प्रस्तु
प्रस्तुत
‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’च्या नवव्या आवृत्तीसाठी 27-28 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये ऑडिशन्सना प्रारंभ होणार!
गेल्या तीन दशकांमध्ये झी टीव्हीने भारतीय प्रेक्षकांपुढे अंताक्षरी, सा रे ग म प, डान्स इंडिया डान्स आणि इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ यासारखे अनेक लोकप्रिय रिअॅलिटी कार्यक्रम सादर केले आहेत. हे सर्व कार्यक्रम हे केवळ गुणवत्ता शोध प्रकारांतील अतिशय लोकप्रिय कार्यक्रमच होते असे नव्हे, तर ते आजही अनेक प्रेक्षकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असून त्यांचा स्वत:चा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. डीआयडी लिटल मास्टर्स आणि डीआयडी सुपर मॉम्स या कार्यक्रमांमधून लहान मुले आणि मातांना आपल्या अंगच्या नृत्यकलेचे प्रदर्शन करण्याची संधी उपलब्ध करून दिल्यानंतर झी टीव्ही आता लहान मुलांना त्यांची गायनकला रिअॅलिटी कार्यक्रमांच्या सर्वात मोठ्या व्यासपिठावरून सादर करण्याची संधी देत आहे. आतापर्यंतच्या आठ आवृत्त्यांना उदंड प्रतिसाद लाभल्यामुळे ‘झी टीव्ही’ आता आपल्या ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ या अत्यंत लोकप्रिय कार्यक्रमाची नववी आवृत्ती लवकरच प्रेक्षकांपुढे घेऊन येणार आहे.
नव्या लिटल चॅम्पचा शोध घेण्यासाठी 27 व 28 ऑगस्ट रोजी मुंबईत प्रत्यक्ष आणि ऑनलाइन ऑडिशन्सना प्रारंभ होणार आहे. किंबहुना ऑनलाइन ऑडिशन्सना यापूर्वीच प्रारंभ झाला असून त्यात आपल्या नावाची नोंदणी करण्यासाठी इच्छुकांना 9137857912 किंवा 9137857830 या व्हॉटसअॅप मोबाईल क्रमांकावर आपले नाव, शहराचे नाव आणि वय या माहितीसह आपला एक नृत्याचा व्हिडिओ अपलोड करावा लागेल.
या इच्छुक उमेदवारांचा उत्साह वाढविणारी आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे या कार्यक्रमासाठी ‘सा रे ग म प’ या लोकप्रिय कार्यक्रमाशी अगदी जवळून निगडित असलेल्या शंकर महादेवन या ज्येष्ठ संगीतकाराची प्रथमच ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’चे मुख्य परीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. या नामवंत आणि दिग्गज गायक-संगीतकाराने आजवर अनेक गाण्याच्या रिअॅलिटी कार्यक्रमांमध्ये परीक्षक म्हणून काम पाहिले आहे. पण ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’चे मुख्य परीक्षक म्हणून ते प्रथमच यात सहभागी होणार आहेत. देशभरातील या बालगायकांना भविष्यात संगीत क्षेत्रात स्वत:चे नाव आणि कारकीर्द उभी करण्यासाठी ते योग्य ते मार्गदर्शन करतील.
‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’मध्ये मुख्य परीक्षक म्हणून काम करण्याच्या संधीबद्दल शंकर महादेवन म्हणाले, “या लोकप्रिय आणि प्रदीर्घ काळ सुरू असलेल्या रिअॅलिटी कार्यक्रमात काम करण्यास मी उत्सुक बनलो आहे. मी आतापर्यंत ‘सा रे ग म प’ कार्यक्रमाच्या अनेक आवृत्त्यांमध्ये परीक्षक म्हणून काम केलं असलं तरी यावेळी मी प्रथमच ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ या कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम पाहणार आहे. त्यामुळे मी विशेष उत्सुक बनलो आहे. या लहान मुलांना मोठेपणी उत्तम पार्श्वगायक म्हणून तयार करण्यास मी सिध्द झालो आहे. आतापर्यंत अनेक पार्श्वगायकांनी या कार्यक्रमापासूनच आपल्या कारकीर्दीचा श्रीगणेशा केल्याचं गेल्या अनेक वर्षांपासून मी पाहात आहे. लहान मुलांना त्यांच्या गायनकलेचं प्रदर्शन करण्यासाठी संधी देणं खूप गरजेचं आहे. लहान वयापासूनच जर त्यांनी योग्य प्रकारे गाण्याचा सराव केला, तर त्यांना गाणं शिकणं आणि त्याचा विकास करणं सोपं जातं आणि ते संगीत क्षेत्रात आपला ठसा खूपच लवकर उमटवू शकतील. आमच्यासारखे संगीतकार हे नेहमीच नव्या कलाकारांच्या आणि गायकांच्या शोधात असतात. यासारखे कार्यक्रम हे सामान्य लोकांमध्ये दडलेल्या हिर््यांचा शोध घेण्यात खूप उपयुक्त ठरतात. होतकरू गायकांसाठी ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ हे एक उत्तम व्यासपीठ असून त्यात मी काही संस्मरणीय गाणी आणि आवाज ऐकण्याची प्रतीक्षा करीत आहे.”
येत्या काही दिवसांतच मुंबईत या कार्यक्रमासाठी ऑडिशन्सना प्रारंभ होत असतानाच दिल्ली, कोलकाता, जयपूर, बंगळुरू, इंदूर, लखनौ, चंदिगड, नागपूर, गुवाहाटी, डेहरादून आणि भुवनेश्वर या शहरांमध्ये घेण्य़ात आलेल्या ऑफलाइन चाचण्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. अनेक उत्तम बाल कलाकारांनी आपल्या सुरेल आवाजात गाणी गायली.
लवकरच पाहा ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ची नववी आवत्ती फक्त ‘झी टीव्ही’ वाहिनीवर!
No comments:
Post a Comment