"सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची" १५ ऑगस्टपासून संध्या. ७.०० वा. कलर्स मराठीवर !
मुंबई १० ऑगस्ट, २०२३ : ज्यांच्या आभाळाएवढ्या कार्याने सगळ्यांचं मन जिंकलं, ज्या लाखो अनाथ लेकरांच्या आई बनल्या अशा पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या आयुष्याची प्रेरणादायी संघर्षमय गाथा, "सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची" या मालिकेत १५ ऑगस्टपासून संध्या ७ वाजता कलर्स मराठीवर उलगडणार आहे. त्यांच्या कार्यामुळे असंख्य अनाथ लेकरांना मायेची उब मिळाली, निराधार बालकांना हक्काचे घर मिळाले. सिधुताईंनी निव्वळ बालकांचे संगोपनच नाही केले तर त्यांना जगण्याची नवी उमीद दिली. मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच प्रेक्षकांना सिंधुताईं सपकाळ यांच्यावरील चरित्रकथा बघायला मिळणार आहे. कलर्स मराठी वाहिनी नेहेमीच नवनवीन, कल्पक उपक्रम राबवत असते. यावेळी देखील या आगामी मालिकेनिमित्त “करून विद्यादान करूया सिंधुताईंचा सन्मान” हा एक विद्यादानाचा स्तुत्य उपक्रम महाराष्ट्रातील मुंबई, अकोला,औरंगाबाद, नाशिक आणि पुणे या पाच शहरांमध्ये राबविण्यात आला. या कार्यक्रमाची सांगता १० ऑगस्ट रोजी पुण्यामध्ये सन्मती बाल निकेतन येथे करण्यात आली. सिंधुताईंच्या आशीर्वाद आणि प्रेरणेतून ज्यांचे यशस्वी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व घडलं, इतकंच नव्हे तर सिंधुताईंच्या समाजकार्याचा वारसा जे अजूनही यशस्वीपणे पुढे चालवत आहेत अश्या व्यक्तींचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. ज्यामध्ये ममता सिंधुताई सपकाळ, श्री. दीपकदादा गायकवाड, श्री. अरुणभाऊ सपकाळ, श्री. विनय सिंधुताई सपकाळ, श्री. मनिष बोपटे, श्रीमती. स्मिता पानसरे, कु. सरोज जांगरा, डॉ. माधवी साळुंखे, मनिषा नाईक, श्री. यश सूर्यवंशी यांचे मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळेस कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड विराज राजे देखील उपस्थित होते.
अनाथ लेकरांची आई पद्मश्री "सिंधुताई सपकाळ" यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेतून निराधार मुलांच्या शिक्षणासाठी शालेय पाठयपुस्तकं, - कथा कविता, बालपुस्तकं, कादंबरी, प्रेरणादायी आत्मचरित्रात्मक कथेची पुस्तकं जमवण्याचा हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला. उपक्रमातुन जमवलेली पुस्तकं 'सिंधुताई सपकाळ' यांच्या आश्रमाला दान करण्यासाठी 'कलर्स मराठी' ने हा उपक्रम आयोजित केला.
यानिमित्ताने बोलताना प्रोग्रामिंग हेड, कलर्स मराठी, (वायकॉम18) - विराज राजे म्हणाले, "सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची" हि पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनचरित्रावर आधारित मालिका करण्याचे शिवधनुष्य विठ्ठल डाकवे या मालिकेचे दिग्दर्शक आणि मंगेश जगताप निर्माते यांनी उचललं. मालिकेला विषय आणि त्यातील घटना, पात्र यामुळे मालिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची आम्हांला खात्री आहे. या मालिकेनिमित्त आम्ही एक आगळावेगळा उपक्रम आयोजक करण्याचे ठरविले. कलर्स मराठीच्या संपूर्ण टीमच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम जनतेचे खूप आभार कि, तुम्ही या उपक्रमाला उदंड प्रतिसाद दिला आणि तुमच्याच सहकार्यामुळे हे शक्य होऊ शकले. या उपक्रमाला मदत करून तुम्ही सगळ्यांनीच विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. मालिकेच्या निमित्ताने शक्य तितक्या गरजू मुलांच्या शिक्षणासाठी हातभार लावण्याचा आमचा यापुढे देखील प्रयत्न असेल. याचसोबत आम्हाला आनंद आहे सिंधुताईंचा वारसा पुढे नेणाऱ्या अतिशय महत्वाच्या व्यक्तिमत्वांचा देखील या उपक्रमाला सहभाग लाभला."
No comments:
Post a Comment