मला दहा ते बारा वर्षांनी ब्रेक मिळाला - राहुल मगदूम
'लागीरं झालं जी' मालिकेतील राहुल्या या व्यक्तिरेखेने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला राहुल मगदूम आता 'चला हवा येऊ द्या शेलिब्रिटी पॅर्टन'मध्ये कॉमेडी करून प्रेक्षकांना खळखळून हसवतो आहे. राहुलनं वेळोवेळी त्याचं अभिनय कौशल्य प्रेक्षकांना दाखवून त्यांची मनं जिंकली आहेत.
त्याच्या अभिनयप्रवासाबद्दल राहुल म्हणतो, ‘मी कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजच्या विद्यार्थी. तिथून युथ फेस्टिव्हल, लघुनाटिका, एकपात्री याची सुरुवात झाली. बाबा लष्करात त्यामुळं तिथं जायची इच्छा होती. काही कारणांनी ती संधी हुकली. अभिनयक्षेत्रात काम करत असल्याचं पालकांना आवडत होतं. पुरुषोत्तम करंडकमध्ये आम्ही सादर केलेल्या सायलेंट स्क्रीन या एकांकिकेनं करंडक, दिग्दर्शन आणि स्त्री अभिनयासाठी पारितोषिक पटकावलं. करंडकाच्या इतिहासात ५० वर्षांनी पुण्याबाहरेच्या संघानं विजेतेपद पटकावलं. पुढे सवाई, राज्यनाट्य स्पर्धांमध्ये काम करत गेलो. मी शाळेत मराठी भाषा आणि नाटक हे विषय शिकवतो.’
राहुलचा जन्म इस्लामपूरात झाला. त्यामुळं ग्रामीण भागातील कलाकारांविषयी तो भरभरून बोलतो. ‘ग्रामीण कलाकारांना आता भरपूर व्यासपीठं निर्माण झाली आहेत. गुणवत्ता आणि दर्जा असेल, तर तुम्हाला काम मिळते, हे मी स्वानुभवातून सांगू शकतो. मात्र, त्यासाठी मेहनत करायची तयारी हवी. मला दहा ते बारा वर्षांनी ब्रेक मिळाला. नाटक, एकपात्री, प्रायोगिक सतत करत राहणं गरजेचं आहे.’
No comments:
Post a Comment