मुंबई ७ जानेवारी, २०२१ : एक हक्काचं घरं, आधाराचा हात आणि एक हाक देताच मदतीला धावून येणारा शेजारी लाभण म्हणजे भाग्यच. असं म्हणतात, ‘कोसो दूर असलेल्या नातेवाईंकापेक्षा हाकेच्या अंतरावर असलेला शेजारी अधिक जवळचा’. अडीअडचणीच्या काळात आपल्याला पहिल्याप्रथम आठवतो तो शेजारीच... सुखाच्या क्षणी ते आपल्यासोबत कायम असतात, दु:खात खंबीरपणे आपली साथ देतात आणि म्हणूनच हे शेजारी आपल्याला आपले सख्खे वाटतात.... आजच्या धकाधकीच्या जीवनात नात्यांमध्ये दुरावा येत चालला आहे, रक्ताची माणसं भेटत नाही, पण हक्काचा शेजारी लगेच धावून येतो. नातेवाईक सणासुदीला येतात पण रोज संबंध येतो तो शेजार्यांशी म्हणूनच त्यांच्याशी एक जवळचं, आपुलकीचं नातं तयार होतं. काही शेजा-यांशी आपले घरचे ऋणानुबंध जोडले जातात आणि म्हणूनच आपण त्यांना ‘सख्खे शेजारी” म्हणतो... अशाच आपल्या जवळच्या शेजारी कुटुंबांसोबत रंगणार आहेत लय भारी गप्पा, जेव्हा घरी येणार ‘सख्खे शेजारी’… रक्ताचं नातं नसलं तरी एक ‘हक्काचं’, 'माणूसकी'चं नातं चिरंतन टिकवून ठेवणाऱ्या शेजारधर्माचा सन्मान करणारा शेजारोत्सव म्हणजेच हा कार्यक्रम...आपण आपल्या जीवाभावाच्या शेजार्याला किती ओळखतो, त्यांच्याबद्दल किती माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी आणि याच शेजार्यांसोबत असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा उत्सव साजरा करण्यासाठी कलर्स मराठी टेलिव्हीनजनवर पहिल्यांदाच घेऊन येत आहे एक धम्माल शो ‘सख्खे शेजारी’ ११ जानेवारीपासून सोम – शनि संध्या ६.३० वा. महाराष्ट्राचा लाडका कलाकार चिन्मय उदगीरकर कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहे. कार्यक्रमाची निर्मिती OMG ऑफबीट मीडिया गाईड ही संस्था करणार आहे.
आजपर्यंत आपण कुटुंबातील सदस्यांना, गृहलक्ष्मींना, त्यांच्या नवर्यांना इच्छापूर्तीसाठी खेळताना बघितलं. पण, दोन सख्खे शेजारीच एकमेकांसोबत खेळताना कधीच पहिले नाही. आता पहिल्यांदाच धम्माल उडवून देणार आहेत, अनेक वर्षांपासून एकमेकांच्या सुख दु:खाचे वाटेकरी दोन “सख्खे शेजारी” ! अनेक वर्षे एकमेकांच्या सान्निध्यात राहिलेली, एकमेकांशी ऋणानुबंध असलेली, सांसारिक वाटचालीत साक्षीदार असलेली, आजूबाजूला किंवा एकाच सोसायटीत राहणारी दोन कुटुंबं या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमामध्ये येणार्या दोन सख्ख्या शेजार्यांमधील नातं किती घट्ट आहे हे अनुभवण्यासाठी काही गमंतीदार, धम्माल असे गेम, टास्क सादर होतील... जे कुटुंब त्यांच्या शेजार्यांविषयी अचूक माहिती सांगतील ते ठरणार आहेत त्या भागाचे विजेते. कार्यक्रमामध्ये विजेत्या कुटुंबाला मिळणार आहे ५० गृहउपयोगी गोष्टी, डिझायनर नेमप्लेट याचसोबत सहभागी कुटुंबियांना गेममध्ये रोख रक्कम जिंकण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमाचं आणखी एक वैशिष्ट्य असं की, चिन्मय उदगीकर या कार्यक्रमामध्ये येणार्या कुटुंबासोबत हितगुज करणार आहे, त्यांच्याबद्दलच्या काही मजेशीर गोष्टी जाणून घेणार आहे.
कार्यक्रमाविषयी बोलताना प्रमुख – मराठी टेलिव्हीजन, वायाकॉम18 चे दीपक राजाध्यक्ष म्हणाले, “शेजार हा आपल्या मराठी संस्कृतीत धर्म मानला गेला आहे... ह्याचा अर्थ नात्यात जबाबदारी, प्रेम, सकारात्मकता अपेक्षित असते. शेजार म्हणजे समृद्ध नात्याचं भांडार आहे… म्हटलं तर कुळाचार आहे, संस्कृती आहे...२०२० मध्ये आपल्या सगळ्यांनाच "शेजारधर्माचं" महत्व समजलं आहे. कोरोनासारख्या महामारीला तोंड देताना, सर्वात मोठा आधार होता तो शेजार्यांचा. नातेवाईक तर खूप लांब होते मात्र जवळ खंबीरपणे उभा होता तो शेजारी. महाराष्ट्रात देखील असे असंख्य सख्खे शेजारी आहेत ज्यांचं एममेकांशी रक्ताचं नातं नसलं तरी एक ‘हक्काचं’ जीवाभावाचं नातं आहे... असेच काही निवडक शेजारी आम्ही सख्खे शेजारी या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे...
कलर्स मराठीतर्फे विविध रंगी,विविध रुपी कार्यक्रमाद्वारे वेगवेगळ्या नात्यातील अनेक कंगोरे प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत असतो. पण नात्यातील विविधता शोधताना "शेजाऱ्याचं” नातं फार जवळचं, विविध छटांचं असतं. एक अगदी वेगळा पण तरीही आपल्या आयुष्यातील अनोख्या नात्यावर प्रकाश टाकणारा हा नवाकोरा कार्यक्रम म्हणजेच “सख्खे शेजारी”.
कार्यक्रमाविषयी बोलताना चिन्मय उदगीरकर म्हणाला, “बऱ्याच वर्षांपासून काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. ‘सख्खे शेजारी’ सारखा वेगळा कार्यक्रम करण्याची संधी मिळाली मी खूप आनंदी आहे. मी आजवर प्रेक्षकांना वेगवेगळ्या भूमिकांमधून भेटलो. कलर्स मराठीसोबत माझं खूप जिव्हाळ्याचं नातं आहे आणि मी पुन्हा एकदा या कुटुंबाशी जोडलो जातो आहे याचा मला खूप आनंद आहे. आजवर प्रेक्षकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं आता कलर्स मराठीवरील या कार्यक्रमाद्वारे मी रसिक प्रेक्षकांना एका नव्या भूमिकेमध्ये भेटायला येणार आहे, जे माझ्यासाठी एक प्रकारचं आव्हानच आहे. या कार्यक्रमाद्वारे मला त्यांच्या कुटुंबाचा भाग होऊन सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली आहे हे माझ्यासाठी खूप खास आहे. इतकंच नसून यानिमित्ताने कलर्स मराठी कुटुंबाचा भाग होऊन मी कलर्स मराठीला लोकांच्या घरात घेऊन जाणार आहे, आणि कुटुंब मोठं करणार आहे. खरंतर मी खूप ऊत्सुकदेखील आहे...ऊत्सुक यासाठी की ज्या प्रेक्षकांनी माझ्यावर इतकी वर्ष भरभरून प्रेम केलं त्यांना मी चिन्मय उदगीकर म्हणून प्रत्यक्षात भेटण्याची संधी मिळणार आहे. मला खात्री आहे प्रेक्षकांचं प्रेम यावेळेस देखील तितकंच मिळेल”.
शेजारपण जपणारे, जीवाला जीव लावणारे सख्खे शेजारी या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. महाराष्ट्रातील प्रेक्षकसुद्धा त्याच्या शेजाऱ्यांसोबत असंच नातं अनुभवत असल्याने शो मध्ये दोन शेजाऱ्यांमधला हा संवाद, त्यांचे ऋणानुबंध, त्यांच्या हृद्य आठवणी प्रेक्षकांना नक्कीच आपल्याशा वाटतील... जसे आपल्या शेजार्यांसाठी नवी कोरी गाडी विकरणारे कांदिवलीचे निवृत्ती पवार... तर दुसरीकडे १५० वर्षांपासून शेजारपण जपणारे म्हात्रे आणि भोईर कुटुंब, तसेच मंता आणि सिंहासने परिवार... असे आणि यांसारखे अनेक सख्खे शेजारी येत आहेत आपल्या भेटीला... तेव्हा या ऊत्सवात आपण देखील सहभागी होऊया ‘सख्खे शेजारी’ या कार्यक्रमामधून ११ जानेवारीपासून सोम – शनि संध्या ६.३० आपल्या कलर्स मराठीवर.
No comments:
Post a Comment