Wednesday, 20 May 2020

Zee Yuva | 'झी युवा' वाहिनीवर 'पांडू' अवतरणार!!!

'झी युवा' वाहिनीवर 'पांडू' अवतरणार!!! 
'पांडू' म्हणजे पांडुरंग; जो नेहमी आपल्या पाठीशी उभा असतो. आपल्या संकट काळात पांडुरंग मदतीला धावून येतो. त्याचप्रकारे आपली ड्युटी करण्यासाठी पोलीस अहोरात्र सज्ज असतो. शेवटी  खाकीच्या आत पोलीस सुद्धा शेवटी एक माणसंच आहेत आणि कडक शिस्त असली तरी त्यांच्यात इमोशन सुद्धा आहेतच पोलिसांकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन देणारी ही मालिका, रविवार २४ मे रोजी 'झी युवा' वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. 'पांडू' या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा, 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेता सुहास शिरसाट याच्याशी साधलेला हा संवाद;
१. 'पांडू' या सिरीजबद्दल आम्हाला थोडंसं सांग.चोरांना पकडण्यासाठी धावणारा आणि गुन्हेगारांना अटक करायला येणारा पोलीस आपण चित्रपट किंवा मालिकांमधून नेहमी पाहतो. मात्र 'पांडू' या मालिकेतील पोलीस थोडा निराळा आहे. पोलीस आणि त्यांचं कुटुंबासोबत असलेलं नातं, यांच्यावर ही सिरीज प्रकाश टाकते. माझे बाबा पोलीस होते, त्यामुळे पुन्हा एकदा जुनं आयुष्य जगण्याची संधी मिळाली. या मालिकेत काम करायला खूप मजा आली. 
२. पोलिसाची भूमिका स्वीकारत असताना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला?ही भूमिका साकारताना फार मोठं आव्हान जाणवलं नाही. जनतेशी आणि कुटुंबाशी संवाद साधणारा आणि त्या दोन्हीचा ताळमेळ साधणारा पोलीस मला साकारायचा होता. यासाठी अभिनय कौशल्य दाखवणं गरजेचं होतं. टीमने मला खूप मदत केल्यामुळे ते सोपं गेलं. वडीलच पोलिसात होते, त्यामुळे त्यांचं वागणं-बोलणं आठवून त्यानुसार काम करण्याचा प्रयत्न मी केला आहे. वर्दी परिधान केल्यावर, एक वेगळाच आत्मविश्वास आपल्याला मिळत असतो. त्यामुळे पोलिसाची भूमिका साकारणं सोपं गेलं. 
३. या संकटाच्या काळात, पोलीस दिवसरात्र झटत आहेत. काहीवेळा त्यांना अत्यंत चुकीची वागणूक मिळत आहे. याविषयी तू काय सांगशील?पोलिसांवर होणारे हल्ले, चुकीची वागणूक, लोकांनी त्यांचं न ऐकणं, या गोष्टी पाहून खूप वाईट वाटतं. पोलीस आज त्यांच्या कुटुंबापासून दूर राहून, मोठा धोका पत्करून आपल्यासाठी झटत आहेत, हे समजून घ्यायला हवं. कुणालाही मारायला किंवा धाक दाखवायला पोलिसांना कधीच आवडत नाही. मात्र लोक नियमबाह्य वर्तन करत असतील, तर त्यांना नाईलाजाने या गोष्टी कराव्या लागतात. त्यांच्यावर होणारे हल्ले आणि त्यांना मिळणारी अयोग्य वागणूक या अत्यंत गंभीर आणि चुकीच्या गोष्टी आहेत, असं मला वाटतं.
४. लॉकडाउनचा काळ तुम्ही कशाप्रकारे घालवत आहात? ज्या-ज्या गोष्टी करायला वेळ मिळत नव्हता, त्या सगळ्या गोष्टी मी सध्या करत आहे. सकाळी नियमित व्यायाम करणे, वाचन, वेब सिरीज बघणे या गोष्टी रोज होत आहेत. घरातील कामांना हातभार लावण्याचा माझा प्रयत्न आहे. बायकोला तिच्या आवडीचा एखादा पदार्थ करून खायला घालण्याचा सुद्धा माझा प्रयत्न असतो. एकंदरीत, घरात असलो तरीही अधिकाधिक शांत राहून एन्जॉय करण्याचा प्रयत्न करत आहे.
५. 'झी युवा' वाहिनीवर ही सिरीज दाखवण्यात येणार आहे. त्यासंदर्भात प्रेक्षकांना तुम्ही काय अपील कराल?'झी युवा' वाहिनीवर 'पांडू' ही मालिका दाखवली जाणार आहे याचा आनंद आहे. एक वेगळी आणि अप्रतिम मालिका बघण्याची संधी रविवारी २४ तारखेला मिळणार आहे. दुपारी १२ ते ३ या वेळात ही मालिका पाहायला अजिबात विसरू नका. या मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळेल याची मला खात्री आहे. ही मालिका बघून, पोलिसांना समजून घेता येईल. त्यांच्या मनातील घालमेल, कुटुंबासोबत असलेलं नातं या गोष्टी समजायला मदत होईल.

No comments:

Post a Comment