लॉकडाऊनच्या काळात सगळेच व्यवहार ठप्प झाले होते. मनोरंजन विश्वाचे चित्रीकरण सुद्धा संपूर्णपणे बंद होते. कामापासून दूर राहिल्यामुळे कलाकारांना सुद्धा आता कंटाळा येऊ लागला आहे. बंद पडलेलं चित्रीकरण, आता पुन्हा सुरू होणार आहे. पुन्हा सेटवर काम करायला मिळणार, म्हणून कलाकार मंडळी खुश आहेत. 'झी युवा' वाहिनीवरील 'डॉक्टर डॉन' म्हणजेच, आपला सगळ्यांचा लाडका अभिनेता देवदत्त नागे हादेखील खूप उत्सुक असल्याचे कळते. आता प्रेक्षकांची प्रतिक्षा संपणार, आणि त्यांच्या लाडक्या मालिका त्यांना पाहायला मिळणार, याचा जितका आनंद प्रेक्षकांना झाला आहे, तेवढाच तो कलाकार मंडळींना सुद्धा झाला आहे. जे काम १०० जणांच्या युनिटमध्ये करण्यात येत होते, ते यापुढे २० ते २५ जणांच्या युनिटला घेऊन पूर्ण करावे लागणार आहे. असे करणे खूप कठीण असले, तरीदेखील सगळ्यांच्या आरोग्यासाठी गरजेचे आहे. कलाकारांना त्यांच्या स्वतःच्या आणि त्यांच्यासाठी झटणाऱ्या संपूर्ण टीमच्या आरोग्याची काळजी आहे, हे यातून दिसून येते. कलाकारांना पुन्हा टीव्हीवर पाहायला मिळणार याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना आहे. जिम बंद असूनही देवदत्तचे पिळदार शरीर मात्र तसेच आहे. लॉकडाऊनमध्ये सुद्धा त्याने व्यायामाच्या दिनक्रमाला लॉक लावलेला नाही.
मालिकांचे चित्रीकरण पुन्हा सुरू होत असल्याने, अभिनेता देवदत्त नागे यालाही आनंद झाला आहे. याविषयी बोलताना तो म्हणाला;
"चित्रीकरण पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मी आभार मानतो. चित्रिकरणापासून आम्ही कलाकार मंडळी बरेच दिवस दूर आहोत. 'लाईट्स कॅमेरा ऍक्शन' हे शब्द पुन्हा ऐकायला मिळणार आहेत, याचा आनंद आहे."
No comments:
Post a Comment