नवोदित स्पर्धकांनी गायलेली सदाबहार गाणी ऐकण्याची प्रेक्षकांना संधी!
येत्या १४ डिसेंबर रोजी रविंद्र नाट्य मंदिर येथे सकाळी ९.३० ते दुपारी १.३० च्या दरम्यान 'सुर-ताल कराओके क्लब' प्रस्तुत कराओके ट्रॅक गायन स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार आहे. एकापेक्षा एक सरस अशा १२ हौशी गायक गायिकांच्या आवाजातील लोकप्रिय गाणी ट्रॅकवर ऐकण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांसाठी चालून आली आहे. ज्येष्ठ संगीतकार पं. अशोक पत्की यांच्या प्रमुख उपस्थितीत ही अंतिम फेरी पार पडणार आहे. प्रत्येकी सहा महिला आणि पुरुष स्पर्धक या वेळी सहभागी होणार आहेत. त्यांचा हा लाइव्ह परफॉर्मन्स प्रेक्षकांना प्रत्यक्ष पहाण्याची विनामूल्य संधी संस्थेने उपलब्ध केली असून पुढील काही रांगा राखीव असणार आहेत.
विलेपार्ले येथील 'सुर-ताल कराओके क्लब' ने आयोजित केलेल्या पहिल्याच कराओके ट्रॅक गायन स्पर्धेला स्पर्धकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. पहिल्या फेरीत एकूण १४१ स्पर्धकांनी हिन्दी चित्रपटांतील सदाबहार लोकप्रिय गीते ट्रॅकवर सादर केली. त्यांच्या गायन कौशल्यामुळे स्पर्धा अटीतटीची झाली आणि परीक्षकांचे काम अतिशय अवघड झाले. लोकप्रिय गीतांबरोबर काही दुर्मिळ गाण्यांचेही यावेळी स्पर्धकांनी सादरीकरण करून परीक्षांची वाहवा मिळविली. दिनांक ३० नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या पूर्व फेरीतून दुसऱ्या फेरीसाठी ५१ गायक गायिकांची निवड करण्यात आली. जेष्ठ रंगकर्मी जयंत ओक, गायक यशवंत कुलकर्णी, किरण शानबाग आणि रसिकांचे प्रतिनिधी म्हणून आनंद देवधर हे परीक्षक होते.
दिनांक ७ डिसेंबर रोजी पार पाडलेल्या द्वितीय फेरीमधील ५१ स्पर्धकांतून अंतिम फेरीसाठी ६ महिला व ६ पुरुष असे एकूण १२ गायकांची निवड करण्यात आली. परीक्षक म्हणून गायक यशवंत कुलकर्णी, किरण शानबाग, धनंजय शानबाग आणि आनंद देवधर यांनी काम पाहिले.
अंतिम स्पर्धेत प्रत्येकी एक महिला आणि एक पुरुष विजेते व उपविजेते म्हणून निवडण्यात येतील.विजेत्यांना प्रत्येकी रु.५०००/- रोख व सन्मानचिन्ह तर उपविजेत्यांना प्रत्येकी रु. २५००/- रोख व सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. यावेळी या स्पर्धकांना संगीतकार पं. अशोक पत्की त्यांचे बहुमूल्य मार्गदर्शनही लाभणार असल्याने ही स्पर्धा खऱ्या अर्थाने विशेष ठरणार आहे.
No comments:
Post a Comment