‘मुंबई ग्लॅमर नगरी’ अर्थात 'अंधेरी पश्चिम' आणि या परिसरात अकरा एकरच्या निसर्गसंपन्न परिसरात डौलात उभ्या असलेल्या 'राजहंस' विद्यालयाच्या भव्य पटांगणामध्ये सध्या लगबग सुरु झाली आहे ती विविध खेळांची. आंतरविद्यालयीन क्रीडा स्पर्धांमध्ये 'राजहंस' विद्यालय राज्यात अव्वलस्थानी आहे. आजमितीस या विद्यालयाच्या खेळाडूंना जगभरात आपला खेळ करण्याची संधी मिळाली आहे. गेल्या दहा वर्षांत विद्यालयाने केलीली कामगिरी विशेष असून राज्यासह देश विदेशात आपली पताका फडकवण्यात या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना यश आले आहे. सॉफ्टबॉल आणि बेसबॉल हे जगभरातील अत्यंत लोकप्रिय खेळ. या खेळांतही वर्चस्व मिळवून गेली दहा वर्षे मुंबई, उपनगरे, तालुका, जिल्हा, राज्य, देशातील स्पर्धांमध्ये नावलौकिक मिळविला आहे. राजहंस विद्यालयाने गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात अनेक क्रीडा स्पर्धा जिंकल्या आहेत.
‘राजहंस’ विद्यालयाने ‘कोविड- १९’च्या प्रादुर्भावानंतर प्रथमच आपल्या यशस्वी खेळाडूंची मोट बांधत आजपासून मुंबईतील आपल्या भव्य प्रांगणात सराव सुरु केला आहे. शेकडो विद्यार्थी या मोहिमेत उत्साहाने सहभागी झाले आहेत. यावर्षी फ़ुटबाँल टीमचे कर्णधारपद अबीर जितानी याला देण्यात आले असून तो या खेळात विशेष प्रवीण आहे. तसेच सॉफ्टबॉल खेळातही त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यावेळी ‘सॉफ्टबॉल’ आणि ‘बेसबॉल’चे मुंबई उपनगर सचिव त्रिभुवन सिंग यांची विशेष उपस्थिती होती. ‘फुटबॉल’ प्रशिक्षक प्रज्वल चंदन आणि ‘सॉफ्टबॉल’ आणि ‘बेसबॉल’ प्रशिक्षक विकी मिश्रा प्रशिक्षण कलेचे त्यांनी विशेष कौतुक केले.
फुटबॉल संघाचा कर्णधार अबीर जितानी आणि त्याच्या संघातील खेळाडू विद्यार्थ्यांना आपल्या विद्यालयाचे वर्चस्व कायम राखण्याचे मोठे आव्हान आहे. कर्णधार अबीर म्हणतो की, "कोविड-19मुळे आमच्यापैकी कोणीही तीन वर्षांपासून प्रत्यक्ष सराव केलेला नाही. आम्ही सातवीतून थेट १०वी मध्ये आणि मैदानातही आलो आहोत. त्यामुळे अनेक अडचणी आहेत. त्यासोबत आमच्या विद्यालयाची प्रतिष्ठा जपणं हेही आमचं कर्तव्य असल्याने त्याकडे आम्ही संधी आणि आव्हान म्हणून पहात आहोत. मला माझ्या संघातील सर्व खेळाडू मित्रांचे सहकार्य मिळत असून आमचे सर्व प्रशिक्षक, आमचा खेळ सुधारण्यासाठी, झटत आहेत. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कलादेवी गंगाधरन, क्रीडा प्रमुख मनोज नायर प्रत्येक मुलाच्या कामगिरीकडे बारकाईने वैयक्तिकरित्या लक्ष देत आहेत.”
या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती कला गंगाधरन म्हणाल्या कि "आमचे सर्व विद्यार्थी खूपच सक्रिय आणि उत्साही आहे. पालकांचेही विशेष कौतुक करावे लागेल. आमचे विद्यालय सातत्याने खेळांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देत असते. माझ्यामते मुलांच्या आयुष्यात दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात, एक म्हणजे शिक्षण आणि दुसरे म्हणजे खेळ. खेळात मुलांनी सहभाग घेतल्यास त्यांचा उत्साह वाढतो आणि त्यांच्या सर्वांगीण विकासात याचा खूप फायदा होतो. त्यांच्यात विचार व नेतृत्व करण्याचे गुण तयार होतात. त्यांना लक्ष केंद्रित करण्याची सवय लागते आणि नकळतपणे त्यांचा सर्वांगीण विकास घडत जातो"
राजहंस विद्यालयाचे क्रीडा प्रमुख मनोज नायर म्हणाले "आमच्या विद्यालयाची क्रीडा विभागातील कामगिरी उत्तुंग आहे. मुंबई व महाराष्ट्रातील आमच्या विद्यार्थी खेळाडूंची आणि विद्यालयाची कामगिरी पाहून 'महाराष्ट्र राज्य सरकारने' २०१९ मध्ये कलेक्टर निधीतून रु. एक लाखाचे पारितोषिक संस्थेला देऊन गौरव केला आहे. राजहंस विद्यालयाने मुंबई व उपनगर, जिल्हा, लातूर, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, चंद्रपूर, अकोला, गडचिरोली, बुलढाणा, वर्धा, अमरावती, यवतमाळ, नागपूर अश्या राज्यातील विविध स्पर्धा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा कामगिरी केली आहे.
राजहंस विद्यालय विविध खेळांमध्ये गेली दहा वर्षे राज्यात अव्वल आहे. परीक्षक मुलांकडून भरपूर सराव करून घेत त्यांना विविध खेळींमध्ये तरबेज तर करीत आहेतच शिवाय मैदानी खेळांची गोडी लावण्यातही यशस्वी ठरले आहेत. हा आदर्श आपल्या इतर शाळांनी घेऊन अभ्यासासोबत मैदानी खेळ्यांमध्ये मुलांना गोडी लावून पारंगत केल्यास सुदृढ आणि सशक्त युवा भारत नक्कीच निर्माण होऊ शकेल.
No comments:
Post a Comment