Wednesday, 8 April 2020

‘झी एन्टरटेन्मेंट’ कोरोना विरुद्ध लढ्यात ५००० मजुरांना आर्थिक साह्य देणार


कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढ्यात सामील होण्याचे व योगदान देण्याचे ‘झी’चे आपल्या १.३अब्ज दर्शकांना आवाहन
मुंबई,    एप्रिल २०२० – प्रसार माध्यम आणि करमणूक या क्षेत्रांतली दिग्गज कंपनी झी एन्टरटेन्मेंट एन्टरप्रायझेस हिने कोविड-१९ विरुद्धचा लढा आणखी तीव्र करण्याचा निश्चय केला आहे. या कंपनीमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काम करणाऱ्या ५ हजारहून अधिक रोजंदारीवरील मजुरांना अर्थसाह्य करण्याचे कंपनीने ठरविले आहे. कोरोना व्यायरसच्या साथीमुळे सर्वत्र टाळेबंदी लागू झाली, तिचा सर्वाधिक फटका या कामगारांना बसत आहे. अशावेळी माध्यम व करमणूक क्षेत्रातील जबाबदार कंपनी या नात्याने सध्याच्या प्रतिकूल काळात या कामगारांना मदत करण्याचे आपले कर्तव्य आहे, या भावनेतून ‘झी’ने हा निर्णय घेतला आहे.
‘पंतप्रधान नागरीक सहाय्य व आपत्कालीन मदत निधी’मध्ये (पीएम केअर्स फंड) योगदान देण्याच्या उद्देशाने ‘झी’ने देश-विदेशातील आपल्या माध्यम प्रणालीचा उपयोग करून १.३ अब्ज नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे. याचबरोबर, झी नेटवर्कमधील आपल्या ३५०० कर्मचाऱ्यांना पीएम-केअर्स फंडामध्ये स्वतःहून योगदान देण्याची संधीही कंपनीने अंतर्गत प्रणालीद्वारे मिळवून दिली आहे. या कर्मचाऱ्यांकडून जेवढी रक्कम गोळा होईल, तेवढ्या ररकमेची भर कंपनी स्वतः घालणार आहे व एकूण रक्कम ‘पीएम-केअर्स’ फंडाला देणगीदाखल देणार आहे.
‘झी’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत गोयंका म्हणाले, ‘’आमच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये काम करणाऱ्या सर्व रोजंदारी कामगारांना आर्थिक साह्य देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. परिस्थितीवर मात करण्याच्या दृष्टीने एकत्र येऊन लढा देणे, हाच आमचा मंत्र आहे. सध्याच्या बिकट परिस्थितीत भारतीय उद्योग क्षेत्राने एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय कार्यास बळ देण्याची आवश्यकता आहे. या कार्यास अर्थसाह्य करण्याबरोबरच देशव्यापी जनजागृती करण्याचे आमचे नियोजन आहे. देशात आणि परदेशांतही आमची व्याप्ती लक्षात घेता, आम्ही दर्शकांना या राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहोत. सर्व देशाने एक कुटुंब म्हणून एकत्र येण्याची हीच खरी वेळ आहे.’’
झी कंपनीच्या दूरचित्रवाणी वाहिन्या, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि समाज माध्यमे या माध्यमांतून जगभरात पीएम-केअर्स फंडाबाबत जागरुकता निर्माण करण्यात येणार आहे. ग्राहकांनी सुरक्षित राहावे आणि सरकारच्या सूचना व्यवस्थित पाळण्याबाबत खबरदारी घ्यावी, यासाठी या समुहातर्फे ‘#ब्रेकदकरोनाआऊटब्रेक’ या नावाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत ‘झी’च्या ४० हून वाहिन्यांच्या कार्यक्रमांचे प्रसारण दिवसभरात ३० सेकंदांसाठी थांबविण्यात आले होते. या कालावधीत दर्शकांनी आपले हात धुवून यावे, असे आवाहन करण्यात आले. ‘इंडियन ब्रॉडकास्टिंग फाऊंडेशन’च्या (आयबीएफ) निर्णयानुसार,’ झी अनमोल’ या वाहिनीचे प्रक्षेपण सर्व डीटीएच व केबल टिव्ही कंपन्या, तसेच दर्शकांकरीता पुढील दोन महिन्यांसाठी मोफत करण्यात आले आहे. ‘झीफाईव्ह’ हा डिजिटल प्लॅटफॉर्मदेखील ‘हाय डेफिनिशन’ (एचडी) प्रक्षेपणाएेवजी ‘स्टॅंडर्ड डेफिनिशन’ प्रक्षेपण सध्या करीत आहे. ‘#बीकामबीएन्टरटेन्ड’ या उपक्रमातून झीफाईव्ह या प्लॅटफॉर्मच्या दर्शकांना शांत व संयमी राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment