'घरात बसले सारे' हि भारतातील पहिली दैनंदिन मालिका आहे ज्यात बोलके बाहुले आहेत - सत्यजित पाध्ये
लॉकडाऊनमध्ये प्रेक्षकांच्या मनोरंजनाला पूर्णविराम लागू नये याची पूर्ण जबाबदारी झी मराठी या वाहिनीने घेतली आहे. म्हणूनच हि वाहिनी घेऊन येत आहे बोलक्या बाहुल्यांची धमाल मालिका 'घरात बसले सारे'. बोलक्या बाहुल्यांची हि मालिका ८ जून पासून संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रामदास पाध्ये आणि त्यांचे मित्र म्हणजेच त्यांचे बाहुले प्रेक्षकांचं या लॉकडाऊनच्या काळात भरभरून मनोरंजन करणार यात शंकाच नाही. या कार्यक्रमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली ती म्हणजे रामदास पाध्ये यांचे सुपुत्र सत्यजित पाध्ये यांनी.
या कार्यक्रमाबद्दल बोलताना सत्यजित म्हणाला, "घरात बसले सारे हा कार्यक्रम खूप मजेशीर झालेला आहे. लॉकडाऊनच्या काळात असा युनिक कार्यक्रम झी मराठी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे त्यामुळे मी झी मराठीचा आभारी आहे. मला सांगताना खूप अभिमान वाटतो आहे कि 'घरात बसले सारे' हि भारतातील पहिली दैनंदिन मालिका आहे ज्यात बोलके बाहुले आहेत. हे बोलके बाहुले विशिष्ट व्यक्तिरेखा साकारणार आहेत आणि त्यांचीच प्रमुख भूमिका असणार आहे. मी या कार्यक्रमाचं दिग्दर्शन केलं आणि मला खूप धमाल आली. मी बाहुल्यांना आवाज देखील दिला आहे तसंच चित्रीकरणात काही बाहुले ऑपरेट देखील केले. मी आणि माझ्या कुटुंबीयांनी एकत्र मिळून, घरी राहून हि मालिका बनवली आहे. लॉकडाऊनमुळे हि खास मालिका सादर करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि प्रेक्षकांना देखील हि मालिका आवडेल अशी मी आशा करतो."
No comments:
Post a Comment