सेवाग्राम, 17 ऑगस्ट 2019
माझ्या भाषणाच्या सुरुवातीला मी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात आलेल्या भीषण महापुरात बळी गेलेल्या तसेच पीडित लोकांच्या कुटुंबीयांप्रती तीव्र शोकसंवेदना व्यक्त करतो. या पुरात ज्यांनी आपल्या जवळची प्रिय माणसे गमावली आहेत, त्यांच्या दुखाःत मी सहभागी असून त्या कुटुंबाना हे दु:ख सहन करण्याची ताकद मिळो, यासाठी मी प्रार्थना करतो. ज्यांना या महापुराचा फटका बसला आहे, त्यांचे आयुष्य लवकरत सुरळीत होईल, अशी आशा आणि इच्छा मी व्यक्त करतो. पूरग्रस्त भागात मदत आणि बचावकार्य करणारे केंद्र आणि संबंधित राज्य सरकारांच्या सर्व विभागांचे, तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कार्याचे मी कौतुक करतो. मला असे सांगण्यात आले आहे की, तुमच्या संस्थेनेही आजूबाजूच्या राज्यातल्या पूरग्रस्त भागातल्या नागरिकांसाठी मदत पाठवली आहे.
महात्मा गांधी वैद्यकीय शिक्षण संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित समारंभात सहभागी होताना मला विशेष आनंद होत आहे. या 50 वर्षात, या पवित्र शिक्षणसंस्थेने देशाच्या प्रगतीत मोठे योगदान दिले आहे. शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य तसेच जनतेची सेवा केल्यामुळे या संस्थेने समाजात गौरव आणि आदराचे स्थान निर्माण केले आहे. महात्मा गांधी यांच्या जीवन आणि शिकवणीतून प्रेरणा घेऊन सुरु झालेल्या या संस्थेचा प्रवास असाच यश आणि समृद्धीकडे नेणारा होता.
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि तुमच्यामध्ये सच्चे बंध आहेत आणि या दृढ नात्याला यंदा आणखीनच महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण यावर्षी आपण महात्मा गांधी यांचे 150 जयंतीवर्ष साजरे करत आहोत आणि या संस्थेलही याच वर्षी 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. या संस्थेची स्थापनाच 1969 साली महात्मा गांधी यांच्या 100 व्या जयंतीवर्षाचे औचित्य साधून करण्यात आली होती. आज या निमित्ताने, मी या संस्थेच्या संस्थापक डॉक्टर सुशीला नायर यांच्या निःस्वार्थी सेवाकार्याचे स्मरण करु इच्छितो. एक सच्च्या गांधीवादी, निःस्वार्थी स्वातंत्र्य सैनिक आणि द्रष्ट्या डॉक्टर असं सुशीला नायर यांचे व्यक्तिमत्व होते. त्या गांधीजींच्या जवळच्या सहकारी होत्या आणि त्यांनी आपल्या आयुष्यातला मोठा काळ सेवाग्राम आश्रमात व्यतीत केला होता. आज या संस्थेने सुवर्णमहोत्सवी वर्षापर्यंत प्रगती केली आहे. या संस्थेशी संबंधित आपण सर्व आणि देश-विदेशात असलेले, संस्थेच्या परिवारातल्या सर्व लोकांचे मी हार्दिक अभिनंदन करतो.
इथे येण्यापूर्वी, मला इथून जवळच असलेल्या महात्मा गांधी आश्रमाला भेट देण्याची संधी मिळाली. या आश्रमाच्या चार भिंतीदेखील आपल्याला मोठी प्रेरणा आणि शिकवण देतात. मी जसाजसा त्या आश्रमाच्या परिसरात फिरत होतो, मला गांधीजीनी केलेला संघर्ष आणि त्याग याची आठवण येत होती, आणि मी समजून घेण्याचा प्रयत्न करात होतो की आपण सर्व, आपला देश महात्मा गांधी यांचे देणे लागतो. सत्य, अहिंसा आणि मानवतेच्या मुक्तीसाठी गांधीजीनी केलेल्या अनेक प्रयोगांचे केंद्र सेवाग्राम आश्रम हेच होते. स्वच्छता आणि आरोग्यासाठी असलेला त्यांच्या आग्रहाचे ठसे या परिसरात आपल्याला खोलवर उमटलेले दिसतात. त्यांनी आपल्या कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाची सुरुवात आश्रमातच केली. याच आश्रमात त्यांनी सार्वजनिक स्वच्छतेसाठी सामुदायिक उपक्रम सुरु केले. आज भारतात स्वच्छ भारता आणि हागणदारीमुक्त देश निर्माण करण्याच्या आपल्या मोहिमेमागची प्रेरणा गांधीजीचे विचार हीच आहे.
प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
सेवाग्राम, वर्धा आणि विदर्भाचा एक अभिमानास्पद इतिहास आहे. याच परिसरात आचार्य विनोबा भावे यांनी आपल्या ‘भूदान चळवळी’चा शुभारंभ केला होता. इथून जवळच असलेल्या आनंदवन येथे बाब आमटे यांनी कुष्ठरोगी आणि इतर वंचितांसाठी सामाजिक सुधारणांची मोहीम हाती घेतली. आपण ही सेवेची आणि सामाजिक न्यायाची समृद्ध परंपरा एका नव्या उंचीवर नेली आहे. यां वैद्यकीय महाविद्यालयाची यशाची परंपरा कायमच वाढती राहिलेली आहे. ग्रामीण भारतात सुरु होणारे हे देशातील पाहिलेच वैद्यकीय महाविद्यालय होते. आणि त्या अर्थाने भारताच्या विकासाच्या इतिहासात ह्या संस्थेने एका पानावर आपले नाव अभिमानाने कोरले आहे. ग्रामीण भागातील गरीब जनतेची सेवा करण्याच्या श्रेष्ठ कल्पनेतून या संस्थेची स्थापना झाली आहे. आज देशातील सर्वोत्कृष्ट वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये या संस्थेची गणना केली जाते. या संस्थेचे माजी विद्यार्थी आज देशविदेशात शीर्षस्थ स्थानी चमकत असून आरोग्याच्या क्षेत्रात राष्ट्रीय कार्यक्रम आखणी किंवा अभिनव वैद्यकीय चिकित्सापद्धती विकसित करण्याची जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत. काही जणांनी तर आपल्या देशाची मोठी सेवा केली आहे-या संस्थेचे हुशार माजी विद्यार्थी, डॉक्टर के के अग्रवाल यांना पदमश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, तर इतर अनेकांना डॉ. बी. सी. रॉय पुरस्कार मिळाला आहे. डॉक्टर आणि वैद्यकीय विशारद म्हणून, आपल्या समाजाच्या जडणघडणी मध्ये आणि लोकांच्या कल्याणामध्ये तुम्ही महत्वाची भूमिका बजावता. तुम्ही करोडोंसाठी आशेची किरण आहात. मला असे सांगण्यात आले आहे की, तुमचा अभ्यासक्रम सुरु होण्यापूर्वी तुमच्यातील प्रत्येकजण सेवाग्राम आश्रमातील अभिमुखता कार्यक्रमात सहभागी झाला आहे. तुम्हाला दिलेला हा एक दुर्मिळ विशेषाधिकार आहे. तुम्ही इथे राहून महात्मा गांधींचे जीवन शिकता- नितीमत्ता, सहानभूती, श्रमाची प्रतिष्ठा आणि मानवतेची सेवा करायला शिकता. तुमची ग्राम दत्तक योजना, जिथे तुम्ही ग्रामीण भागातील कुटुंबांची काळजी घेता आणि तुम्ही जोवर सेवाग्राम मध्ये राहता तुम्ही नेहमी त्यांच्या सहवासात राहता यामुळे तुमच्यात सेवाभाव निर्माण झाला आहे. आपल्या संस्थेतील शैक्षणिक प्रणालीमधील ही वैशिष्ट्ये मूल्य आधारित शिक्षणाचा साचा सादर करतात, ज्याचे अनुसरण आणि अनुकरण बरेचजण करू शकतात. तुमचे ग्रामीण प्रशिक्षण आणि तुमचा समुदाय सबलीकरणाचा दृष्टीकोन ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य सेवांमधील दरी दूर करायला मदत करत आहे.
बंधू आणि भगिनींनो,
आरोग्य क्षेत्र हे भारतासाठी महत्वाचे विकास आव्हान आहे. जागतिक लोकसंख्येच्या 18 टक्के लोकसंख्या आपल्या देशात, जागतिक आजारांचे प्रमाण 20 टक्के आहे. आपल्या समोर संसर्गजन्य, असंसर्गजन्य आणि नव्याने येणाऱ्या रोगांचे आव्हान आहे. आरोग्य सेवांचा अभाव, कुपोषण आणि दुर्लक्षित उष्णकटीबंधीय रोग यामुळे आपल्यावर अनेक बंधने येतात. आयुष्मान भारत कार्यक्रम आणि इतर आरोग्य अभियानाच्या माध्यमातून आपले सरकार या सर्व परिस्थितीचा सामना करण्यासाठी वचनबद्ध आहे. आपल्या समस्या जटील आहेत आणि आपल्या विशाल सामाजिक-आर्थिक आव्हानांमध्ये गुरफटलेल्या आहेत. मला आनंद होत आहे की तुम्ही आरोग्य क्षेत्रासाठी बहु-शास्त्रीय दृष्टिकोनाचे अनुसरण करत आहात- अगदी प्रतिबंध, कल्याण, उपचार, समुदाय सशक्तीकरणा पासून ते संशोधन आणि नावोन्मेषा पर्यंत. निरोगी जीवनासाठी महात्मा गांधींचा नैसर्गिक उपचारांवर विश्वास होता. आरोग्य आणि समुदायाचे एकत्रीकरण करण्याच्या आपल्या प्रयत्नात, आपण निसर्ग आणि पारंपारिक ज्ञानाने समृद्ध वैकल्पिक उपचारांकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे आणि मुख्य म्हणजे अशा उपचार पद्धतींचा ज्यांना सांस्कृतिक वारसा लाभला आहे अशा ग्रामीण लोकांची तुम्ही सेवा करत आहात.
शैक्षणिक कामांसाठी आणि आरोग्य सेवेसाठी असलेली तुमची वचनबद्धता कौतुकास पात्र आहे. कस्तुरबा रुग्णालय जिथून तुम्हाला याची प्रेरणा मिळाली ते केवळ विदर्भातीलच नाहीतर तेलंगना, आंध्रप्रदेश आणि छत्तीसगड मधील ग्रामीण जनतेला आरोग्य सेवा पुरविते.
तुमच्या परवडणाऱ्या आणि अत्याधुनिक आरोग्यसेवांमुळे तुम्हाला लाखो, खासकरुन गरीब आणि गरजू लोकांच्या शुभेच्छा मिळत आहेत. डॉ. सुशीला नायर रुग्णालयाच्या माध्यमातून आदिवासींमधील आपले कार्य तितकेच कौतुकास्पद आहे.
प्रिय प्राध्यापक आणि विद्यार्थी,
तुमचे संशोधन आणि नाविन्यपूर्ण गष्टींची माहिती वाचून मला आनंद झाला. कर्करोग, क्षयरोग आणि कुष्ठरोगविषयक आपल्या चालू असलेल्या संशोधनाला चांगले यश मिळत आहेत. आपण जागतिक आरोग्य संघटना आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थामधील आपला सहभाग वाढवला पाहिजे जेणेकरून तुमच्यासमोर ज्ञानाचा आणि अनुभवाचा मोठा संचय खुला होईल आणि जगातील सर्वोत्कृष्ट व्यक्तींच्या रांगेत तुम्ही स्वतःला बसवू शकाल. आपला बहु-भागधारक दृष्टीकोन आणि उद्योग जगताशी असलेले संबंध , वैद्यकीय शाळा आणि वैज्ञानिक आस्थापनांशी असलेल्या संबंधामुळे तुम्हाला फायदा होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर स्पेसचे जग आपल्यासाठी अमर्याद संधी उपलब्ध करून देते. मला खात्री आहे की, तुम्ही तुमचे ज्ञान आणि नावीन्यपूर्ण नेटवर्कचा विस्तार कराल.
बापूंच्या सेवाग्राम आश्रमा प्रमाणेच महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था जगप्रसिद्ध आहे. परदेशातून विद्यार्थी इथे शिकायला येतात हे जाणून मला आनंद झाला. जसे की आपण जागतिक समुदायासह ज्ञान सामायिक करण्यास हातभार लावला आहे, त्याचप्रमाणे आम्ही देखील एक देश म्हणून असेच कार्य करत आहोत. आफ्रिकेत, आपल्या ई-आरोग्यभारती कार्यक्रमाद्वारे, डॉक्टर आणि पॅरामेडिक्सला,टेलि-मेडिसिन अभ्यासक्रम शिकवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. भारत आज जगाचा फार्मसी देश म्हणून ओळखला जात आहे. आपली परवडणारी आणि उच्च दर्जाची औषधे अनेकांना आशा आणि आनंद प्रदान करत आहेत. जागतिक बंधुत्वाद्वारे संयुक्त राष्ट्र संघात मान्य केलेल्या शाश्वत विकास ध्येयांची पूर्तता करणाऱ्या देशांमध्ये शाश्वत प्रगती होण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे फलित सामायिक करण्याचे आमचे प्रयत्न आहेत.
बंधू आणि भगिनींनो,
आपला व्यवसाय विज्ञान आणि मानवतेचे एक अद्वितीय मिश्रण आहे. आपल्या लोकांचा तुमच्यावर प्रचंड विश्वास आहे. हा विश्वासाचा बंध आणि हा आदर टिकवून ठेवणे आणि तो अधिक मजबूत करणे ही आपली सामुहिक जबाबदारी आहे. एक नव भारतच्या निर्मितीचे आमचे स्वप्न आहे जिथे प्रत्येकाला गौरवपूर्ण आणि कल्याणकारी आयुष्य जगता येईल, एक असा भारत जिथे “प्रत्येक डोळ्यतील आश्रू पुसण्याचे” बापूंचे स्वप्न पूर्ण होईल. वैद्यकीय व्यवसायिक म्हणून या प्रवासात तुमची भूमिका महत्वपूर्ण आहे. भारतातील लोकं तुमच्या करुणा आणि उपचारांवर अवलंबून आहेत. तुमच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त मी पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन करतो; आणि भविष्यात तुम्हा सर्वांना आणि महात्मा गांधी वैद्यकीय संस्थेला सुयश मिळो ही सदिच्छा व्यक्त करतो.
धन्यवाद.
जय हिंद!
No comments:
Post a Comment