विनोद जमणं सोपं नाही - सागर कारंडे
झी मराठी वरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाची हवा नव्हे तर वादळ गेली ४ वर्ष महाराष्ट्राचं नव्हे तर भारत आणि संपूर्ण जगभरात पसरलं आहे. या कार्यक्रमातील विनोदवीर हे प्रेक्षकांचे आवडते तर आहेच पण त्या सगळ्यांनी लोकांच्या मनात एक स्थळ स्थान निर्माण केलं आहे. त्यातील एक विनोदवीर म्हणजे सागर कारंडे. त्याने साकारलेली पुणेरी बाई किंवा पोस्टमन काका हे कोणी विसरूच शकत नाही. हसता हसता चटकन डोळ्यात पाणी आणणाऱ्या या विनोदवीरासोबत साधलेला हा खास संवाद.
१. आपल्याला विनोद जमू शकतो किंवा आपण एक विनोदी कलाकार व्हावं असं केव्हा वाटलं?
- विनोद जमणं सोपं नाही. आपल्याला विनोद जमायला लागला आहे असं समजणं कलाकार म्हणून चुकीचं आहे; कारण आपलं शोधकार्य तिथेच संपतं. मी बालमोहन शाळेचा विद्यार्थी असताना सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायचो. मग गणेशोत्सव नवरात्र यातल्या कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन अभिनय करू लागलो. तो प्रवास आजही सुरूच आहे. प्रेक्षकांच्या कौतुकाने माझी वाट सुकर केली.
२. अभिनयाची आणि विनोदवीर म्हणून सुरुवात कधी झाली?
- मी २००२ साली पूर्णपणे अभिनय क्षेत्रात उडी घ्यायचं ठरवलं. सुरुवातीला मिळालेली नाटकं विनोदी होती. मग 'फु बाई फु'मुळे घराघरात पोहोचण्याची संधी मिळाली. आता 'चला हवा येऊ द्या'मुळे रोज काहीना काही प्रयोग करण्याची संधी मिळते.
३. विनोदी कलाकार म्हणून प्रेक्षकांना हसवण्याचा मोठी जबाबदारी कलाकारावर असते, त्याबाबदल काय सांगशील?
- आताच्या धकाधकीच्या आयुष्यात सगळ्याच वेळी हसत राहणं शक्य आहे असं नाही. म्हणून माझं म्हणणं आहे कि, सगळ्यांनी कायम प्रसन्न राहा. हसू आपोआप चेहऱ्यावर येईल. आम्ही तुम्हाला हसवायला सज्ज आहोतच फक्त तुम्ही कायम सकारात्मक आणि प्रसन्न राहा.
४. विनोदी कलाकार म्हणून कोणती आव्हानं जाणवतात?
- आव्हानं स्वीकारण्याची माझी वृत्ती आहे. आपण नवं करण्याचा धोकाच पत्करला नाही. तर आपल्याला ते जमतंय कि नाही ते कसं कळणार? नटांवर एका प्रकारची कामं केल्यावर शिक्का हा बसतोच. कारण लोकांनी त्या नटाला इतर प्रकारची कामं करताना पाहिलेलं नसतं. आपल्याला येतं तेच करत राहण्यात मजा नाही. नवे प्रयोग करून पाहिले पाहिजेत.
No comments:
Post a Comment