावलेले वातावरण.... हे वर्णन आहे राजभवन येथे नुकत्याच संपन्न झालेल्या 'कालजयी सावरकर' या लघुपटाच्या विशेष 'प्रिव्हियू' शो दरम्यानचे! माननीय राज्यपाल महोदय श्री. भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत विवेक समूह निर्मित 'कालजयी सावरकर' या लघुपटाचा विशेष प्रिव्हियू शो नुकताच संपन्न झाला. यावेळी भारतीय विचार दर्शन संस्थेचे अध्यक्ष सुश्रुत चितळे यांनी राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
सावरकरांचे केवळ चरित्र लघुपटातून न मांडता त्यांचे विचार प्रामुख्याने प्रेक्षकांपर्यंत या लघुपटातून पोचवण्यात आले आहेत अशी प्रतिक्रिया सर्वच निमंत्रितांनी लघुपट पाहिल्यानंतर दिली. आजच्या नव्या भारताचे विचार हे खऱ्या अर्थाने कसे सावरकरांनी मांडलेल्या विचारांशी सुसंगत आहेत. एकप्रकारे आज देशाच्या विकासाचा रथ कशा पद्धतीने जाणते - अजाणतेपणे सावरकरांचे विचार पुढे घेऊन चालला आहे या मुद्यांना लघुपट स्पर्श करत असल्याचे मत अनेकांनी नोंदवले. याप्रसंगी उपस्थित लघुपटातील मुख्य कलाकार मनोज जोशी, तेजस बर्वे आणि सौरभ गोखले यांना प्रत्यक्ष भेटून प्रेक्षकांनी त्यांच्या कामाचे विशेष कौतुक केले. या लघुपटाचे दिग्दर्शन जाहिरात विश्वातील प्रख्यात दिग्दर्शक गोपी कुकडे यांनी केले असून क्रिएटिव्ह दिग्दर्शक विनोद पवार यांचे आहे. हा लघुपट अधिकाधिक लोकांपर्यंत आणि विशेष करून आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहचण्याची गरज असल्याचे मत अनेकांनी यादरम्यान व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी राज्यपालांच्या समवेत विधानसभेचे अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर, आमदार आणि मुंबई भा. ज. पा. चे अध्यक्ष श्री. मंगल प्रभात लोढा, आमदार प्रविण दरेकर यांनीही आवर्जून उपस्थिती लावली होती. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष श्री. रमेश पतंगे हे ही या प्रसंगी उपस्थित होते. आयोजकांच्या वतीने मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार हे ही या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी विवेक समूहाचे प्रबंध संपादक श्री. दिलीप करंबेळकर यांनी मान्यवरांचे आभार मानत सदर लघुपट अधिकाधिक लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी उपस्थितांना आवाहन केले.
No comments:
Post a Comment