Monday, 18 May 2020

Zee Yuva | Yuva Dancing Queen | डान्सिंग क्वीन कृतिका गायकवाडचा ड्रेस ठरतोय चर्चेचा विषय!!!


प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणाऱ्या 'झी युवा' वाहिनीवर काही कालावधीपूर्वी, 'युवा डान्सिंग क्वीन' ही नृत्य स्पर्धा सुरू झाली. अल्पावधीतच या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकली. स्पर्धकांचे उकृष्ट डान्स परफॉर्मन्स व सोनाली कुलकर्णी आणि मयूर वैद्य यांचे उपयुक्त परीक्षण यामुळे दिवसेंदिवस या स्पर्धेत अधिक रंग भरले गेले. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवली आहे. प्रेक्षकांना त्यांच्या लाडक्या क्वीन्सचे जबरदस्त परफॉर्मन्स पाहण्याची संधी मिळत नाहीये. प्रेक्षक आणि स्पर्धक युवा डान्सिंग क्वीनचा मंच खूपच मिस करत आहेत. अर्थात, स्पर्धेतील ललना, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात आहेत. सगळ्यांची लाडकी कृतिका गायकवाड सुद्धा खास सरप्राईज घेऊन आली आहे.
नुकताच तिने इंस्टाग्रामवर एका आगळ्या लुकमध्ये फोटो टाकला आहे. हा फोटो खूप व्हायरल झाला असून, सध्या मराठी मनोरंजन विश्वात, कृतिकाच्या या फोटोवरून जबरदस्त चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर सध्या खूपच प्रसिद्ध असलेलं, 'न्यूजपेपर ड्रेस' हे आव्हान कृतिकाने स्वीकारलं आहे. या फोटोमध्ये तिने घातलेला ड्रेस, पूर्णपणे वर्तमानपत्रापासून बनवलेला आहे. तिने स्वतः तयार केलेला हा 'ऑफ शोल्डर क्रॉप टॉप' तिच्यातील आणखी एका उत्कृष्ट कलेचा नमुना म्हणता येईल. या टॉपच्या डिझाईनला साजेसा असा स्कर्ट आणि बेल्ट सुद्धा तिने वर्तमानपत्राच्या साहाय्याने बनवला आहे. सोशल मीडियावरील एक खास आव्हान स्वीकारून, तिने तिच्या सर्व चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.

1 comment: