झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका सध्या एका अतिशय रंगतदार वळणावर आली आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसंच या २ भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेचं चित्रीकरण कोकणात सुरू आहे आणि ज्या घरामध्ये हे चित्रीकरण सुरू आहे म्हणजे मालिकेतील नाईकांच्या वाड्यात कलाकारांना पाहण्यासाठी सतत लोकांची गर्दी होत असते.कोकणात फिरायला येणारी कुटुंबं आवर्जून नाईकांच्या वाड्याला भेट देतात. हा वाडा म्हणजे जणू एक पर्यटनस्थळच झालेलं आहे. कोकणच्या आंब्याप्रमाणेच नाईकांचा वाडा हा आता अख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. आता या वाड्याला भेट देण्यासाठी थुकरट वाडीतील विनोदवीर जाणार आहेत.
येत्या आठवड्यात चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाची कोकणवारी प्रेक्षक सोमवार ते गुरुवार रात्री ९.३० वाजता पाहू शकतील. थुकरट वाडीतील विनोदवीर कोकणात कुडाळ-आकेरी गावातील नाईकांच्या वाड्याला भेट देणार आहेत. तसंच तिकडे रात्रीस खेळ चाले या मालिकेतील कलाकारांसोबत चित्रीकरण देखील करणार आहेत. त्यामुळे येत्या आठवड्यात नाईकांच्या वाड्यावर हास्यस्फोट होणार आहे असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही. आता या वाड्यातील भुतांना बघून विनोदवीरांचा थरकाप उडतो कि त्यांच्या विनोदाने वाड्यात हास्यकल्लोळ होतो हे प्रेक्षकांना येत्या आठवड्यात पाहायला मिळेल. तेव्हा ही चला हवा येऊ द्याच्या कलाकारांची कोकणातील धमाल मस्ती आगामी भागात पाहायला विसरू नका.
No comments:
Post a Comment