Thursday 11 February 2021

Zee Talkies - महाराष्ट्राचा फेवरेट कोण?च्या सूत्रसंचालनाचं हे सलग पाचवं वर्ष - अमेय वाघ

 सलग पाच वर्ष ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’च्या सुत्रसंचालनाची धुरा अभिनेता अमेय वाघच्या हाती

दरवर्षी झी टॉकीज वाहिनीच्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ या पुरस्कार सोहळ्यामध्ये कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळते. रेड कार्पेट, कलाकारांचे स्टायलिस्ट लूक, अभिनेत्रींचा ग्लॅमरस अवतार असं बरंच काही या पुरस्कार सोहळ्यामध्ये अनुभवायला मिळतं. प्रेक्षकांचा लाडका आणि कलाकारांचा आवडता हा पुरस्कार सोहळा यंदा ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ सुवर्णदशक सोहळा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. याचीच आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे. कलाकारांचे धमाकेदार परफॉर्मन्स, विनोदाचा जबरदस्त तडका या सोहळ्यामध्ये असणार आहे. त्याचबरोबरीने या पुरस्कारे सुत्रसंचालन कोण करणार याचीही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असते. आता यावर्षी सुद्धा लोकप्रिय अभिनेता अमेय वाघ या सोहळ्याचं सुत्रसंचालन करणार आहे. सलग पाच वर्ष अमेय ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ पुरस्कार सोहळ्याचं सुत्रसंचालन करत आहे.
कलाकारांना सन्मानित करणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याशी अमेयचं अतुट नातं जोडलं गेलं आहे. अमेयचं सुत्रसंचालनही अगदी कमालीचं आहे. या वर्षी अमेय वाघ अभिनेता स्वप्नील जोशी सोबत या सुवर्णदशक सोहळ्याचं सूत्रसंचालन करणार आहे. अमेय या पुरस्कार सोहळ्याबद्दल असलेल्या त्याच्या भावना व्यक्त करताना म्हणाला, "महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ या सोहळ्याशी माझं खूप जुनं नात आहे. मी पहिल्यांदा कुठल्या पुरस्कार सोहळ्याचं सुत्रसंचालन केलं असेल तर ते ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ या पुरस्कार सोहळ्याचं होतं. झी टॉकीज वाहिनीने मला ही सुवर्णसंधी दिली आणि इथपासूनच या पुरस्कार सोहळ्याशी माझं अतुट नात जोडलं गेलं. मराठी चित्रपट सृष्टीचा १० वर्षांचा प्रवास आणि महाराष्ट्राचा फेवरेट कोण?चे विजेते यांच्यात होणारी स्पर्धा यामुळे हा सोहळा खऱ्या अर्थाने सुवर्ण सोहळाच असणार आहे. मला देखील अनेक दिग्गज कलाकारांसोबत नामांकन मिळालं आहे. त्यामुळे मी देखील खूप उत्सुक आहे हे जाणून घेण्यासाठी कि या सुवर्णसोहळ्यात प्रेक्षक कोणाला महाविजेता ठरवणार. याही वर्षी ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ सुवर्णदशक सोहळ्याचं मी सुत्रसंचालन करणार आहे. सुत्रसंचालनाचं माझं हे पाचवं वर्ष असून मराठी सिनेसृष्टीतील रोमँटिक हिरो खुद्द स्वप्नील जोशी मला साथ देणार आहे. आमची जोडी प्रेक्षकांना जास्त रंजक वाटत असावी कारण आम्ही दोघे दुसऱ्यांदा एकत्र या सोहळ्याचं सूत्रसंचालन करत आहोत."
अमेयने ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ पुरस्कार सोहळ्याचा प्रवास जवळून पाहिला आहे. त्याला हा सोहळा अगदी जवळचा वाटतो. यंदाच्या या सोहळ्याचं मुख्य आकर्षण म्हणजे गेल्या दहा वर्षामध्ये ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ हा पुरस्कार ज्यांनी पटकावला आहे त्यांनाच यावर्षी नामांकन मिळाली आहेत. त्यामुळे चित्रपटसृष्टीमधील या नावाजलेला पुरस्कार मिळविण्यासाठी कलाकारांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगणार आहे. आपल्या आवडत्या कलाकाराला विजेतेपद निवडून देण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना या सोहळ्यानिमित्त मिळणार आहे.

No comments:

Post a Comment