लॉकडाऊन शिथील झाल्यावर आणि सरकारकडून चित्रीकरणासाठी परवानगी मिळाल्यानंतर अनेक सिनेमांच्या, मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. मराठी सिनेमांनी देखील अनेक ठिकाणी जाऊन योग्य ती काळजी घेऊन चित्रिकरण सुरु केले आणि विशेष करुन ‘छूमंतर’ या मराठी सिनेमाची चर्चा सर्वत्र जोरदार झाली. कारणही तसं विशेषच आहे. नितीन प्रकाश वैद्य निर्मित, समीर जोशी दिग्दर्शित ‘छूमंतर’ चे चित्रिकरण लंडनमध्ये करण्यात आले होते. सध्याच्या काळात परदेशात जाऊन शूटिंग करणे हे तसं चॅलेंजिंगच आहे, पण टीम वर्कमुळे शूटिंग यशस्वीरित्या पार पडले.
‘छूमंतर’ मध्ये प्रार्थना बेहरे, रिंकू राजगुरु, सुव्रत जोशी आणि रिशी सक्सेना हे कलाकार दिसणार आहेत. या सिनेमाचे सरप्राईज काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर उलगडले आहे. ते सरप्राईज म्हणजे महाराष्ट्राचा लाडका ‘चैत्या’ उर्फ ‘नाळ’ फेम बालकलाकार श्रीनिवास पोकळे देखील या सिनेमाचा एक भाग आहे. सहज-सुंदर अभिनय, चेह-यावरचा भोळेपणा, बोलण्यातली गोड शैली, त्याच्यातला निरागसपणा, एकंदरीत या त्याच्यातील गुणांमुळे श्रीनिवासने प्रेक्षकांच्या मनात एक हक्काची जागा तयार केली आहे. आता त्याच्या या आगामी सिनेमासाठी देखील प्रत्येकजण आतुर असणार यात शंकाच नाही.
निर्माते नितीन प्रकाश वैद्य यांनी यापूर्वी ‘गच्ची’, ‘नाळ’, ‘मन फकीरा’ यांसारखे अनेक सिनेमांची निर्मिती केली आहे आणि आता ते द्विभाषिक मध्ये बनणारा ‘छूमंतर’ हा सिनेमा लवकरच घेऊन येणार आहेत.
No comments:
Post a Comment