मुक्ता बर्वेचा धाडसी आणि दबंग लूक आणि 'जोगवा', 'पांगिरा', '७२ मैल एक प्रवास', 'दशक्रिया' या गाजलेल्या दर्जेदार चित्रपटांचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक संजय कृष्णाजी पाटील आणि सोबतीला असंख्य तरबेज कलावंतांची मांदियाळी असलेला बहुचर्चित सौ. स्वाती संजय पाटील यांच्या‘शांताई मोशन पिक्चर्स’ निर्मित आणि ‘श्री माऊली मोशन्स पिक्चर्स’ प्रस्तुत बंदिशाळा या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर येत्या रविवारी दुपारी १२ आणि सायंकाळी ६:०० वाजता झी टॉकीज वाहिनीवर रसिकांना पहायला मिळणार आहे.
एका कारागृहाची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटात मुक्ता बर्वे एका कर्तव्यदक्ष महिला तुरुंग अधिक्षिकेच्या भूमिकेत असून ही भूमिका आणि हा वेगळा विषय मुक्ता बर्वे या अभिनेत्रीने उत्तुंग शिखरावर पोहचविला आहे. तिने या चित्रपटात माधवी सावंत ही महिला तुरुंग अधिकारी जिवंत केली आहे. आजपर्यंतची सर्वाधिक आव्हानात्मक भूमिका तिला या निमित्ताने करायला मिळाली आहे. ही भूमिका तिने लीलया पारपाडली असून समीक्षकांनी तिला महाराष्ट्र राज्य शासनाचा 'सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा' पुरस्कार देऊन गौरविले आहे.
मिलिंद लेले दिग्दर्शित ‘बंदिशाळा’ची सहनिर्मिती पायल गणेश कदम, मंगेश रामचंद्र जगताप यांनी केली असून प्रख्यात सिनेमॅटोग्राफर सुरेश देशमाने यांच्या कॅमेऱ्यातून हा घटनाक्रम पहायला मिळणार आहे. संजय कृष्णाजी पाटील रचित चार गीतांना संगीतकार अमितराज यांनी स्वरबद्ध केले आहे. यामध्ये प्रार्थना, लावणी, थीमसॉंग आणि लग्नगीत असा संगीतप्रकार असून प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत, प्रियांका बर्वे, आरती केळकर,आरोही म्हात्रे अश्या गायकांच्या आवाजाची जादू रसिकांना मोहून टाकत आहे. प्रसिद्ध कोरिओग्राफर विठ्ठल पाटील यांनी नृत्यरचना केली असून कार्यकारी निर्मितीची सूत्रे राम कोंडू कोंडीलकर यांनी सांभाळली आहेत. बंदिशाळातील चित्तथरारक साहसदृश्य प्रशांत नाईक यांनी दिग्दर्शित केली असून दिग्दर्शक मिलिंद लेलेंना सुनील मांजरेकर यांनी प्रमुख सहाय्यक दिग्दर्शन केले आहे.
या चित्रपटात मुक्ता बर्वे यांच्यासोबतच विक्रम गायकवाड, शरद पोंक्षे, हेमांगी कवी, सविता प्रभुणे, आशा शेलार, प्रवीण तरडे, अश्विनी गिरी,अजय पुरकर, माधव अभ्यंकर, शिवराज वाळवेकर, आनंद आलकुंटे, अभिजीत झुंजारराव, आनंदा कार्येकर, प्रसन्न केतकर, वर्षा घाटपांडे, सोनाली मगर, प्रताप कळके, राहुल शिरसाट, पंकज चेंबूरकर, लक्ष्मीकांत धोंड, अनिल राबाडे, उमेश बोलके, अनिल नगरकर आणि उमेश जगताप यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
बंदिशाळाची महाराष्ट्र राज्य सरकारच्यावतीने कान्ससाठी निवड करण्यात आली होती. जगभरातील दर्दींची पसंती मिळविणारा हा चित्रपट‘महाराष्ट्र राज्य शासनाच्या ‘५६ व्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्या’ मध्ये सर्वाधिक पुरस्कारांचा मानकरी ठरला. 'सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती', सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक - २, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन क्रमांक - २, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मुक्ता बर्वे, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका प्रियांका बर्वे, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत विजय गवंडे, सर्वोत्कृष्ट गीत संजय कृष्णाजी पाटील, सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शक नरेंद्र हळदणकर अश्या तब्बल ८ सर्वोत्कृष्ट पुरस्कारांनी या चित्रपटाचा गौरवरथ भरून पावला आहे.
No comments:
Post a Comment