Monday, 26 August 2019

भाषा हे केवळ माध्यम!!

'झी युवा' वाहिनीवरील 'युवा सिंगर एक नंबर' हा कार्यक्रम अल्पावधीतच प्रेक्षकांच्या आवडीचा झाला आहे. वाहिनीवरील कथाबाह्य कार्यक्रमाचा अल्पविराम फारच दणक्यात संपलेला दिसून येत आहे. वैभव मांगले आणि सावनी शेंडे हे दर्जेदार परीक्षक, मृण्मयी देशपांडे सारखी हजरजबाबी सूत्रसंचालिका आणि गायन स्पर्धेची एक निराळी अशी संकल्पना या सगळ्या खास गोष्टींच्या जोरावर 'एक नंबर' लोकप्रियता मिळवण्यात कार्यक्रमाला यश आले आहे. अर्थातच, वेगळं असं खास काहीतरी घेऊन येणाऱ्या या गाण्याच्या स्पर्धेने, 'कलेला भाषा नसते' हेदेखील दाखवून दिले आहे. विशाल सिंग या उत्तरप्रदेशच्या तरुणाने, 'युवा सिंगर'च्या ६व्या भागात आपल्या सादरीकरणातून सर्वांच्याच हृदयावर राज्य केलं. उत्कृष्ट मराठी भाषेत, मराठी गाणं सादर करून त्याने सर्वांचीच मने जिंकली.
'युवा सिंगर' च्या मंचावर वय, भाषा किंवा इतर कसलेही बंधन नाही. त्यामुळे हा खऱ्या अर्थाने, मराठीतील सर्वसमावेशक असा कार्यक्रम आहे. 'तुझ्या प्रीतीचा हा विंचू मला चावला' हे गाणं विशाल सिंग या स्पर्धकाने सादर केलं. त्याचे उच्चार व लहेजा ऐकून ही व्यक्ती अमराठी आहे, हे कुणीही सांगू शकणार नाही. उत्तरप्रदेशात जन्म झालेल्या आणि मुंबईत वाढलेल्या विशालला गाण्याची खूप आवड आहे. त्याने अप्रतिमरित्या गायलेले मराठी गाणे, ही या गोष्टीची साक्ष ठरते. मातृभाषा भोजपुरी असणाऱ्या विशालने, मराठी प्रेक्षकांवर राज्य करण्याची कमाल करून दाखवली.
विशाल भोजपुरी आहे हे समजताच, परीक्षक वैभव मांगले यांनी त्याच्याशी भोजपुरी भाषेत संभाषण सुरु केले. उत्तरप्रदेशचा विशाल अस्खलित मराठी बोलत असतांना, वैभव मांगले यांनी भोजपुरी संवादांमध्ये मात्र त्याच्यावर वर्चस्व गाजवले. हे बघून मृण्मयी देशपांडे सुद्धा चकित झाली. एक आगळीवेगळी संकल्पना घेऊन आलेला हा कार्यक्रम, अशा निराळ्या मजेदार किश्यांमुळेही लोकप्रिय झालेला आहे. अशीच मजा-मस्करी व धमाल अनुभवण्यासाठी पाहत राहा, 'युवा सिंगर एक नंबर' फक्त आपल्या लाडक्या 'झी युवा' वर!!! 

No comments:

Post a Comment