सध्या सिनेरसिंकांना लवकरच गोव्यामध्ये सुरू होणा-या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (इफी)चे वेध लागलेत. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं यंदाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. ह्या सुवर्ण महोत्सवी वर्षात जगभरातल्या निवडक उत्तमोत्तम कलाकृती रसिकांना पाहायला मिळणार आहेत. इफीमधल्या ‘इंडियन पॅनोरमा’ सेक्शनमधल्या ‘नॉन फिचर फिल्म’ विभागात अभिनेत्री स्मिता तांबेच्या ‘गढुळ’ चित्रपटाची निवड झाली आहे.
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाशी स्मिता तांबेचा ऋणानुबंध तसा जुना आहे. स्मिताची ही चौथी कलाकृती आहे, जी इफीमध्ये दाखवली जाणार आहे. ह्याअगोदर धुसर, रूख, पांगिरा ह्या सिनेमांचीही इफीमध्ये वर्णी लागली होती.
इफीविषयी स्मिता तांबे सांगते, “पहिल्यांदा मी इफीमध्ये जेव्हा सहभागी झाले होते. तेव्हा ह्या चित्रपट महोत्सवाच्या भव्यतेविषयी मला कल्पना नव्हती. पण लवकरच मला हा महोत्सव म्हणजे सिनेरसिकांची पंढरी असल्याचे जाणवले. जगभरातल्या फिल्ममेकर्स आणि कलावंताना भेटण्याची संधी ह्या चित्रपट महोत्सवातून मिळते. भारतातल्या नामांकित सिनेमहोत्सवांमध्ये प्रतिष्ठेचे मानले जाणारे इफी असल्याने ह्या चित्रपट महोत्सवात आपल्या सिनेमाचे सिलेक्शन होणे, ही एक कौतुकाची थाप असते. त्यामुळे ‘गढुळ’चे सिलेक्शन होणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
गढुळ सिनेमाविषयी स्मिता सांगते, “जेव्हा नातेसंबंधांमध्ये गोष्टी गढुळ होतात, तेव्हा तुमच्या अचार- विचारातली पारदर्शकता हरवत जाते, ही ह्या कथानकामागची कल्पना मला आवडली. गणेश शेलार ह्या नवोदित दिग्दर्शकामध्ये फिल्ममेकिंगची योग्य जाण असल्याने ह्या फिल्मवर काम करतानाचा अनुभव अविस्मरणीय होता.”
No comments:
Post a Comment