मुंबई, सप्टेंबर 2024: अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ज्याचा वर्ल्ड प्रीमियर दिमाखात पार पडला तो, छत्रपाल निनावे यांचा 'घात' हा मराठी सिनेमा आता महाराष्ट्रातल्या थिएटरमध्ये प्रदर्शित होतो आहे. माओवादी बंडखोरांनी घेरलेल्या जंगलात हा सिनेमा आकाराला येतो. माओवादी बंडखोर, सामान्य नागरिक, पोलिस यांच्यातील तणावपूर्ण आणि रहस्यपूर्ण पार्श्वभूमीवर सिनेमा रंगत जातो.
शिलादित्य बोरा यांची ''प्लॅटून वन', मनीष मुंद्रा यांची 'दृश्यम फिल्म्स' आणि मिलापसिंह जडेजा, संयुक्ता गुप्ता आणि कुणाल कुमार यांनी मिळून सिनेमाची निर्मिती केली आहे. ‘घात’ सिनेमाची स्टारकास्टही अगदी तगडी आहे. यातील कलाकार हे फक्त स्टार नसून खरेखुरे अभिनेते आहेत. मराठीतील अत्यंत संवेदनशील अभिनेता जितेंद्र जोशी, मिलिंद शिंदे, सुरुची अडारकर, धनंजय मांडवकर आणि जनार्दन कदम यांनी सिनेमात काम केलेलं आहे. या सिनेमाची सिनेमेटोग्राफी केली आहे, उदित खुराणा यांनी. नेटफ्लिक्सवरची 'द हंट फॉर वीरप्पन' ही डॉक्युमेंट्री तसेच आणि हुमा कुरेशी स्टारर 'बयान' असे तगडे प्रोजेक्ट नुकतेच पूर्ण केलेल्या खुराणांची सिनेमेटोग्राफी हेही 'घात'चं आणखी एक वेगळेपण आहे.
भारतातील रिलीजबद्दल लेखक-दिग्दर्शक छत्रपाल निनावे विशेष उत्सुक आहे. “घात हा एक खोल आशय असलेला सिनेमा आहे. विश्वास आणि कुणीतरी दगा दिल्यावर होणारा विश्वासघात दोन्हीचं चित्रण करणारा ‘घात’महाराष्ट्रातील अशा दुर्गम भागात घडतो जिथे कायद्याचं राज्य तर आहे पण अंमल नाही. जिथे प्रत्येक पावलावर काहीतरी भयप्रद काहीतरी धोकादायक दडलेलं असू शकतं, तशी भीती असते. तरीही तिथे जीवनाचा एक प्रवाह चाललेला आहे. तिथल्या आयुष्यातली नैतिक-अनैतिकता निराळी आहे. त्यांच्या दुविधा निराळ्या आहेत, त्यातून आकार घेणारं जगणं निराळं आहे. त्यामुळेच अनेक भावभावनांचं मिश्रण असलेली ही कथा भारतीय प्रेक्षकांसमोर आणताना मी विशेष उत्सुक आहे. या सिनेमाद्वारे एका निराळ्या वास्तवाचा अनुभव घेण्यासाठी मी प्रेक्षकांना आमंत्रित करतो आहे. घात-जिथे विश्वास दुर्मीळ आहे आणि तिथल्या जीवाची किंमत पावलापावलावर मोजावी लागते.
‘घात’या 124-मिनिटांच्या क्राईम थ्रिलरची निवड भारतातील फिल्म बाजार येथील वर्क-इन-प्रोग्रेस लॅबसाठी करण्यात आली होती. जिथे सिनेमाने लॅब अवॉर्ड मिळवलं. तर बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमधील GWFF बेस्ट फर्स्ट फीचर अवॉर्डसाठीही नामांकन मिळाले होते. या चित्रपटाचा भारतातील प्रीमियर Jio MAMI 2023 आणि त्यानंतर केरळच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFK) झाला.
चित्रपटाचे निर्माते शिलादित्य बोरा म्हणतात, "घात हा एक अनवट हिरा आहे. एक निर्माता म्हणून, मी नेहमीच वेगळ्या सिनेमांकडे आकर्षित होतो. खरोखरच आपल्या मातीतल्या गोष्टी जगापुढे आणणारा 'घात' हा असाच एक सर्वोत्कृष्ट सिनेमा आहे, तो थिएटरमध्ये पाहण्याचा अनुभव वास्तवाइतकाच खास असेल असा मला विश्वास आहे असं बोरा म्हणतात. ९० व्या अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत एंट्री असलेला ‘न्यूटन’, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार-विजेता ‘पिकासो’, मराठी जापनीज रॉमकॉम ‘तो, ती आणि फुजी’आणि हुमा कुरेशीचा आगामी ‘बयान’आदी प्रोजेक्टसाठी शिलादित्य बोरा यांनी निर्माता म्हणून भूमिका बजावलेली आहे.
स्वप्न ऑस्करचं
'घात' सिनेमाच्या टीमने थेट ऑस्करचं स्वप्न पाहिलं आहे. आणि भारतातून ऑस्करला जाणाऱ्या अधिकृत सिनेएंट्रीसाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. २७ सप्टेंबर २०२४ ला सिनेमा संपू्र्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल. त्यानंतरच्या आठवड्यात भारतातील महानगरे आणि प्रमुख शहरांत तसेच नॉर्थ अमेरिकेतील थिएटरमध्ये सिनेमा प्रदर्शित होईल. 'घात'शी जोडली गेलेली नावं अत्यंत प्रतिष्ठित आहेत. सिनेमाचे दिग्दर्शक, निर्माता आणि सिनेमॅटोग्राफर, हे प्रतिष्ठित बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे माजी विद्यार्थी आहेत.
दिग्दर्शक म्हणतात,
कधीतरी जीवघेणा तर कधीतरी जीव वाचवणाऱ्या विश्वासाच्या नाजुक नात्यावर घात या सिनेमाची कथा आधारित आहे. घात या शब्दाचे मराठीत दोन अर्थ आहेत. एक म्हणजे विश्वासघात आणि दुसरा म्हणजे हल्ला. नातेसंबंधातील विश्वासघातातून मानवी मनावर होणाऱ्या एकप्रकारच्या हल्ल्याचा, दगाफटक्याचा हा प्रवास आहे, ही नात्यांची गुंतागुंत आहे. महाराष्ट्रातल्या दुर्गम आणि अनवट पार्श्वभूमीवरचा हा सिनेमा असं आयुष्य दाखवतो जिथे चांगल्या वाईटातली सीमारेषा धूसर आहे. पिढ्यानपिढ्या, या प्रदेशातील स्थानिकांनी त्यांची जमीन, पाणी आणि जंगल याचं प्राणपणाने रक्षण केलंय.
'घात'मध्ये तीन मध्यवर्ती पात्रं आहेत. एक रहस्यमय भटक्या, एक धूर्त विश्वासघातकी आणि एक भ्रमित कायदेपंडित. यातील प्रत्येकाच्या साथीला स्थानिकांचं प्रतिनिधित्तव करणारा एक साथीदार आहे. मुक्ती शोधणारा एक माहितगार, भूतकाळ नसलेला माणूस आणि जगात आपली जागा शोधणारी एक तरुण आदिवासी मुलगी. या साऱ्यांचं आयुष्य एकमेकांत अनपेक्षित पद्धतीने गुंफलं गेलं आहे. नियमच नसलेली या जगात एकमेकांवर विश्वास बसणं आणि तो उडणं हे फार सहज होतं. या जगात भीती हाच विश्वास आहे.
छत्रपाल निनावे
छत्रपाल निनावे एक भारतीय चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहेत. २०२२ मध्ये, छत्रपाल हे बर्लिनेल टॅलेंटचा भाग होते. घात हा त्यांचा पहिलाच सिनेमा आहे. पण या पहिल्या फीचर फिल्मने २०२० मध्ये NFDC फिल्म बाजार येथे WIP लॅब अवॉर्ड जिंकला तर बर्लिनले पॅनोरमा २०२३ मध्येही सिनेमाची निवड झाली होती. शिवाय GWFF फर्स्ट फीचर फिल्म अवॉर्डसाठी नामांकनही मिळाले होते. छत्रपाल यांनी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून 15 वा Giuseppe Becce पुरस्कार पटकावला, सिनेक्लब वेरोना आणि FEDIC मासिकाने बर्लिनले २०२३ मध्ये त्याचे आयोजन केले होते. Jio MAMI Mumbai FF, IFFK आणि AEIFF मध्ये देखील 'घात'ची निवड झाली होती. याबरोबरच छत्रपाल यांनी 'अ चेक ऑफ डेथ' (2007) ही मध्य भारतातील शेतकरी आत्महत्या प्रकरणावर आधारित एक शॉर्टफिल्मही केली आहे. 'फिल्माका इंडिया' स्पर्धेत या फिल्मला पुरस्कार मिळाला आहे.
'प्लॅटून वन आणि शिलादित्य बोरा बद्दल
मुंबईत मुख्यालय असलेले, 'प्लॅटून वन' हे शिलादित्य बोरा यांनी स्थापन केलेला एक बुटीक फिल्म स्टुडिओ आहे. PVR सिनेमा समूहाची मर्यादित प्रदर्शन करणारी शाखा म्हणजेच PVR डायरेक्टर्स रेअर या आघाडीच्या इंडी रिलीज बॅनरमागे बोरा यांची मेहनत आणि बुद्धी आहे. या बॅनरने आजवर ८५ हून अधिक चित्रपट यशस्वीरित्या प्रदर्शित केलेले आहेत. बोरा हे प्रतिष्ठित 'बर्लिनेल टॅलेंट्स २०१५' चे माजी विद्यार्थीसुद्धा आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून त्यांनी चित्रपट आणि निर्मितीच्या सर्व अंगांशी संबंधित कामगिरी केली आहे. दिग्दर्शन, निर्मिती, विपणन, वितरणापासून ते एखाद्या प्रकल्पाची सुरुवात करेपर्यंत अनेक भूमिका बोरा यांनी पार पाडल्या आहेत. 'कोर्ट', 'मसान', 'न्यूटन', 'एसआयआर' यांसारख्या ऑफबीट सिनेमांसोबतच बोरा गेल्या दशकातील सर्वोत्तम भारतीय स्वतंत्र सिनेमांशी निगडीत आहेत. 'प्लॅटून वन'चा आगामी चित्रपट, हुमा कुरेशी अभिनीत 'बयान' हा सिनेमा एलए रेसिडेन्सी ऑफ ग्लोबल मीडिया मेकर्स - फिल्म इंडिपेंडंट येथे तयार झालाय. याच सिनेमाने 'ह्युबर्ट बाल्स' फंडाचं विजेतेपदही पटकावलं आहे. नुकतंच सिनेमाचं मुख्य छायाचित्रण पूर्ण झालं आहे. 'प्लॅटून वन' उत्तर अमेरिकन बाजारपेठेतही आपला विस्तार करण्याच्या तयारीत आहे. अलीकडेच ओकलँड कॅलिफोर्निया येथे 'प्लॅटून वन इंक'ने आपली धमाकेदार एंट्री केलेली आहे.
No comments:
Post a Comment