'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेला पाहता पाहता प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. मालिकेचं नाविन्य, त्याची आगळी-वेगळी कथा, मालिकेचं वेगळं टेकिंग, निवेदिता सराफ-गिरीश ओक ही जोडी, इत्यादी. या सगळ्यामुळे मालिकेने अल्पशा कालावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली आहे. या मालिकेमुळे अनेक तरुणींच्या गळ्यातला ताईत बनलेला प्रेक्षकांचा लाडका सोहम म्हणजेच अभिनेता आशुतोष पत्की याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्याच्यासोबत या मालिकेबद्दल साधलेला हा खास संवाद
१. सोहम या व्यक्तिरेखेसोबत तू किती रिलेट करतोस?
- काही काही सोहममधील गुण माझ्यामध्ये आहेत जस कि सोहमचा आळशीपणा काही प्रमाणात माझ्यामध्ये आहे. तसेच सोहमची आई जशी त्याची काळजी घेण्यासाठी तत्पर असते तसंच काहीसं चित्र माझ्या घरी देखील आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आई मला काय हवं नको त्याची काळजी घेते. माझ्या डाएट आणि जिममुळे दर ३ तासांनी मला हेल्दी मिल्स खायचे असतात त्यासाठी रोज सकाळी मला आई डबा देते. त्यामुळे जेव्हा या मालिकेचा पहिला एपिसोड पाहिला तेव्हा 'हे तर काहीसं आपल्याच घरचं चित्र आहे' अशी माझ्या आईची प्रतिक्रिया होती. पण सोहम थोडा उद्धट आहे. आपली आई आपल्यासाठी जे काही करते त्याची त्याला कदर नाहीये. याबाबतीत मी सोहमच्या विरुद्ध आहे.
२. या व्यक्तिरेखेसाठी तुझी निवड कशी झाली?
- या व्यक्तिरेखेसाठी मी ऑडिशन दिली. आमच्या मालिकेचे प्रोड्युसर सुनील सर यांनी माझं नाव या व्यक्तिरेखेसाठी सुचवलं होतं. त्यांनी मला ऑडिशनसाठी बोलावलं. मी ऑडिशन दिली. माझी लुक टेस्ट झाली आणि त्यानंतर मला कॉल आला कि माझी निवड झाली आहे.
३. तू या व्यक्तिरेखेसाठी काय तयारी केली?
- माझी या व्यक्तिरेखेसाठी जेव्हा निवड झाली तेव्हा मला सुनील सरांनी सांगितलेला कि सोहम थोडा उद्धट आहे. त्याला आईने इतकं लाडात वाढवलं आहे कि तो फक्त स्वतःचा विचार करतो. दुसऱ्यांसाठी विचार करणं त्याला जमत नाही. त्यामुळे आपल्या आजूबाजूला देखील अशी काही माणसं असतात त्यांचं मी खूप निरीक्षण केलं. त्यांच्या फटकळ बोलण्याची शैली पाहिली आणि याच निरीक्षणातून सोहमच्या व्यक्तिरेखेसाठी मी तयारी केली.
४. चाहत्यांकडून तुला काय प्रतिक्रिया मिळत आहेत?
- लोकांना सोहम खूप आवडतोय. प्रेक्षकांकडून मला खूप चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. मी कुठे हि गेलो कि लोक आपुलकीने बोलायला येतात, त्यांना आवडलेल्या प्रसंगाबद्दल गप्पा मारतात. त्यामुळे मला खूप छान वाटतं. तसंच सोहमचा स्वभाव काही प्रेक्षकांना खटकतो त्यामुळे काही प्रेक्षक माझ्याकडे रागाने बघतात. जे लोक मला ओळखतात पण मी त्यांना नेहमी भेटत नाही आणि मालिकेत रोज मला पाहून काहींना असं वाटतं कि माझा खऱ्या आयुष्यात देखील स्वभाव असाच आहे, त्यामुळे त्यांची माझ्याशी बोलायची पद्धत बदलली आहे. हि माझ्या कामाची पावती आहे. त्यामुळे मी या प्रतिक्रिया पॉझिटिव्हली घेतो. कॉलेजमध्ये जाणारा तरुणवर्ग देखील हि मालिका पाहतो आणि सोहमला पाहून त्यांना कळतं कि आम्ही सुद्धा नकळतपणे आईला दुखावतो त्यामुळे हे वागणं चुकीचं आहे आणि सोहम व त्याच्या आईचे प्रसंग पाहताना त्यांना ते प्रकर्षाने जाणवतं. मला असे बरेच मेसेजेस येतात ज्यात मुलं मला सांगतात कि तुझ्यामुळे आम्हाला कळतं कि आमचं वागणं चुकीचं आहे. यासगळ्यामुळे मला खूप बरं वाटतं कि सोहमला बघून तरुणवर्ग चांगला अर्थ घेत आहे आणि त्याच्या वागणं सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.
५. दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याचा तुझा अनुभव कसा आहे?
- मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो कि मला या मालिकेत इतक्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. निवेदिता ताई आणि माझं बॉण्डिंग खूप छान आहे. त्या मला अगदी त्यांच्या मुलासारखंच वागवतात. त्यामुळे माझे सेटवर खूप लाड होतात. त्याचबरोबर त्या मला अभिनय अधिकाधिक कसा चांगला करायचा याचे देखील धडे देतात. चित्रीकरणात देखील मला खूप मदत करतात. तिच्याकडून मी खूप शिकतोय. गिरीश सरांच्या परफॉर्मन्समध्ये खूप ईझ असतो. तेजश्री एक उत्तम अभिनेत्री आहे आणि माणूस म्हणून देखील तितकीच चांगली आहे. या सगळ्यांकडून मला खूप काही शिकायला मिळतं.
No comments:
Post a Comment