Thursday, 19 June 2025

अनेक अडचणींवर केली मात: दुर्मिळ हिमोफिलिया टाईप ३ ने ग्रस्त २८ वर्षीय महिलेने नवी मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये सुरक्षितपणे बाळाला जन्म दिला

दहा लाखांमध्ये एक अशा दुर्मिळ अवस्थेत क्लिनिकल कौशल्य, टीमवर्क आणि वेळेवर उपचारांमुळे गर्भधारणा वाचली

नवी मुंबई, 19 जून 2025: गुजरातमधील एका छोट्या शहरात राहणाऱ्या २८ वर्षीय नाझनी खानसाठी मातृत्व हे एक अशक्य स्वप्न बनले होते. दोन गर्भपातानंतर, नाझनी आणि तिचा पती - जे एक रोजंदारी कामगार आहेत - यांना पुन्हा गर्भवती होण्याची फारशी आशा उरली नव्हती, अशात त्यांना पुन्हा दिवस गेले.  पण त्यांच्या या आनंदावर एका भयानक वास्तवाची काळी सावली पडली: नाझनी यांना टाइप ३ हिमोफिलिया असल्याचे निदान झाले. हा जगातील सर्वात दुर्मिळ रक्तस्त्राव विकारांपैकी एक आहे, जो १०,००,००० महिलांपैकी १ पेक्षा कमी महिलांना होतो.

पुरुषांना होणाऱ्या हिमोफिलियाच्या सामान्य प्रकारापेक्षा वेगळ्या, टाइप ३ व्हॉन विलेब्रँड आजाराचा सर्वात गंभीर प्रकार महिलांसाठी जीवघेणा ठरू शकतो, विशेषतः गर्भधारणेदरम्यान आणि बाळंतपणादरम्यान. रक्त गोठवण्याच्या घटकांची पातळी (फॅक्टर VIII आणि व्हॉन विलेब्रँड घटक) कमालीची कमी असल्याने, शरीरातील लहानशी दुखापत किंवा बदल यामुळे देखील अनियंत्रित रक्तस्त्राव होऊ शकतो.

सातव्या महिन्यात, नाझनीला सतत रक्तस्त्राव होऊ लागला, ज्यामुळे केवळ तिच्या गर्भधारणेलाच नव्हे तर तिच्या जीवालाही धोका निर्माण झाला. उपचारांसाठी मल्टी-डिसिप्लिनरी, संसाधन-केंद्रित दृष्टिकोन आवश्यक होता. कमी उत्पन्न असलेल्या समुदायांमध्ये असे उपचार बहुतेकदा उपलब्ध नसतात.

परंतु पुन्हा एकदा आशा निर्माण झाली कारण एका समर्पित वैद्यकीय पथकाने हार मानण्यास नकार दिला. 

नवी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील बीएमटी आणि सेल्युलर थेरपी (CAR-T) हेमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, कन्सल्टन्ट, डॉ. कुणाल गोयल यांनी या प्रकरणाची जबाबदारी घेतली. त्यांनी माहिती दिली, "रुग्णामध्ये रक्त गोठवण्याच्या घटकाची तीव्र कमतरता होती आणि आपोआप रक्तस्त्राव होण्याचा धोका कायम होता. या प्रकरणात, सामान्य प्रसूती देखील प्राणघातक ठरू शकली असती. जेव्हा ती आमच्या रुग्णालयात आली तेव्हा तिचे आधीच दोन गर्भपात झाले होते, ते देखील कदाचित निदान न झालेल्या रक्तस्त्रावाशी संबंधित होते. रक्तस्त्राव ताबडतोब थांबवणे इतकेच नव्हे तर गर्भधारणा सुरक्षितपणे पूर्ण करणे हे आमच्यासमोरील आव्हान होते. गर्भधारणेचा प्रत्येक आठवडा धोकादायक होता. आम्ही तिच्या तब्येतीवर बारकाईने लक्ष ठेवले, गायनाकोलॉजी आणि क्रिटिकल केअर टीमसोबत काम करून सर्व घटकांची काळजी घेतली. नवव्या महिन्यात, आम्ही बॅकअप व्हाईल्स, आयसीयू तयारी आणि संपूर्ण टीमच्या समन्वयाने प्रसूतीचे काळजीपूर्वक नियोजन केले. हा एक अतिशय उच्च-जोखीम केस होता, परंतु नियोजनासह, आम्ही सर्वोत्तम शक्य परिणाम साध्य केला, आई आणि बाळ दोघांचीही तब्येत उत्तम आहे."

ऑब्स्टट्रिक्स आणि गायनॅकॉलॉजी कन्सल्टन्ट, डॉ. रेणुका बोरिसा म्हणाल्या, “आम्ही पूर्णपणे तयार होतो आणि प्रत्येक संभाव्य गुंतागुंतीचे अनुमान लावलेले होते. सी-सेक्शनच्या तीन दिवस आधी, आम्ही तिची प्रकृती स्थिर केली आणि रक्त गोठवण्याच्या घटकांचे इंजेक्शन दिले जेणेकरून रक्त पातळी वाढेल. आम्ही सुरुवातीला सामान्य प्रसूतीची योजना आखली होती, परंतु प्रसूती तशी झाली नाही, म्हणून आम्ही सी-सेक्शन करण्याचा निर्णय घेतला. रक्त गोठवण्याच्या घटकांचे प्रमाण पुरेसे राहावे, महत्त्वाच्या अवयवांमध्ये चढउतार नियंत्रित करावे आणि रक्तस्त्राव कमी करावा यासाठी काळजीपूर्वक समन्वय साधणे अत्यंत महत्त्वाचे होते. 

ऑब्स्टेट्रीशियन, हेमटोलॉजिस्ट, एनेस्थेटिस्ट, ईएनटी विशेषज्ञ आणि पीडियाट्रिशियन यांचा समावेश असलेली व्यापक उपचार योजना तयार करण्यात आली. अंतर्गत रक्तस्त्राव थांबवण्यासाठी नाकाचे पॅकिंग केले आणि विशेष फॅक्टर VIII आणि व्हॉन विलेब्रँड फॅक्टरचे अत्यंत शुद्ध केलेले कॉन्सन्ट्रेट्स मिळवले.

आर्थिक अडचणींमुळे गुंतागुंत वाढली. कुटुंबाला विशेष उपचार किंवा महागडे फॅक्टर कॉन्सन्ट्रेट्स परवडत नव्हते. रुग्णालयाने आर्थिक निधी मिळवण्याकरता मार्गदर्शन व साहाय्य केले आणि अंतर्गत संसाधनांचा वापर करून, पथकाने कुटुंबावर भार न टाकता उपचार करता येतील याची काळजी घेतली.

सिझेरियन अत्यंत अचूकपणे करण्यात आले. शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांनी फॅक्टर पातळीचे बारकाईने निरीक्षण केले, ती सामान्य पातळीच्या 70-100% दरम्यान राखली, ज्यामुळे रक्तस्त्राव कमी झाला. शस्त्रक्रियेनंतर, आई आणि बाळ दोघांनाही अनुक्रमे आयसीयू आणि एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आले, जिथे त्यांची अनेक दिवस काळजी घेण्यात आली.

परिणाम? निरोगी प्रसूती आणि आशा सोडून दिलेल्या कुटुंबासाठी जीवनाची एक नवीन सुरुवात. क्लिनिकल यशापेक्षाही ही लवचिकता, सहानुभूती आणि वैद्यकीय धैर्याची मानवी कहाणी आहे.

आज, नाझनी तिच्या नवजात बाळासह घरी परतली आहे, दोघांच्याही तब्येती उत्तम आहेत. तिची केस हिमोफिलिया टाईप 3 रुग्णांमध्ये उच्च-जोखीम असलेल्या गर्भधारणेचे व्यवस्थापन करण्यासाठी एक बेंचमार्क मानला जात आहे, ज्यामध्ये राष्ट्रीय प्रोटोकॉल आणि तज्ञ कमी आहेत.

नाझनी खान म्हणाल्या, "दोन गर्भपातानंतर, आम्ही जवळजवळ आशा सोडून दिली होती. परंतु कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी आम्हाला प्रत्येक टप्प्यावर पाठिंबा दिला. त्यांनी घेतलेल्या काळजीमुळे मी माझ्या बाळाला सुरक्षितपणे जन्म देऊ शकले. आम्ही नेहमीच त्यांचे आभारी राहू." 

नवी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे सीओओ डॉ. शशिकांत पवार म्हणाले, "कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबई येथे आम्ही दुर्मिळ आणि आव्हानात्मक प्रकरणांवर उपचार करण्यात आणि उत्कृष्ट परिणाम मिळवून देण्यात अग्रणी आहोत. या प्रकरणात, आमच्या डॉक्टरांच्या टीमने जीव वाचवण्याची त्यांची क्षमता दाखवून हे सिद्ध केले आहे की प्रत्येक जीव आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. ज्या देशात कमी जोखीम असलेल्या गर्भधारणेतही मातामृत्यू एक आव्हान आहे, त्या देशात या केसने लवकरात लवकर निदान, टीमवर्क आणि समावेशक आरोग्यसेवा उपलब्धता सर्वात गंभीर प्रकरणांमध्ये देखील कसे चांगले परिणाम मिळवून देऊ शकते याचे उदाहरण निर्माण केले आहे."

No comments:

Post a Comment