कोविड-१९च्या महामारीने संपूर्ण जगावर संकटाचे सावट पसरले आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारणे भाग पडले आहे. मोठमोठी सेलिब्रिटी मंडळी सुद्धा याला अपवाद नाहीत. अद्वैत दादरकर आणि गंगाच्या बरोबरीने 'युवा डान्सिंग क्वीन'चे सूत्रसंचालन करणारी गायत्री दातार सोशल डिस्टंसिंग तर योग्यप्रकारे पार पाडते आहेच, परंतु तिने सोशल वर्क सुद्धा हाती घेतले आहे. एका सामाजिक संस्थेच्या मदतीने ती गोरगरिबांची आणि गरजूंची सेवा करत आहे. पुणे महापालिकेच्या सहकार्याने ही सामाजिक संस्था बेघर आणि गरजू व्यक्तींना अन्न पुरवण्याचे काम करते. मानसिक स्वास्थ्य जपता यावं, याची काळजी घेणारी गायत्री समाजकार्यात मदत होत असल्याने खूप आनंदी आहे.
तिच्या या समाजकार्यविषयी तिने मनमोकळेपणाने संवाद साधला;
"लॉकडाऊनच्या काळात अनेकांना मदतीची गरज आहे. 'झी युवा'वरील 'युवा डान्सिंग क्वीन'चे शूटिंग सध्या बंद असल्यामुळे, माझ्याकडे उपलब्ध असलेल्या वेळेचा योग्य वापर करायचा असं मी ठरवलं. एका सामाजिक संस्थेला मदतकार्यासाठी मनुष्यबळाची गरज असल्याचं मला एका मित्राकडून कळलं. अशी संधी मिळत असल्यामुळे, त्यावर फार काळ विचार करण्यात अर्थ नव्हता. मी मदत करण्याचा निर्णय घेतला. अन्नाचं पॅकिंग आणि वाटप या दोन्ही गोष्टींसाठी मदत करायला मी सुरुवात केली. या कामांची लाज बाळगावी असं मला अजिबात वाटत नाही. बिकट स्थितीत या कामामुळे मला सकारात्मक ऊर्जा मिळते."
मानसिक स्वास्थ्य उत्तम राहावं याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी, हे सांगायला सुद्धा गायत्री विसरली नाही. मानसिक आरोग्य हीसुद्धा एक महत्त्वाची बाब आहे. लॉकडाऊनच्या काळात आपापले छंद जोपासून किंवा आवडते चित्रपट पाहून, संगीत ऐकून सर्वांनी नेहमी अनादी राहावं असा सल्ला गायत्रीने दिला आहे.
No comments:
Post a Comment