Wednesday, 20 August 2025

संगीतातील सर्वोच्च सन्मान ‘संगीत महामहोपाध्याय’ डॉ. भरत बलवल्ली यांना प्रदान!

 

भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेचे शतकांपासून जतन आणि संवर्धन करणारी संस्था म्हणजे ‘अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय’. यंदा या संस्थेच्या स्थापनेचा १२५ वर्षांचा प्रवास पूर्ण होत असताना, संस्थापक गायनाचार्य पं. विष्णु दिगंबर पलुसकर यांच्या १५२व्या जयंतीनिमित्त हा सोहळा ऐतिहासिक तेजाने उजळून निघाला. १८ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता, नवी मुंबईतील तेरना सभागृहात पार पडलेला विशेष पदवीदान समारंभ म्हणजे फक्त पदव्यांचे वितरण नव्हते, तर ती एक सुरांची पवित्र यात्रा होती - ज्यात भारताच्या विविध प्रांतांतील गुणवंत विद्यार्थी, नामवंत कलाकार आणि रसिक एकत्र जमले होते.

 

या सोहळ्यात देशभरातून आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना संगीत विशारद आणि संगीत अलंकार या पदव्या प्रदान करण्यात आल्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या प्रख्यात भरतनाट्यम नृत्यांगना पद्मविभूषण विदुषी सोनल मानसिंह. याच प्रसंगी, संगीत क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा सन्मान -‘संगीत महामहोपाध्याय’ - डॉ. भरत बलवल्ली यांना प्रदान करण्यात आला. हा सन्मान म्हणजे केवळ एका कलाकाराचा गौरव नसून, भारतीय संगीतसाधनेच्या अध्यात्मिक प्रवासालाच दिलेली प्रतिष्ठा होती.

 

डॉ. भरत बलवल्ली हे केवळ गायक नाहीत; ते एका संगीतिक - आध्यात्मिक चळवळीचे प्रवर्तक आहेत. त्यांच्या गायकीत भारतीय रागांची अध्यात्मिक गूढता, श्रुतींचे वैदिक विज्ञान आणि स्वरांचा मंत्रोच्चार सामावलेला आहे. त्यांच्या अद्वितीय ग्रंथ रागोपनीषद मधून त्यांनी भारतीय रागदारी संगीतातील उपनिषदात्मक तत्वज्ञान जगासमोर मांडले आहे. जगभरातील मंचांवर सादर करताना त्यांनी दाखवून दिले की राग हे केवळ कलात्मक कौशल्य नसून, मानव - चेतनेला जागवणारे आध्यात्मिक साधन ठरू शकतात. डॉ. भरतजींच्या संगीतात भक्ती आहे, संवेदना आहे, आणि अंतर्मनाला स्पर्श करणारा साक्षात्कार आहे. म्हणूनच आज अनेक तरुण कलावंत व साधक त्यांच्याकडून प्रेरणा आणि मार्गदर्शन घेत आहेत. संगीताला त्यांनी केवळ कला म्हणून न सादर करता, आत्मशोधाचा मार्ग म्हणून स्वीकारले आहे. त्यांनी जागतिक स्तरावर मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या गायकीचे सामर्थ्यशाली पद्धतीने सादरीकरण करून, त्यांची शास्त्रीय गायकी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली आहे. त्यांच्या सादरीकरणातून दीनानाथांची स्वरप्रतिभा, गाम्भीर्य आणि भाववैभव सर्व श्रोत्यांपर्यंत दुमदुमले. हा प्रयोग म्हणजे एकाच वेळी परंपरेचा गौरव आणि जागतिक संगीतविश्वासाठी एक अमूल्य देणगी ठरली. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील त्यांची खयाल गायकी ही विलक्षण कलात्मकता आणि सामर्थ्य यांची जणू मूर्तप्रतिमा आहे. आलापातील गूढ विस्तार, तनांतील विलक्षण वेग, आणि सुरांच्या प्रत्येक वळणात उमटणारी अध्यात्मिक छटा यामुळे त्यांची गायकी एकाच वेळी गहन आणि जीवनस्पर्शी भासते. त्यांच्या स्वरांमधील अद्वितीय सामर्थ्यामुळे खयाल हा केवळ रागसंगीताचा प्रकार न राहता, तो आत्म्याच्या गाभाऱ्यातून उमटणारा मंत्रानुभव ठरतो. भगवान दत्तात्रेय आणि स्वामी समर्थ यांच्या उपासनेसह मंत्रशक्ती, योगतत्त्वे आणि स्वरशास्त्र यांचा त्यांनी अद्भुत संगम साधला आहे. त्यांच्या गायनातून एक झुळूक येते - जी सुरांसह अंतर्मनाला जागृत करते.

 

या सोहळ्याचा आणखी एक पैलू म्हणजे गायनाचार्य पं. विष्णु दिगंबर पलुसकर यांच्या कार्याची स्मृती. त्यांनी १९०१ साली लाहोर येथे स्थापन केलेल्या गांधर्व महाविद्यालयाने संगीत शिक्षणाला संस्थात्मक व शिस्तबद्ध रूप दिले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे गुरुशिष्य परंपरेच्या चौकटीतून बाहेर पडून संगीत समाजाच्या घराघरात पोहोचले. भजन-कीर्तनापासून रागदारीपर्यंत त्यांनी संगीत सर्वसामान्यांपर्यंत नेले.

 

आज १२५ वर्षांनंतरही गांधर्व महाविद्यालयाची परंपरा तेजाने झळकत आहे - आणि या परंपरेच्या सुवर्णपानांमध्ये डॉ. भरत बलवल्ली यांना मिळालेला सर्वोच्च सन्मान ही एक ऐतिहासिक घटना ठरली आहे. हा सोहळा म्हणजे शतकोत्तर परंपरा, आधुनिक दृष्टिकोन आणि अध्यात्मिक उंची यांचा संगम होता. पं. पलुसकरांची विचारधारा, गांधर्व महाविद्यालयाचा वारसा आणि डॉ. भरत बलवल्ली यांचे जागतिक कार्य एका व्यासपीठावर आले आणि संगीताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणारा क्षण घडला

No comments:

Post a Comment