एक स्त्रीच दुस-या स्त्रीचं दु:ख समजू शकते. मग ती स्त्री आई असू शकते बहिण असू शकते किंवा मैत्रिण देखील असू शकते...पण स्त्री म्हणून आपल्या मनात चालणारे असंख्य विचार आपण फक्त स्त्रीकडेच व्यक्त करु शकतो. दोन स्त्रियांमध्ये विचार करण्याची पध्दत वेगळी असू शकते यात शंका नाही पण दोघीही एकमेंकांच्या विचारांचा आदर करुन मनात चालणा-या विचारांची वाट मोकळी करु शकतात. अशाच दोन स्त्रियांची बाजू आई आणि मुलीच्या नात्यांतून ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ या सिनेमातून दाखवण्यात आली आहे.
या सिनेमात अभिनेत्री सई ताम्हणकर आणि नीना कुळकर्णी यांची मायलेकीची भूमिका साकारली आहे. चाकोरीबध्द विचार न करता चाकोरीत अडकलेल्या स्त्रीने बाहेर पडून ‘हे माझं आयुष्य आहे आणि मी ते माझ्याच पध्दतीने जगणार’ असा जगण्याचा दृष्टिकोन ठेवला आहे आणि त्या स्त्रीची भूमिका सईने अतिशय सुंदर पध्दतीने साकारली आहे. सईसमोर नीना कुळकर्णीसारखी कसलेली अभिनेत्री आहे. जिची स्वत:ची एक बाजू आहे, तिचा स्वत:चा स्वतंत्र आणि पारंपारिक असा विचार आहे. पण ती स्वत:चा विचार मुलीवर लादत नाही, तिला तिच्या गोष्टी करण्यापासून अडवत नाही. ती फक्त तिचा मुद्दा मांडून जाते. असं आईचं पात्रं नीना यांनी साकारलं आहे. या सिनेमाच्या निमित्ताने सई आणि नीना यांची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या जोडीला प्रेमाचं, आपुलकीचं स्वरुप लाभले आहे, गंभीर तसेच विनोदी किस्से देखील या जोडीभोवती घडतात जे प्रेक्षकांना २२ नोव्हेंबरला सिनेमागृहात पाहायला मिळणार आहेत.
गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ सिनेमात राजेश श्रृंगारपुरे आणि निखिल रत्नपारखी यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत. स्मिता फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत या सिनेमाची निर्मिती स्मिता गानू यांनी केली आहे तर सहनिर्मिती अजित माधवराव पोतदार आणि सीमा निरंजन अल्पे यांनी केली आहे. प्रशांत गोखले हे सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत.
No comments:
Post a Comment