अभिनेता आदिनाथ कोठारेने आपल्या कारकिर्दीत यशाची अनेक शिखर पादाक्रांत केली आहेत. 2021 हे वर्ष आदिनाथ कोठारेसाठी करीयरच्या दृष्टीने तर अविस्मरणीयच वर्ष ठरलं असं म्हणावं लागेल. यंदा आदिनाथला पाणी चित्रपटासाठी सर्वोच्च मानला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. यावर्षी आदिनाथने डिजीटल विश्वात सिटी ऑफ ड्रिम्स वेबसीरिजव्दारे पदार्पण करत आपला वेगळा ठसा उमटवला.
मराठी सिनेसृष्टीत गेली काही वर्ष यशस्वी करीयर करत असलेल्या आदिनाथ कोठरेचा 24 डिसेंबरला बॉलीवूड विश्वात डेब्यू होत आहे. कबीर खान दिग्दर्शित 83 चित्रपटामधून क्रिकेटर दिलीप वेंगसरकर ह्यांच्या भूमिकेत आदिनाथ आपला अभिनयाचा ठसा उमटवताना दिसेल.
ह्या सिनेमाचा ट्रेलर नुकताच दुबईच्या बुर्ज खलिफावर दाखवण्यात आला. आदिनाथ कोठारे पहिला मराठी अभिनेता-दिग्दर्शक आहे, ज्याचा ट्रेलर बुर्ज खलिफावर दाखवण्यात आला आहे. ही गोष्ट नक्कीच त्याच्या चाहत्यांसाठी अभिमानाची बाब आहे.
ह्याविषयी आपल्या भावना व्यक्त करताना आदिनाथ म्हणतो, “मी आत्ता खूप भावूक झालो आहे. जगातल्या सर्वात उंच इमारतीवर आपला चेहरा जगाला दिसणं हे कोणत्याही अभिनेत्यासाठी निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. 83 चित्रपटाचा ट्रेलर बुर्ज खलिफावर दाखवल्यापासून मला माझ्या कुटूंबाचे, मित्र परिवारांचे, चाहत्यांचे अभिनंदन करणारे भरपूर मेसेज येत आहेत. जगभरातून सध्या माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आपल्या कुटूंबाला–चाहत्यांना आपला गर्व वाटावा, असं काही करायला मिळणं प्रत्येक अभिनेता-दिग्दर्शकासाठी गौरवाची गोष्ट आहे.”
No comments:
Post a Comment