अफगाणिस्तानची ब्रेश्ना खान 'झी युवा' वाहिनीवर दाखवणार आपल्या नृत्याची झलक!!!!
'झी युवा' ही प्रेक्षकांची लाडकी वाहिनी प्रेक्षकांसाठी विशेष असं काहीतरी नेहमीच घेऊन येते. 'युवा डान्सिंग क्वीन' या नव्याकोऱ्या कार्यक्रमात अफगाणिस्तानची ब्रेश्ना खान आपल्याला स्पर्धक म्हणून पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने विशेष गप्पा मारण्यात आल्या.
१. पहिल्या परफॉर्मन्ससाठी तू कुठला नृत्यप्रकार आणि गाणं निवडणार आहेस?
पद्मावत सिनेमातील 'नैनो वाले नें' या गाण्यावर मी या स्पर्धेतील माझं पहिलं नृत्य करणार आहे. सेमी क्लासिकल कथ्थक या प्रकारातील हे नृत्य प्रेक्षकांना नक्की आवडेल याची मला खात्री आहे.
२. किती कालावधीनंतर तू पुन्हा एकदा नृत्य सादरीकरण करणार आहेस? पुन्हा नृत्याच्या मंचावर येण्याची आतुरता किंवा काही विशिष्ट भावना मनात आहे का?
नृत्य ही केवळ माझी आवड आहे. कुठल्याही प्रकारे व्यावसायिक किंवा स्पर्धात्मक पातळीवर मी सादरीकरण करत नाही. गेली सहा वर्षे मी कथ्थक शिकते आहे. साधारण चार वर्षांपूर्वी मी, माझ्यासोबतच्या इतर शिष्यांसह मी मंचावर सादरीकरण केले होते. त्याआधी शाळेत असताना डान्स परफॉर्मन्समध्ये भाग घेतलेला होता.
३. सोनाली आणि मयूर या दोघांपैकी, तुझा अधिक लाडका परीक्षक नक्की कोण आहे?
दोघांपैकी कुणी एक लाडकं आहे असं मी म्हणणार नाही. 'अप्सरा आली' ह्या गाण्यावर सोनालीजींनी केलेले नृत्य पाहिल्यापासूनच त्या माझ्या आवडत्या नर्तिका आहेत. मी कथ्थकची शिष्य आहे, त्यामुळे कथ्थकमधील विशारद असलेल्या मयूर वैद्य सरांबद्दल मला नितांत आदर आहे.
४. तुझा सर्वांत आवडता डान्सर कोण आहे?
धर्मेश येलांडे हा माझा सगळ्यात आवडता डान्सर आहे, यात काही शंकाच नाही.
५. एवढ्या मोठ्या मंचावर तुला परफॉर्मन्स द्यायचा आहे. याची तुझ्या मनात काही धाकधूक आहे का?
अभिनय असो किंवा नृत्य या कुठल्याही प्रकारची कला मंचावर सादर करायची असेल, तरी मनात धाकधूक ही असतेच. त्यामुळे 'झी युवा' वाहिनीवरील 'युवा डान्सिंग क्वीन'सारख्या मोठ्या मंचावर नृत्य सादर करण्याची थोडीफार भीती मनात आहे.
६. तुझ्या डान्स रिहर्सल दरम्यान होणाऱ्या गमतीजमती आणि तुझ्या कोरिओग्राफरबद्दल आम्हाला थोडंसं सांग.
डान्सिंग ही माझी आवड आहे, हे मी आधीच सांगितलं आहे. अनेक अप्रतिम गाण्यांवर खास शैलीत नृत्य शिकायला मिळत असल्याने मला खूप मजा येते आहे. ओंकार माझा खूप जुना मित्र आहे. मागच्या काही वर्षात कामाचा व्याप वाढल्याने भेटीगाठी कमी झाल्या होत्या. अनेक दिवसांनी आम्ही भेटलो तरीही आमची मैत्री तशीच असते. म्हणूनच, या स्पर्धेच्या निमित्ताने एकत्र काम करत असल्याने मी आनंदी आहे.
कोमलसोबत काम करायला सुद्धा मजा येते आहे. ओंकार आणि कोमल माझ्यासाठी खूप मेहनत घेत आहेत. माझ्या सादरीकरणातील ज्या काही गोष्टी प्रेक्षकांना आवडतील, त्याचं सर्व श्रेय माझ्या या कोरिओग्राफरना असेल.
७. अफगाणी असूनही तू इतकं उत्तम हिंदी कसं बोलतेस?
मी लहानपणापासूनच बॉलीवूडचे चित्रपट पाहते. अफगाणिस्तानात या चित्रपटांची आवड अनेकांना आहे. हे हिंदी चित्रपट पाहून पाहूनच मी हिंदी शिकले आहे.
No comments:
Post a Comment