Wednesday 29 April 2020

Zee Yuva | Dr.Don | रोहिणी हट्टंगडींचा लॉकडाऊनचा काळ सुखाचा!!!


लॉकडाऊनमुळे देशातील अनेक व्यवहार ठप्प आहेत. सर्वजण घरात अडकून पडले आहेत. पण, स्वतःसाठी वेळ देता येणं, छंद जोपासण्याची संधी मिळणं या लॉकडाउनच्या सकारात्मक बाबी आहेत. आपल्या मनोरंजनासाठी, एरवी रात्रंदिवस झटणारे कलाकार सुद्धा याला अपवाद नाहीत. त्यांचे छंद जोपासण्याची, स्वतःच्या मनोरंजनाकरिता वेळ घालवण्याची संधी त्यांना मिळाली आहे. 'झी युवा' वाहिनीवरील 'डॉक्टर डॉन' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करणाऱ्या, अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी सुद्धा, हा ब्रेक एन्जॉय करत आहेत.
साताऱ्यातील घरी, त्यांच्या आवडत्या गोष्टी करण्यात रोहिणीजी व्यस्त आहेत. स्वयंपाक करण्यात त्यांचा वेळ छान जात आहे. त्या नियमितपणे स्वतः घराची साफसफाई करत आहेत. या सगळ्यातून वेळ काढून मांजरीशी खेळणे, हा त्यांच्या दिनक्रमातील महत्त्वाचा भाग आहे. दिवसभरातील फावला वेळ, मांजरीसोबत घालवत असल्यामुळे, स्किप्ट्सचे वाचन, वेबसिरीज बघणे, यासाठी रोहिणीजी रात्रीचा वेळ मोकळा ठेवतात. चित्रीकरणाच्यावेळी स्वतःला कामात झोकून देण्यात त्या नेहमीच पुढे असतात. शूटिंगमधील धम्माल, मजामस्ती यात आनंदाने त्या सहभागी होतात. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात, सेटवरील माहोल मिस करत असल्याचं सुद्धा त्या आठवणीने सांगत आहेत. असे असूनही, स्वतःसाठी मिळालेला हा मोकळा वेळ, ही त्यांच्यासाठी सुद्धा एक सुवर्णसंधी ठरली आहे. व्यस्त दिनक्रमामुळे करता येत नसलेल्या अनेक आवडीच्या गोष्टी करण्यामध्ये रोहिणीजी त्यांचा वेळ घालवत आहेत. कुटुंबासोबत मनमोकळेपणाने वेळ घालवण्याची ही संधी त्यांच्यासाठी  खूप महत्त्वाची ठरली आहे.
त्यांच्या या दिनक्रमाविषयी बोलताना त्या सांगतात;
"मी शूटिंग मिस करतेय, ही गोष्ट खरी आहे. पण, कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी लॉकडाऊनमुळे मिळाली आहे. घरासमोरच्या अंगणात फेरफटका मारणे, कॉफीचा कप हातात घेऊन निवांतपणे तिचा आस्वाद घेत बसायचं, या गोष्टी करायला मोकळा वेळ मिळाला आहे. अनेक वर्षांत करायला न मिळालेल्या सगळ्या गोष्टी या लॉकडाऊनच्या काळात मी पुन्हा अनुभवत आहे."

No comments:

Post a Comment