- 'मराठी बाणा'कार अशोक हांडे यांचे भावोद्गार
§ साहित्यसम्राट आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त आत्रेयचा 'आचार्य अत्रे जीवनगौरव पुरस्कार!
§ ‘मराठी टिकवण्याची जबाबदारी गांभीर्याने स्वीकारा!’ - आचार्य अत्रेंच्या जयंती निमित्त मान्यवरांची भावना
मुंबई, विशेष प्रतिनिधी : आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या कन्या शिरीष पै आणि मीना देशपांडे यांनी स्थापन केलेल्या 'आत्रेय' या संस्थेतर्फे दरवर्षी १३ ऑगस्ट या आचार्य अत्रे यांच्या जन्मदिनी, "आचार्य अत्रे पुरस्कार" दिला जातो. आचार्य अत्रे यांच्या १२७ व्या जयंतीचे औचित्य साधून यावर्षीचा हा पुरस्कार प्रख्यात गायक, पटकथाकार, लेखक, दिग्दर्शक व नाटककार म्हणून लौकिक असलेले रंगकर्मी अशोक किसनराव हांडे यांना जेष्ठ विडंबनकवी वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 'आचार्य अत्रे जीवनगौरव पुरस्कार' स्वीकारल्यावर अशोक हांडे म्हणाले. "उंब्रज गावातील भजने, आईच्या ओव्या, हरिपाठ, रंगारी बदक चाळीतील संस्कार आठवतात. माझ्यावर जे रुजवले त्याचा हा पुरस्कार आहे." याप्रसंगी व्यासपीठावर हर्षवर्धन देशपांडे, डिंपल प्रकाशनचे प्रकाशक अशोक मुळे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, साहित्यिक महेश केळुस्कर, ॲड. राजेंद्र पै. विक्रम पै उपस्थित होते.
या पुरस्काराला उत्तर देताना पुढे अशोक हांडे म्हणाले, "मराठी संस्कृती, या राज्याचा इतिहास, भूगोल, मर्म आणि धर्म पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज गरज आहे. आचार्य अत्रे यांच्या स्मृत्यर्थ दिला गेलेला पुरस्कार हा मराठी मातीमुळे, इथल्या संस्कारांमुळे आहे," असे ते म्हणाले.
'आत्रेय'चा 'आचार्य अत्रे जीवनगौरव पुरस्कार' आत्तापर्यंत हा पुरस्कार मंगेश पाडगावकर, बाबासाहेब पुरंदरे, द. मा. मिरासदार,ना. धो. महानोर, डॉ. जयंत नारळीकर, हृदयनाथ मंगेशकर, रामदास फुटाणे, मधुकर भावे, किरण ठाकूर, डॉ. तात्याराव लहाने, अण्णा हजारे, डॉ. जब्बार पटेल, मधु मंगेश कर्णिक अशा दिग्गज मान्यवरांना हा पुरस्कार दिला गेला आहे. अत्रे यांच्या १२७ व्या जयंती दिनी त्यांच्या नावाचा यंदाचा हा जीवनगौरव पुरस्कार अत्रेंसारखेच मराठी आस्मिता जागवणारे अष्टपैलू रंगकर्मी अशोक हांडे या ‘मराठी बाणा’ आणि ‘मराठी आस्मिता’ जागवणाऱ्या अशोक हांडे यांना प्रदान करताना मनस्वी आनंद होत आहे, हाच आनंद माझी आई शिरीष पै यांनाही झाला असेल असे 'आत्रेय'चे ॲड. राजेंद्र पै यांनी अत्रे कुटुंबियांच्या वतीने व्यक्त केले.
या सोहळ्याचे विशेष अतिथी प्रख्यात विडंबनकवी वात्रटिकाकार रामदास फुटाणे म्हणाले "हत्तीण आली पाहिजे, कबुतर गेले पाहिजे यांसारखी अतिमहत्वाची कामे सोडून लोक आले असल्याचे म्हणत त्यांनी त्यांच्या मिश्किल शैलीत चिमटा यावेळी काढला. महाराष्ट्रात मराठीवरून सुरू असलेले राजकारण, मराठी संस्कृती जपण्यासाठीचे प्रयत्न, घरांमधून कमी होणारा मराठीतील संवाद, कमी झालेले वाचन, मराठी - अमराठी वाद अशा पार्श्वभूमीवर मराठी टिकवण्याची जबाबदारी गांभीर्याने स्वीकारण्याची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ‘महाराष्ट्रातील अमराठी लोकांना मराठी भाषिक करावे लागेल, ही राज्यकत्यांची जबाबदारीआहे, अशा शब्दांमध्ये फुटाणे यांनी राज्य सरकारला कर्तव्याची जाणीव करून दिली.
'महाराष्ट्र' हे नाव अत्रेंमुळे मिळाले, याची आठवण करून देत आज अत्रे हवे होते असे उद्गार ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांनी काढले. अत्रे यांचे साहित्य पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, असेही आवाहन त्यांनी केले. या सोहळ्यामध्ये ‘झेंडूची फुले’वर आधारित काव्य आणि विडंबनात्मक काव्याचा सांगीतिक कार्यक्रम ॲड. राजेंद्र पै यांनी सादर केला. यामध्ये रामदास फुटाणे आणि डॉ. महेश केळुसकर यांच्यासोबत मैथिली पानसे जोशी, शिवानी गायतोंडे, निनाद आजगांवकर आणि कौशल इनामदार आदी सहभागी झाले होते.
‘झेंडूची फुले’ची शताब्दी आवृत्ती
आचार्य अत्रे यांच्या जयंतीदिनी त्यांनी लिहिलेल्या ‘झेंडूची फुले’ या विडंबन काव्यसंग्रहाला १०० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने या काव्यसंग्रहाच्या शताब्दी आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. या शताब्दी संग्रहाचे संपादन कवी डॉ. महेश केळुसकर यांनी केले आहे. डिंपल प्रकाशनाने याचे प्रकाशन केले आहे. या वेळी ‘कऱ्हेचे पाणी’ या अत्रेंच्या आत्मचरित्राचेही पुनर्प्रकाशन करण्यात आले. परचुरे प्रकाशनाच्या माध्यमातून हे प्रकाशन करण्यात आले. मनोरमा प्रकाशनातर्फे ‘अत्रे टोला’ आणि ‘अत्रे प्रहार’ या ग्रंथांचेही यावेळी पुनर्प्रकाशन करण्यात आले.
No comments:
Post a Comment