Friday, 22 November 2019

Zee Talkies | World Television Premier 'Palshichi P.T' | Kiran Dhane

  धावपटूची भूमिका साकारणं, ही गोष्ट अधिक आव्हानात्मक होती  
'पळशीची पीटी' या आगळ्यावेगळ्या चित्रपटात अभिनेत्री किरण ढाणे हिने मुख्य भूमिका बजावली आहे. या चित्रपटाचा 'वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर' येत्या रविवारी म्हणजेच २४ नोव्हेंबर रोजी, 'झी टॉकीज'वर होणार आहे. या खास चित्रपटाच्या निमित्ताने किरणशी मारलेल्या गप्पा;
१. या चित्रपटातील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील?
या चित्रपटात मी भाग्यश्री देवकाते ही भूमिका साकारली आहे. रोजचं जीवन जगण्यासाठी खडतर प्रवास कराव्या लागणाऱ्या गरीब कुटुंबातील ही मुलगी आहे. 'आपण स्वबळावर आपली परिस्थिती बदलू शकतो' याची जाणीव झाल्यानंतर, तिने आपल्या स्वप्नांच्या दिशेने प्रवास करायचे ठरवले आहे. या साध्याभोळ्या मुलीचा, स्वप्नपूर्तीसाठी सुरू असलेला प्रवास या चित्रपटात पाहायला मिळतो. 
२. एक धावपटू म्हणून भूमिका करण्याचे आव्हान कसे स्वीकारलेस?
खेड्यातील एका मुलीची भूमिका करायची होती. त्यामुळे खेड्यातील मुलींचं वागणं-बोलणं, त्यांचे हावभाव यांचा अभ्यास करणं गरजेचं होतं. अर्थात, धावपटूची भूमिका साकारणं, ही गोष्ट अधिक आव्हानात्मक होती. घरची परिस्थिती बेताची असल्याने, भाग्यश्रीला धावण्याचा सराव सुद्धा अनवाणी पायांनी करावा लागतो. त्यामुळे मलाही, अनवाणी पायांनी धावण्याचा सराव करणं आवश्यक होतं. हे सगळं करण्यासाठी अवघ्या २ महिन्यांचा वेळ मिळणार होतं. म्हणूनच, हे आव्हान खूप मोठं होतं. अर्थात, संपूर्ण टीमने खूप मदत केली. दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांनी भरपूर सराव करून घेतला, त्यामुळे हे आव्हान मला पेलता आले. 
३. सहकलाकारांसह काम करण्याचा अनुभव कसा होता?
मी म्हणाले त्याप्रमाणे, टीम खूपच छान होती. सगळ्यांच्यात मिळून-मिसळून राहिल्याने काम सुद्धा उत्तमरित्या पार पडलं. मला उन्हातून, अनवाणी पायाने माळरानासारख्या ठिकाणी धावावे लागत होते. पण, अशावेळी माझे सहकलाकार सुद्धा भर उन्हात मला प्रोत्साहन देण्यासाठी थांबत असत. त्यांना सावलीत जाऊन बसणं शक्य असूनही, ते माझ्यासाठी उन्हात उभे राहत असत. मला हे प्रोत्साहन मिळाल्यामुळेच मी हे आव्हान पेलू शकले. म्हणून मी 'पळशीची पीटी'च्या पूर्ण टीमला धन्यवाद देते. 
४. या चित्रपटाचे चित्रीकरण गावातील भागात झाले आहे. हा अनुभव कसा होता?
गावात चित्रीकरण करण्याचा अनुभव खूप छान होता. गावकऱ्यांची खूप मदत झाली. माळरानावर शूट करत असताना सावली अजिबात मिळत नसे. जेवण्याच्या ब्रेकमध्ये सुद्धा उन्हातच बसावं लागायचं. त्यातल्या त्यात कधी जनरेटरची गाडी उभी असेल, तर तिच्या सावलीचा आडोसा घेतला जायचा. या सगळ्या परिस्थितीत, चित्रीकरण पूर्ण झालं. आपण घेत असलेल्या मेहनतीला यश येणार असल्याची खात्री असल्याने, ही मेहनत घेण्याचा उत्साह टिकवणं शक्य झालं. 
५. चित्रीकरणादरम्यानची एखादी आठवण किंवा एखादा किस्सा आम्हाला सांगशील का???
शूटिंगच्या खूप आठवणी आहेत. राहुल मकदुमने केलेले विनोद असोत, किंवा राहुल बेलापुरकर सर आणि धोंडिबा कारंडे सर यांनी केलेली मदत असो, लक्षात राहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. पण, एखादी खास आठवण किंवा किस्सा सांगायचं झाल्यास, डोंगराच्या कड्यावर घेतल्या गेलेल्या ड्रोन शॉटचा आहे. सगळी टीम माझ्यापासून ३-४ किलोमीटर अंतरावर होती. मला एकटीला हा डोंगर चढून जावं लागणार होतं. मला उंचीची खूप भीती वाटते, आणि हा प्रसंग तर कड्यावर चित्रित करायचा होता. उंचीची भीती असल्याने मनात खूप धाकधूक होती. पण, तो डोंगर चढत असताना मी किरण नव्हते, तर भागी होते. त्यामुळे उंचीची भीती बाजूला सारून मी वर चढू शकले.
हा प्रसंग शूट होत असतांना, काही काळासाठी ड्रोनशी संपर्क तुटला होता. कुठल्याही दिशेला उडणारा तो ड्रोन माझ्या अगदी जवळून गेला. त्यावेळी वारा सुद्धा खूप सुटला होता. स्थिर उभं राहणं देखील कठीण जात होतं. हा प्रसंग चित्रित करणं खूपच रोमांचक होतं असं मी नक्की सांगेन. 

No comments:

Post a Comment