Monday, 18 May 2020

अभिनेता साईप्रसाद गुंडेवार अनंतात विलीन!


लॉस अँजेलिस ; हॉलिवूड, बॉलिवूड तसेच मराठी कलाक्षेत्रातील हरहुन्नरी अष्टपैलू युवा अभिनेता साईप्रसाद गुंडेवार यांचे ९ मे २०२० रोजी सायंकाळी ७:०० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार  दिनांक १० मे २०२० रोजी सकाळी ७:३० वाजता) अमेरिकेतील लॉस अँजेलिस येथील इस्पितळात 'ग्लायोब्लास्टोमा' या कर्क रोगाने निधन झाले होते. अमेरिकेतील वाढत्या कोरोना संसर्गामुळे साई यांच्यावरील अंत्यसंस्कार एका आठवड्यानंतर करण्याची अमेरिका प्रशासनाने दिली होती. त्यानुसार १६ मे २०२० रोजी लॉस अँजेलिस येथील 'ग्लेनडेल फ्युनरल होम'मध्ये त्यांच्यावर हिंदू रितीरिवाजानुसार अंतिमसंस्कार करण्यात आले. प्रशासनाने दहा नातेवाईकांना यावेळी उपस्थित राहण्याची मुभा दिली होती. साई गुंडेवार यांचे वडील राजीव गुंडेवार यांनी त्यांचे विधी पूर्ण केले व त्यांच्या पत्नी सपना अमीन यांनी साई यांच्या आठवणी जागवल्या. त्यांच्या जगभरातील चाहत्यांनी त्यांना ऑनलाईन माध्यमातून श्रद्धांजली वाहून दुःख व्यक्त केले.
साई गुंडेवार यांनी एम टीव्हीच्या स्प्लिट्स व्हिला पर्व चार, स्टार प्लसवरील सर्व्हायवर तसेच अमेरिकेतील लोकप्रिय एस.डब्ल्यू.ए.टी. , कॅग्नी अँड लॅसी, द ऑरव्हिले, मार्स कॉस्पिरसी, द कार्ड मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. हिंदी चित्रपटांमध्ये त्याने 'रॉक ऑन', 'पप्पू कान्ट डान्स साला', 'लव्ह ब्रेकअप जिंदगी', 'डेव्हिड', 'आय मी और मैं', 'पीके', 'बाजार' इत्यादी हिंदी चित्रपटांसोबतच काही हॉलिवूडच्या चित्रपट व लघुपटांमध्ये आणि विविध जाहिरातपटांमध्ये त्याने भूमिका केल्या आहेत. तसेच डॉ. मीना नेरुरकर यांच्या 'ए डॉट कॉम मॉम' या एकमेव मराठी चित्रपटात त्याची प्रमुख भूमिका केली आहे. त्याच्या पश्चात पत्नी फॅशन डिझायनर सपना अमीन, आई शुभांगी व राजश्री, वडील राजीव गुंडेवार असा परिवार आहे. अवघ्या ४२ वर्षांच्या साई यांच्या तरुण वयात जाण्याने चित्रपटसृष्टीसह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment