Tuesday, 1 November 2022

आनंदाला लागलाय मोबाईलचा नाद!

लग्न हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील जिव्हाळ्याचा विषय... देवा-ब्राह्मणांच्या साक्षीनं दोनाचे चार हात होताना झालेल्या गंमतीजंमती आणि 'वऱ्हाडी वाजंत्री'ची धम्माल-मस्ती अखेरपर्यंत प्रत्येकाच्या मनाच्या कोनाड्यात रुंजी घालत असतात. हिच धमाल-मस्ती आता प्रेक्षकांना 'वऱ्हाडी वाजंत्री' या चित्रपटात अनुभवायला मिळणार आहे. अभिनेते-दिग्दर्शक विजय पाटकर यांनी दिग्दर्शित केलेला 'वऱ्हाडी वाजंत्री' हा चित्रपट ११ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. 'स्वराज फिल्म प्रॉडक्शन' या बॅनरखाली निर्माते कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांच्यासह अतुल राजारामशेठ ओहळ यांनी तयार केलेल्या 'वऱ्हाडी वाजंत्री'मध्ये विनोदवीर आनंदा कारेकर एका वेगळ्याच रंगात रंगलेला दिसणार आहे. या बदललेल्या रंग आणि ढंगाबाबत आनंदानं आपल्या अनोख्या शैलीत सांगितल्यावर 'वऱ्हाडी वाजंत्री'बाबतची उत्सुकता आणखी वाढली.

चित्रपटांपासून नाटक आणि मालिकांपर्यंत सर्वच ठिकाणी आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या आनंदानं मल्टीस्टारर 'वऱ्हाडी वाजंत्री'मध्येही आपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे. याबाबत आनंदा म्हणाला की, 'वऱ्हाडी वाजंत्री' या चित्रपटात मी एक कलंदर व्यक्तिरेखा साकारली आहे. यातील सर्वच कॅरेक्टर्स एका पेक्षा एक अतरंगी आहेत, पण मी साकारलेलं 'चमन' हे कॅरेक्टर या सर्वांपेक्षा वेगळं आहे. कारण याला मोबाईलचा भारी नाद आहे. आज प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहे, पण काहीजण त्याचा अतिवापर करतात किंवा त्याचं प्रदर्शन मांडतात. अशांपैकीच हा आहे. कपडे रंगीबेरंगी असल्यानं मी सर्वांमध्ये अधिक उठून दिसतो. दैनंदिन जीवनात वावरताना लग्नात नेहमीच असं एखादं कॅरेक्टर दिसतं, ज्याच्या कानाला कायम मोबाईल चिकटकलेला असतो. हे लोक नेमकं काय करतात हे आजूबाजूच्या कोणालाच माहित नसतं. तसंच काहीसं याच्या बाबतीतही आहे. याचा फोन आलाय की यानं कोणाला फोन केलाय हे समोरच्याला काही कळत नाही, पण हा सतत बोलत असतो. नेमकं काय गौडबंगाल आहे ते सिनेमात समजेल. 'वऱ्हाडी वाजंत्री' मध्ये दिग्दर्शक विजय पाटकर सरांनी माझ्यासह २१ हून अधिक हरहुन्नरी विनोदवीरांची फौज घेवून येत असल्याने खुमासदार रंगत येणारचं.”

'वऱ्हाडी वाजंत्री' या चित्रपटात विनोदाचा बादशा मकरंद अनासपुरेसोबत पंढरीनाथ कांबळे, हेमांगी कवी, मोहन जोशी, रिमा लागू, विजय कदम, प्रिया बेर्डे, जयवंत वाडकर, आनंदा कारेकर, प्रभाकर मोरे, पूर्णिमा अहिरे, सुनील गोडबोले, प्रशांत तपस्वी, राजेश चिटणीस, विनीत बोंडे, गणेश रेवडेकर, जयवंत भालेकर, शिवाजी रेडकर, आशुतोष वाडेकर, शीतल कलाहापुरे, साक्षी परांजपे आदी कलाकार आहेत. कलाकारांना घेऊन यशस्वीपणे सिनेमा पूर्ण करण्याचं आव्हान त्यांनी लीलया पेललं आहे. विजय पाटकर स्वत: अभिनेते असल्यानं कलाकारांना मोकळं सोडलं की त्यांच्यातील अतिउत्तम काढता येऊ शकतं हे गमक त्यांना चांगलंच ठाऊक असल्यानं अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात 'वऱ्हाडी वाजंत्री' पूर्ण झाला. विनोदी कथानकाला सुमधूर गीत-संगीताची किनार जोडल्यानं प्रेक्षकांना एक परिपूर्ण चित्रपट पाहिल्याचं समाधान मिळेल. आजच्या काळातील चित्रपटांपेक्षा 'वऱ्हाडी वाजंत्री' नक्कीच वेगळा असल्याने एंटरटेनमेंट साठी आलेल्या प्रेक्षकांना एंटरटेनमेंटच मिळेल.

No comments:

Post a Comment