'फ्रेशर्स', 'बनमस्का', 'लव लग्न लोच'सारख्या युथफुल मालिकांनी 'झी युवा' वाहिनीने प्रेक्षकांच्या मनामनात घर केलं. 'एक घर मंतरलेलं' आणि 'गर्ल्स हॉस्टेल'सारख्या हॉरर मालिका सुद्धा प्रेक्षकांना या वाहिनीवर पाहायला मिळाल्या. एवढंच नाही, तर 'युवा सिंगर एक नंबर', 'संगीत सम्राट', 'युवा डान्सिंग क्वीन'सारखे कथाबाह्य कार्यक्रम सुद्धा 'झी युवा'वर पाहायला मिळतात. अशा दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी असणारी ही वाहिनी अत्यंत लोकप्रिय झालेली आहे. या सर्वांच्या लाडक्या वाहिनीवर आता एक डॉन अवतरणार आहे. 'डॉक्टर डॉन' ही नवी मालिका लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे.
मालिकेचं नाव 'डॉक्टर डॉन' असलं, तरी या मालिकेचं स्वरूप मात्र विनोदी असणार आहे. पौराणिक मालिकेत खंडेरायाच्या भूमिकेत दिसलेले देवदत्त नागे हे या मालिकेत थेट डॉनच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. एका डॉनचं आयुष्य, त्याच्या भोवतालची परिस्थिती, जवळच्या माणसांशी त्याचे असलेले संबंध, त्यांच्यासोबत राहण्यासाठी त्याला करावी लागणारी धडपड यावर ही मालिका आधारित असणार आहे. अभिनेता देवदत्त नागे या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. २ वर्षानंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर अवतरत असलेल्या देवदत्तला, मालिकेतील त्याच्या लुकसाठी खूप मेहनत घ्यावी लागली आहे. २०२०च्या जानेवारी महिन्यापासून या मालिकेचे शूटिंग सुरू होणार आहे.
खंडेरायाच्या भूमिकेत दिसलेल्या देवदत्तसाठी, विनोदी मालिकेतील डॉनचे पात्र साकारणे नक्कीच आव्हानात्मक असेल. अर्थात, देवदत्तसारखा दमदार कलाकार हे आव्हान नक्कीच पेलू शकतो. याविषयी बोलताना तो म्हणतो;
"विनोदी प्रकारात मी कधीच काम केलेलं नाही. त्यामुळे या रोलसाठी मला विचारलं याचा आनंद झाला होता. या मालिकेत मला डॉनचं काम करावं लागणार आहे. त्यातच एक विनोदी छटा सुद्धा जपावी लागणार आहे. त्यामुळेच माझ्यासाठी ही भूमिका खूपच आव्हानात्मक असणार आहे. मला नवनवीन प्रकारच्या भूमिकांचं आव्हान पेलायला खूप आवडतं. विनोदी मालिका, हे आव्हान माझ्यासाठी खूपच छान असेल. मला डॉनच्या भूमिकेत पाहायला माझ्या चाहत्यांना सुद्धा खूपच आवडेल यात काहीच शंका नाही. ही नवी मालिका प्रेक्षकांच्या आवडीची ठरेल याची खात्री वाटते. माझ्या इतर भूमिकांवर चाहत्यांनी जसं भरभरून प्रेम केलं तसंच याही भूमिकेला प्रेम मिळेल अशी माझी इच्छा आहे."
No comments:
Post a Comment