संगीत क्षेत्रात कायम नाविन्यपूर्ण प्रयोग करणारी, सुमधूर गळ्याची गायिका 'सावनी रविंद्र'ने जागतिक संगीत दिनाचं औचित्य साधत 'वन्निदुमो अझगे' हे मल्याळम रोमॅंटिक गाणं रिलीज केलं आहे. राष्ट्रीय पुरस्कारानंतर ‘सावनी ओरीजनल’ या सिरीजमधील हे तिचं पहिलंच गाणं आहे. या गाण्यात गायिका सावनी सोबत गायक अभय जोधपुरकर आहे. हे गीत लक्ष्मी हीने लिहीलं आहे. तर शुभंकर शेंबेकरने गाण्याला संगीत दिलंय. प्रेमाची नवी परिभाषा सांगणा-या या गाण्याचं चित्रीकरण चेन्नईत झालं आहे
आजवर सावनीने मराठीसह, हिंदी, तमिळ, गुजराती, बंगाली, कोंकणी अश्या विविध भाषेत अनेक गाणी गायली आहेत. त्यामुळे तिचे भारतातचं नव्हे तर जगभर चाहते आहेत. त्यामुळे सोशल मिडीयावर तिच्या चाहत्यांनी तिच्या या रोमॅंटिक मल्याळम गाण्याचं भरभरून कौतुक केलं आहे.
गायिका सावनी रविंद्र मल्याळम गाण्याविषयी सांगते, “संगीताला भाषेचं बंधन नसतं. संगीत हीच एक भाषा आहे असं मी मानते. आणि मी आजवर बहुभाषिक गाणी गायली. दाक्षिणात्य भाषेतील तमिळ, तेलुगू गाणी मी याआधी गायली. तर यापूर्वी मी मल्याळम भाषेत जिंगल्स गायल्या होत्या. मल्याळम भाषा तशी कठीण आहे. त्यामुळे मी सतत मल्याळम गाणी ऐकायचे. माझा गायक मित्र अभय जोधपुरकर आणि शुभंकर आम्ही तिघांनी हे गाणं करायचं ठरवलं. आम्ही तिघंही महाराष्ट्रातले आहोत. अभयने याआधी मल्याळममध्ये बरचं काम केलं आहे. त्यामुळे त्याचा अनुभव आमच्या गाठीशी होता.’
पुढे ती म्हणते, “गाण्याचे चित्रीकरण चेन्नईत करण्यात आले. त्यावेळेस मी चार महिन्याची प्रेग्नेंट होते. त्यामुळे त्या परिस्थितीत मी मुंबईहून चेन्नईला गेले. आणि ते गाणं चित्रीत केलं. हे सर्व माझ्यासाठी खूप चॅलेंजींग होतं. आणि अर्थातच खूप आनंदाने मी हे चॅलेंज स्वीकारलं. तसेच माझे पती या गाण्याचे निर्माते डॉ. आशिष धांडे या संपूर्ण प्रवासात माझ्यासोबत होते. सध्या आम्ही आयुष्यातील एका सुंदर टप्प्यावर आहोत. त्यामुळे हे गाणं आम्हा दोघांसाठी खूप स्पेशल आहे."
No comments:
Post a Comment