Tuesday, 19 November 2019

शुक्रवारी भेटा जगावेगळी फिलॉसॉफी असणा-या ‘देशपांडे’ला उर्फ निखिल रत्नपारखीला


‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ या सिनेमाच्या शीर्षकावरुन सिनेमाची गोष्ट दोन आडनावांच्या व्यक्तींवर आधारित आहे हे सर्वात पहिले लक्षात येते. या सिनेमात सई ताम्हणकर, निखिल रत्नपारखी, राजेश श्रृंगारपुरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रेक्षकांना सिनेमाचे नाव समजल्यावर सिनेमाची कथा आणि त्यांचे पात्रं जाणून घेण्याची उत्सुकता असते. या सिनेमाच्या बाबतीतही अगदी तसेच असले तरी जरा वेगळे आहे आणि याचे कारण म्हणजे सिनेमाचे शीर्षक. म्हणजेच नेमका कोणता कलाकार कोणते पात्रं साकारणार याकडे अनेकांचे लक्ष आहे. या सिनेमात सई ताम्हणकरने ‘जया’ नावाचं पात्रं साकारलं आहे तर राजेश श्रृंगारपुरे ‘कुलकर्णी’ आणि निखिल रत्नपारखी ‘देशपांडे’च्या भूमिकेत दिसणार आहेत.
मिस्टर देशपांडेच्या भूमिकेसाठी निखिल रत्नपारखी यांची झालेली निवड ही अचूक आहे. निखिल यांनी आतापर्यंत अनेक भूमिका साकारल्या आहेत आणि त्यांच्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन केले आहे. या सिनेमात त्यांनी साकारलेल्या भूमिकेला विनोदी छटा आहे आणि दिग्दर्शक गजेंद्र अहिरेंच्या मते, “निखिल रत्नपारखी हा भारी माणूस आहे, अवलिया आहे आणि त्याला विनोदाची उत्तम समज आहे. त्याला वाचनाची प्रचंड आवड आहे. त्याला जी भूमिका देईल त्यात तो जाण आणतो. माणूस म्हणून फार उमदा आहे. सिनेमाच्या प्रोसेसमध्ये निखिलला सिनेमाची गोष्ट आणि त्याची भूमिका ऐकवली आणि त्यासाठी त्याने स्वत:चे इनपूट्स दिले त्यामुळे त्याची भूमिका अजून मनोरंजक बनली.”
निखिल रत्नपारखीने साकारलेलं ‘देशपांडे’ हे पात्रं एक अत्यंत बुध्दिवान आहे पण तो बावळट दिसतो. देशपांडे हा सरळमार्गी चालणारा माणूस आहे ज्याची आयुष्याची वेगळीच फिलॉसॉफी आहे जी आज लोकांना विनोदी वाटू शकते. कारण बदललेल्या जगामध्ये तो बदललेला नाही. तो त्याच्या-त्याच्या फिलॉसॉफीने पुढे चालला आहे.  म्हणजे त्याचं म्हणणं आहे की, "सकाळी लवकर उठून कशाला धावायचं... त्यापेक्षा मी १० वर्ष लवकर मरेन पण जे आयुष्य आहे ते आनंदाने आणि आरामात जगेन".  तसेच "डिग्री भिंतीवर लावण्यासाठी आणि पुस्तकं कपाटात ठेवण्यासाठी असतात ते सारखं वाचून जीवाला त्रास नाही करुन घ्यायचा". अशी त्याची सरळ-साधी फिलॉसॉफी आहे.  पण तो बुध्दिवान आहे. त्याच्याकडे सगळंच आहे. अन्न, वस्त्र, निवारा. पैसे, आनंद, ऐश्वर्य, सुख, समृध्दी आणि सर्व काही असल्यामुळे "मी आता कशाला कष्ट करु" असं त्याचं म्हणणं आहे
असं एक आगळं-वेगळं पात्रं या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीस येतंय. स्मिता फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत या सिनेमाची निर्मिती स्मिता गानू यांनी केली आहे तर सहनिर्मिती अजित माधवराव पोतदार आणि सीमा निरंजन अल्पे यांनी केली आहे. प्रशांत गोखले हे सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत. २२ नोव्हेंबरला भेटा ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात.

No comments:

Post a Comment