महिला, गुरू,वयोवृद्ध आणि निसर्ग यांचा आदर केला जावा ही भारतीय मूल्ये विद्यार्थी वर्गाला शिकवण्याची गरज
महिलांच्या विरोधातल्या अत्याचाराविषयी मानसिकता बदलण्याची गरज; महिलांच्या सबलीकरणाशिवाय राष्ट्राचे कल्याण होणे अशक्य: उपराष्ट्रपती
सिम्बायोसिस इंटरनॅशनल (अभिमत विद्यापीठ) शिक्षण संस्थेच्या 16व्या दीक्षांत समारंभामध्ये उपराष्ट्रपतींचे भाषण
नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2019
लिंग, जात आणि महिलांचा अनादर यासारख्या समाजातल्या वाईट गोष्टी संपुष्टात आणण्यासाठी आणि देशाला समानतेच्या माार्गावर नेण्यासाठी युवकांनी पुढाकार घेवून कार्य करावं, असं आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज पुणे इथं केलं.
महिलांवर नुकत्याच घडलेल्या अत्याचाराच्या घटना या चिंताजनक आहेत, यावरून समाजिक मूल्यांचा -हास होत असल्याचं जाणवत आहे, अशावेळी केवळ कायदे मंजूर करून महिलांच्या विरोधात होणारी कृत्ये थांबतील, असं नाही तर त्यासाठी लोकांच्या मानसिकतेमध्ये परिवर्तन घडवून आणले पाहिजे, असंही उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले.
पुण्यातल्या सिम्बायोसिस इंटरनॅशनल (अभिमत विद्यापीठ) शिक्षण संस्थेच्या 16व्या दीक्षांत समारंभामध्ये उपराष्ट्रपतींचे आज भाषण झाले. महिला, गुरू, वयोवृद्ध आणि निसर्ग यांचा आदर करण्याची भारतीय परंपरा आणि संस्कृती आहे. नवीन पिढीला शैक्षणिक संस्था, अध्यापक, शिक्षक आणि पालक यांनी ही भारतीय मूल्ये शिकवावीत, असं आवाहन त्यांनी केलं.
आता आपल्याला पुन्हा एकदा मुळाशी गेलं पाहिजे. आपल्या जुन्या परंपरा, संस्कृती आणि नैतिक मूल्ये यांचं पालन केलं पाहिजे, असंही उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले.
घरातल्या महिलेला आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण केले गेले तर त्या संपूर्ण कुटुंबाचा कायाकल्प होतो. आणि असे झाले तर संपूर्ण देशाचे कल्याण होवू शकते. मात्र महिलेच्या सक्षमीकरणाशिवाय काहाही होणं अवघड आहे, असं मनोगत व्यक्त करून उपराष्ट्रपतींनी देशातली विद्यापीठे आणि उच्च शिक्षण देणा-या संस्थांनी महिलांच्या सबलीकरणासाठी विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन केले.
शैक्षणिक संस्था या उद्योग, व्यवसाय उभारणीच्या कार्यशाळा बनल्या जाव्यात, लहान-मोठे व्यवसाय निर्माण करण्यासाठी शिक्षण दिले जावे, तसेच यामध्येही महिलांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य दिले जावे, असे ते म्हणाले.
सामान्य माणसाला दैनंदिन जीवनामध्ये येत असलेल्या समस्यांना शाश्वत उत्तरे शोधण्यासाठी अभ्यास केला जावा. आजच्या मुलांनी यासाठी चैाकटी बाहेर जावून विचार करून संकल्पना प्रत्यक्षात आणाव्यात. विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवसंकल्पना यांच्यामुळे मानवाचे आयुष्य अधिक सुखकर बनवण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले.
शिक्षणामुळेच समाजामध्ये परिवर्तन घडून येत असते, म्हणून शिक्षणसंस्था या नवीन पिढीच्या मार्गदर्शक आहेत, असं त्यांनी यावेळी नमूद केलं.
बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये, तसेच नव्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमध्ये मुलांची उत्तम तयारी करून घेण्यासाठी तसेच विद्यापीठांच्या दर्जामध्ये सुधारणा घडून येणे आवश्यक आहे.
आपल्या भाषणात ऐतिहासिकदृष्ट्या पुणे शहराचे महत्व उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केलं. स्वातंत्र्यवीर सावरकर, गोपाळकृष्ण गोखले, महर्षी कर्वे आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासारख्या महान स्वातंत्र्य सेनानींची आणि समाज सुधाारकांची ही भूमी आहे, तसंच महात्मा गांधी यांचेही या शहराबरोबर विशेष ऋणानुबंध होते, असा संपन्न वारसा असलेल्या पुणे शहरातल्या सिम्बायोसिस संस्थेच्या विद्यार्थी वर्गाला तितकंच उच्च दर्जाचं ज्ञान प्राप्त झालं असेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी ज्येष्ठ संशोधक डॉ. टेसी थॉमस आणि ख्यातकीर्त गीतकार, लेखक जावेद अख्तर यांना संस्थेनं ‘डी.लिट.’ ही सन्माननीय मानद उपाधी उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आली. या दोघांचेही नायडू यांनी अभिनंदन करून त्यांच्या कार्याच्या गौरव केला.
यावेळी भूतान, मलावी, सुदान, जपान आणि इतर देशांच्या विद्यार्थ्यांच्यावतीने उपराष्ट्रपतींना सन्मान म्हणून त्यांच्या देशांचे ध्वज भेट देण्यात आले. या दीक्षांत समारंभाला संस्थेचे संचालक, वेगवेगळ्या विभागांचे प्रमुख, विषय प्रमुख आणि संस्थेच्या विविध शाखांमधले जवळपास 10हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये जवळपास 85 देशांमधले विद्यार्थी सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment