· दिव्यांगांना मदत करण्यात खरा आनंद मानणाऱ्या दानशूर श्रीमती नीला गाळवणकर यांच्या हस्ते पायाभरणी!!
दानशूरपणाबद्दल नेहमीच चर्चा होते. जगभरातील सर्वच महान व्यक्तींनी त्याबद्दल उदात्त विचार मांडले. ‘मला जी दातृत्वाची शक्ती समजली, ती जर तुम्हाला कळू शकली, तर तुम्ही एक घासदेखील इतरांत वाटल्याशिवाय तोंडात घालणार नाही’, असे गौतम बुद्धांचे वचन आहे. पिकासो मानायचा की जीवनाचा अर्थ आयुष्याने दिलेली भेट प्राप्त करणे आणि आयुष्याचा उद्देश ती भेट इतरांना देऊन टाकणे आहे. आज समाजात अनेक दानशूर आपल्याकडील पुंजी समाजातील गरजूंना देताना त्यांच्यातील अपार दातृत्वाची प्रचिती देतात. असाच विलक्षण अनुभव नुकताच गुळगुळे दाम्पत्याला आला तो श्रीमती नीला गाळवणकर यांच्याकडून.
'नूतन गुळगुळे फाऊंडेशन' गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांगांच्या सेवेचा वसा अखंडपणे चालवत आहे. त्यांचे हे कार्य पाहून श्रीमती नीला गाळवणकर भलत्याच प्रभावित झाल्या, 'दिव्यांग बालकांसाठीच्या उभारल्या जाणाऱ्या "स्वानंद सेवा सदना"च्या निर्मितीसाठी आपलाही हातभार लागावा म्हणून स्वतः श्रीमती गाळवणकर यांनी आपल्या कानात घातलेली सोन्याची रिंग अगदी सहज काढून दिली सोबत या उपक्रमासाठी रुपये एक्कावन हजारांचा धनादेशही देऊन उपक्रमात आपलाही खारीचा वाटा असावा ही भावना व्यक्त केली. आपल्यावर विश्वास टाकणाऱ्या अश्या दानशूर व्यक्ती पाहून गुळगुळे दाम्पत्य गहिवरून गेले होते. समाजातील अश्या दानशूरांमुळेच आपला हा प्रकल्प तडीस जाणार असल्याची खात्री असल्याचे या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा सौ. नूतन गुळगुळे, याप्रसंगी म्हणाल्या. विकासक प्रशांत पाटील,दर्शन राऊत यांना रुपये दोन लाख पन्नास हजारांचा धनादेश श्रीमती गाळवणकर यांच्या हस्ते सुपूर्द करून वसतिगृहाचे संपूर्ण कामकाज सप्टेंबर २०२३ पूर्वी पूर्ण करण्याची विनंती अध्यक्षा सौ. नूतन विनायक गुळगुळे यांनी केली.
या पायाभरणी सोहळ्याच्या प्रमुख अतिथी श्रीमती नीला गाळवणकर म्हणाल्या "नूतन आणि त्यांचे पती विनायक व मुलगा पुष्कर हे अर्नाळ्यात आले नसते तर अर्नाळ्यात आज मानवसेवेचे हे मंदिर उभे करण्याचा विचारही आला नसता, आज भारतामधील सर्वात पहिले कोविड पश्चात दिव्यांग मुलांचे वसतिगृह या गावात निर्माण होत असल्याचा आनंद समस्त अर्नाळकरांनाच नव्हे तर महाराष्ट्रासह देशाला होत असून सर्वांना अभिमान वाटावा असं हे महान कार्य आहे. राज्यपालांनंतर मला या वास्तूची पायाभरणी करण्याचा सन्मान मला देऊन, गुळगुळे कुटुंबीयांनी कृतकृत्य केलं आहे."
शंभर हातांनी घेऊन, हजारो हातांनी दान देण्याची भारतीय परंपरा आहे. यास अनुसरून 'नूतन गुळगुळे फाऊंडेशन' या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गेली अनेकवर्षांपासून देशभरातील दिव्यांगाना आत्मनिर्भर करण्याचे कार्य सुरु असून हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे वसई विकास भाजप अध्यक्षा सौ. गीतांजली वाघ - दरिवाला म्हणाल्या. तर सौ. आम्रपाली साळवे(कोचीन शीपियार्ड लि. - निर्देशक), म्हणाल्या 'स्वानंद सेवा सदना'च्या भूमिपूजन सोहळ्याला राज्यपालांना प्रथम अर्नाळा गावात आणण्याची किमया गुळगुळे परिवाराने करून समस्त अर्णाळकरांच्या हृदयात स्थान मिळविले आहे. आज श्रीमती गाळवणकर यांच्या हस्ते अत्यंत साधेपणाने पायाभरणी करून त्यांच्यातील साधेपणाही दाखऊन दिला, त्यांच्यातील हा साधेपणा आम्हा ग्रामस्थांना त्यांच्याविषयी आपुलकी निर्माण करीत आहे. या उपक्रमाला आमच्या खूप शुभेच्छा.
नूतन गुळगुळे फाउंडेशनच्या "स्वानंद सेवा सदना'च्या पायाभरणी सोहळ्याला संस्थापक अध्यक्ष सौ. नूतन, संचालक श्री. विनायक, कु. पुष्कर गुळगुळे, विनोद धोंड, अमरनाथ तेंडूलकर, सौ. हेमलता बाळशी (सरपंच - अर्नाळा), सौ. सविता ठाकूर ( ग्रामसेवक - अर्नाळा), सुशील ओगले(जिल्हा उपाध्यक्ष भाजप), श्रीमती. वर्षा गाळवणकर, वसंत पाटील (मा. संस्थापक संचालक - वसई विकास सहकारी बँक लि.), डॉ. भगवान पाठक ( कीर्तनकार) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment